|| अ. पां. देशपांडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाळ फोंडके २२ एप्रिल २०१९ रोजी ८० वर्षे पुरी करीत आहेत. त्यानिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन. फोंडके यांच्या हालचालींतील चपळपणा व चेहऱ्यावरील टवटवी पाहिल्यावर त्यांचे वय मोजण्यात माझी काही चूक तर झाली नाही ना, असे कोणालाही साहजिकपणे वाटेल. नाही म्हणायला त्यांच्या चेहऱ्यावरची रूपेरी झाक कदाचित वयाचा अंदाज देऊन जात असेल; पण तो काही खात्रीचा उपाय नव्हे. त्यांची जन्मतारीख वाचल्यावर सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो;  आणि हो, ते खरेच ऐंशी वर्षांचे झाल्याची खात्री पटते.

बाळ फोंडके यांचे पूर्ण नाव गजानन पुरुषोत्तम फोंडके असे आहे. फोंडके यांनी अणुभौतिकीत एम. एस्सी. केल्यावर काही काळ विल्सन महाविद्यालयात अध्यापन केले आणि नंतर त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतला. फोंडके यांनी वर्षभर प्रशिक्षण घेतल्यावर २३ वर्षे बीएआरसीच्या जीववैद्यक विभागात काम केले. बीएआरसीत असताना त्यांनी या विभागात राहून रोगप्रतिबंधकशास्त्र, जीवभौतिकी आणि पेशींचे व कर्करोगासंबंधीचे शास्त्र यांत संशोधन केले. दरम्यान, १९६७ साली त्यांनी लंडन विद्यापीठाची जीवभौतिकी या विषयातील पीएच. डी. मिळवली. नंतर त्यांनी दोन-तीन वेळा परदेशात अभ्यागत शास्त्रज्ञ- प्राध्यापक म्हणून काम केले.

बीएआरसीत असताना ते तुरळकपणे विज्ञानकथा लिहू लागले होते. आकाशवाणी व दूरदर्शनवर त्यांची हजेरी सुरू झाली होती. यामुळे त्यांना विज्ञानप्रसाराची आवड निर्माण झाली. १९८३ साली टाइम्स ऑफ इंडिया संस्थेतील ‘सायन्स टुडे’ या मासिकाचे संपादकपद रिकामे झाले आणि फोंडके यांना ते पद मिळाले. ‘सायन्स टुडे’मध्ये त्यांनी बरेच चतन्य आणले. त्यांनी मराठीत विविध विज्ञान विषयांत लिहिणाऱ्या लोकांना इंग्रजीत लिहिते केले. त्यात व. दा. जोगळेकर, सुरेश नाडकर्णी, लक्ष्मण लोंढे, सुबोध जावडेकर, निरंजन घाटे ही मंडळी होती. १९८६ च्या सुमारास ‘सायन्स टुडे’मध्ये नवीन संपादक आले आणि फोंडके यांच्यावर टाइम्स प्रकाशनाच्या मराठी, इंग्रजी, हिंदी दैनिकांत विज्ञानविषयक बातम्या, लेख लिहिणे ही जबाबदारी सोपवण्यात आली. विज्ञानाचा मजकूर छापण्यासाठीच्या अनेक संधी त्यांनी यावेळी शोधल्या. त्या काळात टाइम्समध्ये नव्याने संगणक आले होते आणि ते वापरणाऱ्यांत संपादक गोविंद तळवलकर आणि फोंडके अग्रस्थानी होते.

त्यानंतर फोंडके दिल्लीला सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चच्या (सीएसआयआर) ‘निस्कीयार’ (नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स कम्युनिकेशनल अँड इन्फम्रेशन रिसोस्रेस ) या संस्थेचे संचालक म्हणून गेले. सीएसआयआरच्या शास्त्रज्ञांनी लिहिलेले निबंध छापणे आणि ‘वैग्यानिक’ हे हिंदी आणि ‘सायन्स रिपोर्टर’ हे इंग्रजी मासिक चालवण्याचे काम हे संचालनालय करीत असे. याशिवाय त्यांनी काही पुस्तकेही छापली. त्यातील एक ठळक म्हणजे भारतभरच्या विज्ञानकथा लेखकांच्या कथांचे पुस्तक.. ‘इट  हॅपंड टुमारो’! आज हे पुस्तक सायन्स कम्युनिकेशनचा अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांमध्ये संदर्भ म्हणून वापरले जाते. त्यांनी सीएसआयआरवर डॉक्युमेंटरी काढली आहे.

