‘गा य’ हा विषय समाजकारण तसंच धर्मकारण यांच्या सीमारेषा ओलांडून भारतीय राजकारणाच्या अजेंड्यावर नेमका आला तरी कधी? आर्य समाजानं हा विषय १८९० मध्ये ‘राजकीय’ करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यास फारसं यश आलं नाही आणि पुढे झालेल्या स्वातंत्र्य आंदोलनात सर्वच समाजघटक जात-धर्म आदी भेद दूर ठेवून सहभागी झाल्यामुळे तो विषय मागेच पडत गेला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे १९५० मध्ये आपल्याला आपली घटना मिळाली. त्यानंतरच्या वर्षभरातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक मा. स. गोळवलकर यांनी वर्तमानपत्रात एक लेख लिहून ‘गाय’ हे राष्ट्रीय एकतेचं प्रतीक असल्याची घोषणा केली.
वर्तमानपत्रात लेख वगैरे लिहिण्याबद्दल गोळवलकर हे प्रसिद्ध कधीच नव्हते. तरीही त्यांनी हे पाऊल उचललं होतं आणि संघपरिवाराच्या विविध संघटनांमार्फत हा विचार समाजात रुजवण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, त्यानंतर १९५२, ५७ आणि ६२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत ‘गाय’ कोणत्याच प्रकारचं ध्रुवीकरण करू शकलेली नाही, हे स्पष्ट झालं होतं. ‘गोहत्याबंदी’ची मागणी अधून-मधून केली जात असे. पण देशाचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी या देशाची बहुसांस्कृतिक आणि बहुधार्मिक प्रकृती बघता, ती मान्य करण्यास ठाम विरोध केला होता.
पंडित नेहरूंच्या निधनानंतर पुनश्च एकवार संघपरिवाराच्या या मागणीनं जोर धरला. मात्र, नेहरूंनंतर पंतप्रधान झालेले लालबहादूर शास्त्री यांचं अकाली निधन झालं. त्यानंतर देशाची सूत्रं हाती घेणाऱ्या इंदिरा गांधी यांच्यावर अर्थातच पंडितजींच्या पाश्चिमात्य आणि उदारमतवादी धोरणांचा पगडा होता. त्यांनीही संघपरिवाराच्या या मागणीकडे दुर्लक्षच केलं. मात्र, दरम्यानच्या काळात म्हणजे १९६६ मध्ये संघपरिवारानं गोहत्याबंदीच्या मागणीसाठी संसदेवर एक मोठा मोर्चा आयोजित केला होता. एका अर्थानं ही संसदेवर केलेली चालच होती. त्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आणि काहींचे बळीही गेले होते.
मात्र, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्यानंतर गोमांस बाळगल्याच्या निव्वळ संशयावरून झुंडींना मस्ती चढली. आणि अनेकांचे हकनाक बळी गेले. या पार्श्वभूमीवर पत्रकार श्रुति गणपत्ये यांनी या विषयाचा सखोल अभ्यास करावयाचं ठरवलं. देशभरातील कत्तलखाने तसेच कातड्यांपासून विविध वस्तू बनवणारे उद्याोग यांना भेट देऊन त्यांनी या विषयाचा तपशील जमा केला. उत्तर प्रदेशात त्यांनी कानपूर परिसरातील अशा उद्याोजकांना भेट दिली असता, त्यांना तेथे हिंदू तसेच मुस्लीम असे दोन्ही समाजातील लोक भेटले. तेव्हा गोवंश हत्याबंदीचा फटका हिंदूंनाही बसत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आपल्या या अभ्यासावर आधारित त्यांनी ‘हू वील बेल द काऊ?’ या नावाचं इंग्रजी पुस्तक लिहिलं असून, त्यांनीच त्या पुस्तकाचा ‘गाईच्या नावानं चांगभलं’ या नावानं मराठी अनुवाद केला आहे. त्यात हिंदू समाजातील अनेकांना या तथाकथित गोरक्षकांचा कायदा राजरोस हातात घेण्याच्या प्रकाराने कसा फटका बसत आहे, याचा तपशीलवार ऊहापोह आहे.
