सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com
नांदेड, महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेजवळचे जिल्ह्यचे शहर. हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील पोलीस कारवाईनंतर नवीन हैद्राबाद स्टेटमध्ये समावेश झालेले आणि नंतर भाषावार प्रांतरचनेत महाराष्ट्रात आलेले अशी नांदेडची प्राथमिक ओळख आपल्याला असते. पण त्याशिवाय शीख धर्मीयांची दक्षिण काशी अशी नांदेडची खास ओळख जागतिक पातळीवर आहे. जगभरातील शीख धर्मीय आयुष्यात एकदा का होईना येथील गुरुद्वारात येतात. शिखांचे दहावे गुरू, गुरू गोिवद सिंग यांनी शीख धर्मातील देहधारी गुरू परंपरा खंडित करून यापुढे गुरू ग्रंथ साहिब हाच शिखांचा गुरू असेल असे नांदेड येथेच सांगितले. १७०८ मध्ये गुरू गोिवद सिंग यांचे येथे देहावसान झाले. याच ठिकाणी गुरुजी भक्तांची वाट पाहतात असे सांगितले जाते. म्हणजे वयाच्या साठीपर्यंत तरी भक्तांनी तिथे जाणे अपेक्षित आहे. शीख धर्मीयांसाठी तख्त सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी नांदेड हे चौथे तख्त असून ते दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते.
शीख धर्मीयांच्या दृष्टीने नांदेडला असे महत्त्व असल्यामुळे नांदेडमध्ये काही घटकांना चालना मिळाली. त्यापकी एक म्हणजे येथील शस्त्रांची बाजारपेठ. खालसा पंथीय केस, कडं, कंगवा (लाकडी), कच्छा आणि कृपाण या पाच गोष्टींचे धारण करतात. यापकी कृपाण म्हणजे धारदार शस्त्रच. धर्मकारणासाठी शीख धर्मीयांना ते बाळगायची परवानगी आहे. अर्थातच दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्री जगभरातून शीख भाविक येत असतील तर त्यांच्या धर्माशी निगडित अशा अनेक गोष्टींची नांदेडमध्ये विक्री वाढणार हे अगदीच साहजिक आहे. कृपाण हे त्यापैकीच एक. भारतीय कायद्यानुसार नऊ इंचांपेक्षा जास्त धारदार शस्त्र बाळगणे, विकणे बेकायदेशीर ठरत असल्याचे नांदेडचे पोलिस सांगतात. कृपाण हे सर्वसाधारणपणे या मर्यादेच्या आत असते. पण कृपाणाबरोबरच शीख धर्मीय तलवारदेखील बाळगतात. आणि त्याला धर्माचा आधार असल्यामुळे कायदा – सुव्यवस्थेचं रक्षण करणारे पोलीस शिखांच्या तलवार हे शस्त्र बाळगण्याला आक्षेप घेत नाहीत. त्यामुळेच नांदेड येथे कृपाण आणि तलवार सहजगत्या उपलब्ध झाली तर त्याबद्दल आश्चर्य वाटायला नको. पण येथे शीख धर्मीयांबरोबरच शीख नसलेल्या लोकांनादेखील या गोष्टी विकत घेता येतात असे समजले होते. आणि केवळ तलवारीच नाही तर त्या आडून अँटिक तलवारी विकण्याची एक बाजारपेठच येथे विकसित झाली आहे, असेही समजले.