मराठी विज्ञान परिषदेने मराठीत विज्ञानकथा हा वाङ्मयप्रकार रूढ व्हावा म्हणून १९७० सालापासून स्पर्धा घ्यायला सुरुवात केली. त्यात जयंत नारळीकर, बाळ फोंडके, निरंजन घाटे, सुबोध जावडेकर, लक्ष्मण लोंढे यांनी पारितोषिके मिळवली. त्यातली मुंबईतील लेखक मंडळी १९८५ ते १९८९ या काळात नियमितपणे मराठी विज्ञान परिषदेत जमून त्यांच्या कथा, एकांकिका एकमेकांना वाचून दाखवत व नंतरच छापायला देत. म्हटले तर हे मराठी विज्ञान परिषदेचे ‘रविकिरण मंडळ’ होते.

गेल्या ३० वर्षांत फोंडके यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यातल्या बऱ्याच पुस्तकांना पुरस्कार मिळाले. मराठी विज्ञान परिषदेत त्यांनी व मी मिळून विज्ञान व तंत्रज्ञान कोश आणि विवेक साप्ताहिकासाठी महाराष्ट्रात होऊन गेलेल्या वैज्ञानिकांचा व विज्ञान प्रसारकांचा चरित्रकोश संपादित केला. फोंडके हे मराठी विज्ञान परिषदेतर्फे गेली ५० वर्षे प्रसिद्ध होणाऱ्या पत्रिकेच्या संपादक मंडळात १८-१९ वर्षे होते. फोंडके व विज्ञान शिक्षणतज्ज्ञ वि. गो. कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’मध्ये चार वर्षे सदर चालवले. ते फारच लोकप्रिय ठरले. वसुंधरा पेंडसे-नाईक आणि फोंडके यांनी मुंबई दूरदर्शनवर ‘अमृतमंथन’ हा संस्कृत नाटकांवरचा कार्यक्रम चालवला होता. फोंडके यांनी पूर्वी रंगभूमीवर संस्कृत नाटकातही काम केल्याचे मी ऐकून आहे. फोंडके यांनी पुणे विद्यापीठातील पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात विज्ञान पत्रकारितेचा अभ्याक्रम शिकवला आहे.

मराठी विज्ञान परिषदेमुळे मराठी साहित्यात सुरू झालेला विज्ञानकथांचा प्रवाह पुढेही तितक्याच जोमाने सुरू राहावा म्हणून मराठी विज्ञान परिषदेने २०१२ पासून विज्ञानकथा लेखन कार्यशाळा सुरू केल्या असून गेल्या सात वर्षांत महाराष्ट्र आणि गोव्याच्या विद्यापीठातून आठ कार्यशाळा झाल्या. त्याद्वारे आजवर २०० ते २२५ विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण घेतले आहे. यातील पाच-सहा लोक उत्तम विज्ञानकथा लिहू लागले. या विज्ञानकथा लेखन कार्यशाळेची रचना फोंडके यांनी केली आहे.

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याने वसंतराव गोवारीकर सचिव असताना ‘टेक्नॉलॉजी इन्फम्रेशन अँड फोरकास्टिंग असेसमेंट’ (टायफँक) या नावाचा आयोग स्थापन केला. २०१४ ते २०३४ या काळासाठी नेमलेल्या या आयोगाचे फोंडके सभासद असून आयोगाची संहिता बनवण्यात त्यांचा सहभाग आहे. महाराष्ट्र शासनाच्या विश्वकोश मंडळातर्फे निघणाऱ्या विश्वकोशाच्या नवीन आवृत्तीत ते विज्ञान विभागाचे सल्लागार आहेत.

फोंडके यांची मुले परदेशी असल्याने ते गेली काही वर्षे नियमाने तेथे जात असतात, तरीही आंतरजालामार्फत तिथेही त्यांची कामे सुरू असतातच. प्रासंगिक महत्त्वाच्या विषयांवर त्यांचे वर्तमानपत्री लिखाणही सातत्याने सुरू असते. कामाचा हा त्यांचा उरक पाहता त्यांच्या दिवसाचे ३६ तास असतात की त्यांच्या हाताला दहाऐवजी वीस बोटे आहेत, हा मात्र स्वतंत्र संशोधनाचा विषय ठरावा.

apd1942@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi article in loksatta lokrang by a p deshpande