तुम्हाला तुमची स्वत:ची गाय एखाद्या गावातून दुसरीकडे न्यायची असेल वा कोणाला नवी गाय विकत घ्यायची असेल, तर तेही आता कठीण होत चाललं आहे. तुम्ही गाय घेऊन (स्वत:ची वा खरेदी केलेली) निघालात की हे गोरक्षक तुमच्या मागे लागतात. बहुतेक वेळा हे गोरक्षक आणि संबंधित पोलीस ठाणे यांची ‘मिली-जुली’ झालेली असते आणि गाईची ने-आण सुरू आहे, अशा खबरा हे दोन्ही गट एकमेकांना देत असतात. त्यामुळे हे तथाकथित गोरक्षक आणि संबंधित पोलीस ठाणे या दोहोंचेही हात ‘ओले’ केल्याशिवाय तुम्हाला आपली गाय कुठंही नेता येत नाही. मग हा गाईला घेऊन जाणारा मुस्लीमच असला पाहिजे, असा त्यांचा मुद्दा बिलकूलच नसतो. तो हिंदू असला तरी त्याला ही मनमानी ‘खंडणी’ दिल्याशिवाय आपली गाय कुठंही घेऊन जाणं आता अवघड होऊन बसलं आहे. प्रश्न कोणी तरी गाय घेऊन निघाला आहे, याची ‘खबर’ नेमकी मिळते तरी कशी? तर हे तथाकथित गोरक्षक आणि त्यांच्या परिसरातील पोलीस ठाणे यांचे या बाबतीत साटेलोटे असते. दोहोंपैकी कोणालाही ही ‘बातमी’ मिळाली की ते एकमेकांना कळवतात आणि दहशतीचं वातावरण निर्माण करतात. परिणामी, गाय नेणाऱ्याला दोहोंनाही ‘खंडणी’ दिल्याशिवाय त्याची सुटका होत नाही.
आणखी एक मुद्दा. तुम्हाला तुमची गाय भाकड झाली तरी तिची विक्री करता येत नाही, त्यामुळे अनेकांनी आपल्या गाई तसेच गोवंश रस्त्यावर सोडून देणं पसंत केलं आहे. मग ही मोकाट जनावरं रात्री-अपरात्री शेतात घुसून पिकांचं अतोनात नुकसान करतात. हा फटकाही प्रामुख्यानं हिंदू शेतकऱ्यांनाच बसत आहे. एकंदरीतच या तथाकथित गोरक्षकांच्या या गुंडगिरीचा फटका आता हिंदू समाजालाच बसू लागला आहे. ही तथाकथित गोरक्षकांची गुंडगिरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेसारख्या हिंदुत्ववादी संघटनांच्या कृपाछत्राखाली सुरू असते, हेही अनेक वेळा उघड झालं आहे. याच छत्राच्या ‘कवच-कुंडला’खाली लपून हे दहशतीचे आणि कायदा हातात घेण्याचे प्रकार सुरू असतात, हेही सातत्यानं सामोरं आलं आहे. त्याचा संपूर्ण तपशील लेखिकेने उत्तर भारतातील काही कत्तलखान्यांना प्रत्यक्ष भेट देऊन जमा केला आहे.
त्याचबरोबर अन्न आणि राजकारण, आपली खाद्यासंस्कृती आदी विषयांचा अभ्यासपूर्ण तपशीलही या दोनशे पानाच्या छोटेखानी पुस्तकात वाचायला मिळतो. त्यामध्ये महात्मा गांधी उपोषणाचा वापर राजकारणासाठी कसा करत, हा संदर्भ मनोज्ञ आहे. लेखिकेने आपल्या अभ्यासात आर्यांचा भारतात झालेला प्रवेश आणि त्या पशुपालक जमाती असल्याने त्यांनी आपला चरितार्थ निभावणाऱ्या गुरा-ढोरांनाच दैवी स्वरूप कसं दिलं, याचाही तपशील आहे.
अनेक संदर्भ तसंच तज्ज्ञ अभ्यासकांचे हवाले आणि त्यास पूरक आकडेवारी यामुळे या छोटेखानी पुस्तकास संदर्भग्रंथाचं स्वरूप आलं आहे. लेखिका श्रुति गणपत्ये यांचा या विषयाचा अभ्यास त्यातून पानापानांवर सामोरा येत जातो. अलीकडल्या काळात शोध-पत्रकारिता नामशेष होत चालली असताना, या तरुण पत्रकाराने निव्वळ बातमीदारीच्या सीमा ओलांडून केलेला हा अभ्यास आपल्या डोळ्यात अंजन घालणारा आणि सर्वांनीच वाचावा, असाच आहे.
‘गाईच्या नावानं चांगभलं’- श्रुति गणपत्ये, लोकवाङ्मय प्रकाशन, पाने- १९९, किंमत- ३५० रुपये