‘लोकरंग’ (१० ऑगस्ट) मधील ‘शोलेदाद!’ या लोकेश शेवडे यांच्या लेखातील ‘शोले आवडला, पण का आवडला सांगता येत नाही…’ हे उत्तर आवडलं. शोले तांत्रिकदृष्ट्या ७०एमएम भव्य पडद्यावरील उच्च प्रतीच्या आवाजाची, उत्तम संकलनाबरोबरच प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या पटकथा, संवाद, गाणी या सर्वांची उत्तम भट्टी जमलेली कलाकृती होती. त्यातल्या छोट्यातल्या छोट्या भूमिकेतील कलाकारही पुढे त्या व्यक्तिरेखेनं ओळखला जाऊ लागला यातच शोलेचं निर्विवाद यश आहे. म्हणूनच सुरुवातीला पाऊल अडखळलेल्या प्रेक्षकांची पावलं ‘शोले’ असलेल्या चित्रपटगृहांकडे अक्षरश: पुन:पुन्हा धावू लागली. जेव्हा ‘शोले’ प्रदर्शित झाला त्या वेळी ती गर्दी, जल्लोष, चित्रपटगृहात संवादांना मिळणारी मन:पूर्वक दाद, व्यक्तिरेखांमध्ये स्वत:ला पाहणारे बेभान प्रेक्षक, रोज शाळा-कॉलेजला जाणाऱ्या माझ्यासारख्या विद्यार्थ्यांची वा कामावरही जाणाऱ्यांची ‘संवाद’ ध्वनिफीत लागलेल्या ठिकाणी थबकणारी पावले… हे सारं आठवलं तरी आजही अंगावर रोमांच उभे राहतात. आजही दूरचित्रवाणीवर कुठंही, केव्हाही ‘शोले’ चालू असेल तर ‘थोड्या वेळासाठी तो बघू’ म्हणणारा माझ्यासारखा प्रेक्षक ‘पुढचा एकच प्रसंग बघू’ असं म्हणत संपूर्ण चित्रपटच बघत बसतो हे सत्य आहे. अर्थात परदेशी चित्रपटांतील प्रसंग वापरण्याची क्लृप्ती, काही दृश्यांमधील बारीकसारीक त्रुटी, चित्रीकरणाचे गमतीशीर किस्से, त्यातील कट्टर दुश्मन असलेल्या नायक, खलनायकांची गळ्यात गळे घालून हसतानाची छायाचित्रे यांनी ५० वर्षांपर्यंत ‘शोले’ धुमसत राहिलाय यातच सारं आलं.

श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे</strong>

प्रेक्षकांना भुरळ पाडली

‘लोकरंग’ (१० ऑगस्ट) मधील ‘शोलेदाद!’ हा लोकेश शेवडे यांचा लेख वाचला. भारतीय चित्रपटसृष्टीने प्रेक्षकांना अनेक उत्तम चित्रपट दिले, परंतु तमाम भारतीयांच्या हृदयाला आजतागायत भुरळ पाडणाऱ्या शोलेने मात्र पन्नाशी ओलांडून तीच जादू कायम ठेवली आहे. सामाजिक जीवन आणि तत्संबंधीची सांस्कृतिक जाणीव आणि आर्थिकतेचा ताळमेळ बांधताना, सामान्य माणसाचे चरित्र रंगविण्यात शोलेने अद्भूत कथानक रंगवले खरे, पण त्यातील नायकांच्या भूमिकांनी सामान्य जनांच्या मनावर अमीट ठसा उमटवून आपलेसे केले. शोलेचं गारूड आजही मनामनात जिवंतपणाची साक्ष देत आहे. त्या वेळी स्टिरिओओफोनिक आवाज, सत्तर एम एम पडदा, प्रसन्न करणारे पार्श्वसंगीत, आणि नायकांची अप्रतिम देहबोली आणि भारदस्त संवादफेक म्हणजेच चित्रपटाच्या यशाचे गमक होते. आपल्या मुलाचे प्रेत पाहून ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई?’ हे एका अंध वडिलांचा प्रश्न ऐकून आजही मन भरून येते. ‘चल मेरी धन्नो’ म्हणत घोड्याशी संवाद साधणारी बसंतीने तर प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. वीरूचे जादूई आवाजातील संवाद आणि जय यांच्या भावनात्मक द्विधा अवस्थेतील आवाज आजही बेचैन करून जातो. पडद्यावर थरकाप उडवून देताना चंबळच्या खोऱ्यातील गब्बरसिंगने एकच खळबळ उडवून दिली होती. अमजद खान यांचा भारदस्त आवाज आणि घोड्यावर बसून, भीतीयुक्त देहबोलीतून दरारा निर्माण करताना समोर उभा असलेला ठाकूर… म्हणजेच शोलेचे यश! संवाद लेखक सलीम-जावेद यांच्या परिणामकारक शब्दांच्या समर्पक संवादाची पटकथा म्हणजेच शोलेचे यश! आर. डी. बर्मन यांच्या संगीताच्या गोडव्यातील चढउतार म्हणजेच शोलेचे यश. – डॉ. नूतनकुमार सी. पाटणी, औरंगाबाद</p>