नांदेडला गोदावरी नदीकिनारी तख्त सचखंड साहिबजी ही भव्य वास्तू उभी आहे. तेथून गुरुद्वारा लंगर साहिबजीपर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा अगदी रोजच जत्रा भरल्याप्रमाणे दुकानांची रेलचेल असते. कुठे पारंपरिक वस्त्रांची दुकाने, कुठे कडे, कृपाण वगरे हारीने रचून ठेवलेले. मध्येच एक -दोन हॉटेलांचे पराठय़ाचे बोर्ड. रस्त्यावर शिखांचाच वावर अधिक. सारेच पगडी बांधलेले, दाढी मिशा वाढलेले, कोणी एखादा कच्छा नेसलेला (गुडघ्यापर्यंत धोतर असावे असे पांरपरिक वस्त्र) आणि खांद्यावर लटकवलेले कृपाण. काही महिलादेखील कृपाण बाळगणाऱ्या. नगिना घाटाच्या बाजूस लंगर साहिब गुरुद्वारा आहे. तेथेच निवासाची सोय असणाऱ्या भल्या मोठय़ा इमारतीदेखील आहेत. त्यात मध्येच ये-जा करणाऱ्या प्रवासी बसेस. साधारण पाचशे मीटरच्या या परिसरातून जाताना जणू काही आपण पंजाबातील एखाद्या गल्लीतून चालत आहोत असे वाटते.
शस्त्र बाजार असा उघडय़ावर दिसणार नव्हता. किंबहुना ते असे सहज पाहायला मिळणे जरा कठीणच होते. पण सुरुवात म्हणून तख्त सचखंडच्या समोरच असणाऱ्या कृपाण विक्रीच्या एका दुकानात गेलो. अगदी छोटीशी टपरी असावे असे हे दुकान. येथे वेगवेगळ्या आकारांतील कृपाण तर होतेच, पण त्याच जोडीला असंख्य फॅन्सी सुरेदेखील. कमांडो डॅगरसारखे सुरे तर हवे तेवढे. त्या दुकानात खरेदीला आलेली तरुण मुलं शीख नव्हती. त्यामुळे त्यांचा सारा भर हा त्या विविधढंगी, विविधरंगी डॅगरवरच होता. मी कृपाणाबद्दल विचारले. चार-पाचशेपासून ते दोन-तीन हजारांपर्यंतचे कृपाण तेथे होते. मग हळूच तलवार मिळेल का असे विचारले, तर तलवारीसाठी नगिना घाटाकडे जावे लागेल असे त्या व्यापाऱ्याने सांगितले.
मग मुख्य रस्त्यावरील दुकानांकडे आलो. तेथेदेखील एका दुकानात शेदोनशे कृपाण टांगलेले होते. त्या दुकानदाराने मात्र शीख नसणाऱ्या व्यक्तीला कृपाण विकत घेता येणार नाही, असं सांगितलं; पण मग हळूच तो म्हणाला की, ‘‘आपको पूजा में रखना है तो ले लो, लेकिन सिगारेट-बिडी पी के या तंबाखू के हात इसे मत लगाना.’’ शीख धर्मीयांमध्ये तंबाखूबद्दल प्रचंड तिटकारा आहे आणि मी शीख नसलो तरी तो ते कृपाण मला विकायला तयार दिसत होता.
पण तलवारच हवी असल्याने एका मोठय़ा दुकानात शिरलो. तेथे असंख्य कृपाण व अन्य वस्तू मांडून ठेवल्या होत्या. एक-दोन फॅन्सी (चायनीज) तलवारीदेखील लटकावलेल्या होत्या. येथे तलवार मिळू शकेल असं दिसत होतं. दुकानदाराकडे पूजेसाठी तलवार हवी आहे, अशी मागणी केल्यावर त्याने दोन क्षण निरखून पाहिलं.
मी काही शीख नव्हतो, त्यामुळे त्याने परत विचारले, ‘‘तलवार ले के क्या करोगे?’’
‘‘पूजेत ठेवणार.’’ माझे उत्तर तयारच होते.
‘‘कोठून आलात? आणि कसे आलात?’’ दुकानदाराचाही पुढचा प्रश्न तयार होता.
‘‘गाडीने आलो.’’ या उत्तरानंतर मग मात्र त्याने दुकानातील पोरांना तलवार काढायला सांगितली.
झगमगीत गुलाबी म्यानबंद तलवार समोर आली. एकदम चकाचक. म्यानातून तलवार बाहेर काढून बाजूला ठेवली. एकदम चकाकणारी अशी दोनेक फूट लांबीची ती तलवार. मुठीपासूनच पाते सुरुवातीला थोडे सरळ गेलेले आणि पुढे वक्राकार झाले होते.
तलवारीची किंमत होती तीन हजार रुपये; पण नेणार कशी हा प्रश्न होताच. दुकानदाराने सांगितले की, तुम्ही ही तलवार विकत घ्यायचे नक्की करा, तुम्हाला तलवार कशी घेऊन जायचे ते सांगतो. मी तलवार घ्यायचे ठरवले. तेव्हा दुकानदार बोलू लागला. ‘‘यह तलवार मने आपको बेची नही और आपने खरीदी नही. कोई आपको पकडता है तो बताना की, आप ये तलवार सायन कोळीवाडा के गुरुद्वारा में चढाने के लिये लेके जा रहे हो.. और घबराना नही, मुंबई के लोग बहुत घबराते है ऐसी बातो में. कल गाडी लेकर आ जाओ और तलवार ले लो.’’
खरं तर कायद्यानुसार त्या दुकानदाराला मला तलवार विकायला बंदी होती, पण तिथे निव्वळ व्यापार होता. त्यापुढे जणू कायद्याची भीती नव्हती.
त्याच्या दुकानात असंख्य कृपाण होते. एकूणच नांदेडमधील कृपाणांची संख्या पाहिल्यास कृपाणांचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन होत असणार हे नक्की होते. त्यामुळे ती उत्सुकता होतीच. त्या संदर्भात दुकानदाराकडे विचारणा केली असता त्याचे उत्तर धक्कादायक होते. तो सांगतो की, हल्ली हा सारा माल मुंबईवरून येतो आणि मुंबईला हा माल चीनमधून येतो. ‘‘अगर ये सब अपने इधर बनता तो हम इतना सस्ता बेचही नही पाते.’’
खरं तर कृपाण हा एका समुदायाशी निगडित असा घटक. त्यांच्या धार्मिक संकल्पनांमुळे धारण केले जाणारे हे हत्यार. तेवढीच त्याची मागणी मर्यादित असायला हवी; पण आज थेट चीनमधून त्याची आयात करावी लागणे इतकी बाजाराची मागणी आहे. चीनमधून येणारा माल कंटनेरच्या हिशोबाने येतो. हे पाहता एकूण भारतात कृपाणांच्या मागणीचा अंदाज करता येऊ शकतो.
इतर दुकानात इतक्या मोठय़ा प्रमाणात कृपाण आणि तलवारी पाहायला मिळत नव्हत्या. गुरुद्वारासमोरील दुकानात ढाल-तलवारीची एक जोडी पाहायला मिळाली, पण ती धारदार असण्यापेक्षा त्यात शोबाजीच अधिक होती.
नांदेडच्या तलवारीची बरीच चर्चा ऐकली होती, पण तेवढय़ा मोठय़ा प्रमाणात खुलेआम बाजार दिसत नव्हता. त्याची कारणं नंतर कळली. कधी काळी नेहमीच्या तलवारी खुलेआम विकण्याचे ठिकाण होते नगीना घाटाजवळच्या रस्त्यावर. पण २००८ सालच्या काही घटनांनी हा खुला बाजार आता जवळपास बंद झाल्याचे तेथील व्यापारी सांगतात. मालेगाव बॉम्बस्फोट आणि त्याच्या अलीकडे पलीकडे वाढलेल्या कट्टरतावादी घटनांच्या संदर्भात टाकण्यात आलेल्या धाडीत सापडलेल्या तलवारी नांदेडातून आल्याचे अनेकदा निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यानंतर नांदेडमधील अनेकांवर धाडी पडल्या. परिणामी हा खुला बाजार जवळपास बंदच झाला. आणि त्याचबरोबर तथाकथित अँटिक तलवारींच्या बाजाराला तेजी आली. इतिहासकालीन तलवारींना वाढलेल्या मागणीमुळे हा बाजार सध्या कसा कार्यरत आहे हेदेखील पाहायचे होते. पण हा बाजार असा खुलेआम चालत नाही.
येथे मात्र तुमची ओळख असेल तरच पुढील सूत्रं हलतात. अन्यथा तुम्हाला तलवारच काय साधं कृपाणदेखील घेता येत नाही. एका मध्यस्थाच्या मार्फत अशाच एका दुकानात गेलो. एकंदरीत दुकान अगदीच साधं, पण आतमध्ये गेल्यावर एकेक वस्तू दाखवल्या जाऊ लागल्या. त्यात एखादं जुनंपुराणं कुलूप होतं, काही खंजीर होते आणि एक तलवारदेखील. पण ही तलवार आधीच्या दुकानात पाहिलेल्या गुलाबी म्यानबंद झगमगीत तलवारीसारखी आकर्षक नव्हती आणि तिला धारदेखील नव्हती. किंबहुना तिचा हा लुक हीच अँटिकची पूर्वअट असावी असे जाणवले. कारण अशा काही तलवारी नंतरदेखील पाहायला मिळाल्या. काहींचे फोटो पाहिले. काही म्यानावरील कव्हर फाटलेले होते, तर काही तलवारींची पाती खराब दिसत होती, धार नव्हती, मूठ बऱ्यापकी नीटस होती, म्यानाचा मूळ रंग कळत नव्हता. मात्र असे असतानादेखील तलवारींच्या किमती पाच हजारांपासून पुढे सुरू होत होत्या. दुसऱ्या एका दुकानात फक्त तलवारीच होत्या. तिथेही हाच प्रकार होता. त्यात पुन्हा एखाद्या तलवारीच्या मुठीवर काही चिन्हं वगरे कोरले असेल तर मग त्याची किंमत आणखीन वाढणार. म्हणजे अगदी १५-२० हजार. त्या दुकानात पाहिलेली तलवार ही दहा हजार रुपयांची होती. मूठ जुनीच होती मात्र त्यावरील कलाकुसर नवीन होती. पाते कापून, वाकवून, म्यान वाकवून साध्या तलवारीचे गोलिया तलवारीत रूपांतर केले होते. हे रूपांतरण हाच एक मोठा व्यवसाय झाला आहे.
हे सारे पाहून आणखी एका तलवार विक्रेत्याला गाठले. हा पक्का सरदार. पण मराठी बोलणारा. त्याच्या तोंडून मग एकेक किस्से ऐकायला मिळत गेले. अँटिक तलवारींची मागणी असल्यामुळे बनावट तलवारी हा मोठा प्रश्न आहे. तो सांगू लागला की, या अँटिकच्या वाढत्या मागणीमुळे हल्ली अनेक जण बनावट अँटिक विक्रीचा उद्योग करतात. नेहमीसारखी किंवा इतिहासकालीन रचना असलेली तलवार तयार करून घ्यायची आणि त्यावर खराब पाणी, मिठाचे पाणी, अॅसिड वगरे टाकून ती मातीत नाल्यात किंवा चिखलात खुपसून ठेवायची. जेणेकरून ती जुनी वाटावी. किंवा मग म्यान फाडायचे. हा व्यवसाय बऱ्यापकी तेजीत असल्याचे हा विक्रेता सांगतो.
खरे तर तो स्वत:देखील तलवारी तयार करतो, काही अँटिक तलवारी शोधून खरेदी करतो आणि नांदेडात येणाऱ्या गिऱ्हाईकांना विकतो. त्याची किंमतदेखील पाच-दहा हजारांच्या खाली नसते. त्याच्या मते या तलवारी तो फक्त शीख धर्मीयांनाच विकतो. त्याबाहेर कोणालाही तो अशा तलवारी विकत नाही.
या अशा अँटिक तलवारींना सध्या प्रचंड मागणी आहे. ही मागणी दोन प्रकारच्या लोकांकडून येते. एक म्हणजे अभ्यासक, संग्राहक किंवा संग्रहालयांचे मालक आणि दुसरा वर्ग केवळ हौस म्हणून अँटिक वस्तू साठवणाऱ्यांचा. दुसऱ्या प्रकारचे लोक उच्चभ्रू वर्गात अधिक प्रमाणात आढळतात. या दुसऱ्या वर्गाला अँटिक वस्तूंची पारख म्हणावी तेवढी असतेच असे नाही. त्यांचा भर असतो तो अशी एखादी ऐतिहासिक वस्तू आपल्याकडे हवी यावर. तलवारीबद्दलचे आकर्षण मोठे आहे, तर हा वर्ग चार पसे जास्त मोजून तलवारी विकत घेऊ शकतो, किंबहुना तो घेतोच. म्हणूनच या तलवारींची किंमत हजारांमध्ये जाते. त्यातूनच मग एखाद्या तलवारीची मूठ मिळाली तर त्याला साजेसं पातं तयार करायचं किंवा पातं चांगलं असेल तर मूठ सुधारून घ्यायची. थोडक्यात विकण्यासाठी योग्य माल तयार करायचा.
हे सगळं नांदेडमध्येच का होतं हे पाहण्यामागे अनेक कारणं आहेत. एक तर हे ठिकाण शिखांचं महत्त्वाचं धर्मस्थळ आहे, त्यामुळे तेथे मागणी प्रचंड आहे; पण त्याचबरोबर बनावट अँटिकची बाजारपेठदेखील तयार होऊ लागली आहे. याला पूरक अशा शीख समाजातील एका गटाकडे पाहणे त्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. ते म्हणजे शिकलगार. सिकल हा मूळ फारसी शब्द आहे. त्याचा अर्थ हत्यारांना धार करणारे, हत्यारांना पाणी देणारे. हत्यार अर्थातच लोखंडापासून तयार केलेले. हा समूह मूळचा मारवाडातून आलेला, लोहारकाम करणारा होता. १५९५ मध्ये शिखांचे सहावे गुरू गुरू हरगोिबदजी यांच्या काळात हा समाज शीख समाजाशी जोडला गेला. गुरू हरगोिबदजी यांनी भक्त व अनुयायांना संत सिपाही बनण्याचे आदेश दिले. मिरी व पिरी या दोन समशेरींचा त्यांनी वापर केला. त्यांच्या काळात मारवाडातून आलेला हा लोहार समाज शिखांच्या बरोबर राहिला. त्यांना हत्यारांचा पुरवठा करणे हे त्याचे काम. हत्यारांचे म्हणजेच तलवार, कृपाण आदी तयार करण्याचे त्यांचे कसब चांगले होते. त्याचबरोबर त्यांनी युद्धासाठी पूरक अशी धातूंची अनेक हत्यारं तयार केल्याचे उल्लेख आहेत. लोहगड किल्ल्यातील हत्यारांचे उत्पादन यांच्याकडून केले जात असे. दहावे गुरू गोिबद सिंह यांच्या काळात तर या समाजाने काही लढायांमध्येदेखील भाग घेतला. गुरू गोिबद सिंह यांच्या पुढाकारानेच हा समाज त्या वेळी शीख समाजाचा भाग बनला. शिकलगार ही उपाधी गुरू गोिबद सिंह यांनी दिली अशी माहिती मिळते. गुरू गोिबद सिंह यांच्यांबरोबरच हा समाज नांदेड येथेदेखील आला; पण त्यानंतर तो देशभर छोटय़ा छोटय़ा समूहांत विखुरला. आजदेखील विशिष्ट सणाच्या दिवशी नांदेड येथील गुरुद्वारातील हत्यारांच्या पॉलिशिंगचा मान या समाजाला दिला जातो.
ब्रिटिश काळात शिकलगार समाज हा गुन्हेगार म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याचं कारण ब्रिटिशांनी केलेले कायदे. तलवार आदी हत्यारं तयार करणारा समाज म्हणजे धोकादायक असा संबंध त्यांनी लावला होता. मग हा समाज देशभरात मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, राजस्थान, दिल्ली येथे विखुरला. स्वातंत्र्यानंतर त्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का मारणारं कलम रद्द झालं; पण आपल्याकडे अशा समाजाच्या उत्थानाबद्दल असणाऱ्या उदासीनतेचा हा समाज बळी आहे. आजही अनेक ठिकाणी शिकलगार समाजातील लोक दैन्यावस्थेत जगत आहेत. एक तर तलवारींच्या आणि धातूंच्या अन्य उत्पादनाची गरज जवळपास संपलीच आहे. त्यातच यंत्राचा वापर शिकलगारांच्या पारंपरिक कौशल्यावर घाला घालणारा ठरला आहे. आज देशात तलवारींचे उत्पादन करणारे जे अधिकृत व्यवसाय आहेत तेथे यंत्राचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असतो. दुसरीकडे कृपाण आदी वस्तूंचे उत्पादन हे चीनमधून मोठय़ा प्रमाणावर आयात केले जाते. अशा वेळी त्यांच्या हस्तकौशल्याचा वापर कमी होणे स्वाभाविकच आहे. त्यातच शिक्षणाचा अभाव. त्यामुळे शिकलगारांनी बेकायदेशीररीत्या हत्यारे तयार करून दिल्याचे उल्लेख अनेकदा बातम्यांमधून आढळतात. काही वृत्तांनुसार या समाजाने नंतर देशी बनावटीच्या बंदुकादेखील तयार करायला सुरुवात केली. मध्य प्रदेशात दोन वर्षांपूर्वी एकाच वेळी ५०० पोलिसांनी खांडवा जिल्ह्य़ातील पांडोरी येथील जंगलात शिकलगार समाजाच्या वस्तीवर धाड घातल्याचे वृत्त ‘ट्रिब्युन’ने दिले होते.
नांदेड येथील उत्पादक, व्यापाऱ्यांशी बोलल्यावर लक्षात आले की, तलवारीसंदर्भातील कामे शिकलगार मंडळी करतात. नगिना घाटाच्या जवळच त्यांची वस्तीदेखील आहे. २००८ पूर्वी नांदेडमध्ये या शिकलगार समाजातील लोक नगिना घाटाच्या जवळ लंगर साहिबच्या बाहेरील रस्त्यावर तलवारी घेऊन विक्रीला बसायचे, अशी माहितीदेखील मिळाली; पण २००८ नंतर या व्यवसायावर गंडांतरच आले. त्यामुळे आज नांदेडात उघडउघड तलवारी विकल्या जाताना पाहायला मिळत नाहीत; पण यातूनच वाढलेला अँटिक तलवारींचा बाजार मात्र बहरताना दिसत आहे.
तलवारी तयार करण्यासंदर्भातील ही थोडीशी पूरक माहिती. पण आपल्याकडे तलवारींच्या वापराची क्रेझ नेमकी कशी आहे हेदेखील यानिमित्ताने पाहावे लागेल. आज आपल्याकडे अस्मिता मिरवण्याला अतोनात महत्त्व आले आहे. राजकीय पक्षांची व्यासपीठं असोत, लग्नाची वरात असो की शिवजंयतीची मिरवणूक तलवारीचा वापर तथाकथित प्रतिष्ठेचा असतो. आमच्या घराण्यात लग्नात तलवार लागतेच, असं अभिमानाने सांगितलं जातं. पुढे भाऊबंदकीत एका घराची चार घरं होतात. आणि त्या चार घरी लग्न असेल तेव्हा मूळ तलवारीसारख्याच आणखीन तीन तलवारी तयार करून घेतल्या जातात. यामुळे तलवारीची मागणी वाढतच राहते. सर्वच राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर कधी ना कधी तलवार प्रदान केल्याचा सोहळा दिसतो. अिहसेचा वारसा सांगणारेदेखील या तलवारी उगारून पोझ देत असतात. या दोन घटकांशिवाय तलवार घरी पूजेत असावी किंवा िभतीवर शोपीस म्हणून असावी असं वाटणाऱ्यांची संख्यादेखील बरीच आहे.
या वर्गामध्ये सध्या मागणी आहे ती कर्नाटकी धोप या तलवारीला. मराठा सरदारांच्या तलवारी या मोगलांप्रमाणे जड नसायच्या. मराठी माणसाची शरीरयष्टी पाहता त्या कमी वजनाच्या पण मजबूत असत. वक्राकार तलवार ही मुस्लीम काळातील तलवार म्हणून ओळखली जाते. तर कर्नाटकी धोप हा प्रकार सध्या मराठेशाहीतील तलवार म्हणून सर्वाधिक लोकप्रिय आहे. आपल्याकडे शिवजयंतीच्या मिरवणुकीत असे धारकरी हमखास दिसतात.
या हत्यारांच्या मागणीचादेखील एक ट्रेण्ड आहे. तो बऱ्याच अंशी अस्मितेशी निगडित आहे. काही वर्षांपूर्वी दांडपट्टय़ांना बरीच मागणी होती. तशीच मागणी सध्या कटय़ारींना आहे. ही दोन्ही शस्त्रं मराठय़ांची अस्सल शस्त्रं मानली जात असल्याने ही मागणी असावी. तर दुसरीकडे वरच्या वर्गातील संग्राहक सध्या सिरोही तलवार (वक्राकार असणारी गुजरातेतील तलवार) आणि समशेरीच्या प्रेमात आहेत. थोडक्यात अशा मागणीमुळे त्या त्या हत्यारांची बाजारपेठदेखील तेजीत चालते. कर्नाटकी धोप हा प्रकार सध्या किमान २० हजारांपासून ते ३० हजारांपर्यंत विकला जातो.
हे सर्व पाहता एक सहज साधा प्रश्न उपस्थित होतो. आपल्याकडे अशा अँटीक तलवारी आहेत तरी किती? मराठा सरदारांच्या तलवारी, ब्रिटिश, फ्रेंच आणि पोर्तुगालांच्या काही तलवारी या आपल्याकडे अँटीक सदरात मोडणाऱ्या तलवारी म्हणता येतील. आज दोन-तीनशे वर्षांनंतरदेखील त्या तलवारी आपल्याकडे विक्रीला येत असतील तर त्यातील खऱ्या किती आणि खोटय़ा किती हा प्रश्न पडतोच. कर्नाटकी धोपाचा एकूण प्रसार पाहिला तर हे सर्व कर्नाटकी धोप काही मूळ नसून त्या प्रतिकृतीच आहेत असं म्हणावं लागेल. म्हणजेच या तलवारी तयार करण्याचं काम कोणीतरी करत असतं. मग त्यातूनच हा तथाकथित अँटीक बाजार आकाराला येतो.
नांदेडात असा बाजार बऱ्यापकी जोर धरत आहे. त्यात कायदेशीर बाबी, गुन्हे वगरे मुद्दे तर आहेतच. पण त्याचबरोबर बनावट अँटीकच्या नादात मूळ अँटिक स्वरूप हरवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अधिकृत व्यवसाय असणाऱ्या ठिकाणी सांगून सवरून प्रतिकृती दिल्या जातात. त्यांना धार नसते. केवळ शिकलगारच नाही तर इतरही अनेक जण यामध्ये सहभागी आहेत. राजस्थानातील बलोत्रा येथील घोडे आणि जनावरांची जत्रा, पुष्कर मेळा, जोधपूर जत्रा अशा ठिकाणी आजही अगदी खुलेआम कटय़ार, कृपाण, तलवारींची दुकानं दिसून येतात. अमृतसरमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. तलवारी उपलब्ध करणारी काही संकेतस्थळं ऑनलाइनदेखील कार्यरत आहेत. थोडक्यात हा बाजार मोठय़ा प्रमाणात आहे. हे पाहता खरं तर अणुयुगामध्ये तलवारीची गरजच काय, असा प्रश्न पडू शकतो. पण एकूणच मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रवासात डोकावले तर लक्षात येते की दगडाची हत्यारं वापरणारा माणूस ते तलवार वापरणारा माणूस हा क्रांतिकारी बदल होता. या तलवारीच्या जोरावरच युरेशियातील छोटय़ा समूहाने जगातील अनेक मोठय़ा समूहांना नमवले होते. त्यातूनच मानवाच्या साम्राज्य विस्ताराची सुरुवात झाली. मानवाची तलवारीशी जवळीक अनादी काळापासून आहे. कदाचित हीच ओढ त्याला पुन:पुन्हा खेचून नेत असावी.