मराठी व्यावसायिक रंगमंचावरील लोकप्रिय नाटकं गुजराती रंगमंचावर नेहमीच येत राहिली आहेत. तिथं ती अधिक फलदायी ठरली आहेत. अलीकडच्या काळात जी गुजराती नाटकं मराठीत सादर केली गेली, ती मुळातच पाश्चात्त्य नाटकांची रूपांतरे होती. सुरेश जयराम या गुजराती मातृभाषेतील मराठी अवगत असलेल्या नाटककाराने ती केली होती आणि प्रामुख्याने ती रहस्यनाटय़े होती. अलीकडेच ‘सुयोग’ या नाटय़संस्थेने मकरंद अनासपुरे याची प्रमुख भूमिका असलेले ‘कृष्णकन्हैया’ हे नाटक गुजरातीवरूनच घेतले होते. (गुजराती नाटकालाही इंग्रजी नाटकाचा आधार होता असे म्हणतात.) गुजराती नाटकाचे नाव ‘कानजी व्हर्सेस कानजी’ असे होते. अशी सगळी परिस्थिती असल्यामुळे मूळ गुजरातीतील आशयनघन, समर्थ नाटकांची ओळख मराठी रंगभूमीला विशेषत्वानं झालीच नाही.
अन्य भारतीय भाषांतील नाटकं मराठी रंगमंचावर आणण्याचं धाडस प्रथम केलं ते महाराष्ट्र राज्य नाटय़स्पर्धेनंच! बादल सरकार, गिरीश कार्नाड, आद्यरंगाचार्य, धर्मवीर भारती, मोहन राकेश, चंद्रशेखर कंभार, आशुतोष बंधोपाध्याय अशा अन्यभाषिक नाटककारांची बरीच नाटकं आणि त्यांचे आकर्षक, गुंतवून ठेवणारे प्रयोग राज्य नाटय़स्पर्धेनंच दिले आहेत.
आज अन्य भारतीय भाषांतील मराठी रंगमंचावर आलेल्या नाटकांची याद जागी झाली, त्याचं कारण १९७७ साली ‘अनिकेत’ या संस्थेनं राज्य नाटय़स्पर्धेत सादर केलेलं ‘आणि म्हणून कुणीही’ हे नाटक. दिलीप कुळकर्णी दिग्दर्शित हे नाटक ‘कोई भी फुल का नाम ले लो’ या ख्यातनाम गुजराती नाटककार मधु राय यांच्या नाटकाचा अनुवाद. या नाटकाच्या निमित्ताने मधु राय यांच्या दोन नाटकांचे जे अनुवाद मराठीत सादर झाले त्यांचा परिचय करून घेऊया.
‘कुमारनी आगाशी’ या मधु राय यांच्या नाटकाचा अनुवाद विजय तेंडुलकरांनी ‘मी कुमार’ या नावाने केला होता आणि १९८३ मध्ये आय. एन. टी. या संस्थेनं हे नाटक मराठी व्यावसायिक रंगमंचावर आणलं होतं. सदाशिव अमरापूरकर या नाटकाचे दिग्दर्शक होते.
अमरच्या घरी सगळे बिपीनच्या सेंड-ऑफ पार्टीसाठी जमले आहेत. बिपीन कायम वास्तव्यासाठी कॅनडाला चाललाय. बिपीन अजून यायचा आहे. हर्षदचा भाऊ कुमार आणि बिपीन एकेकाळचे जिवलग मित्र. कुमारने आत्महत्या केली आहे, असा कोर्टाने निकाल दिला आहे. हर्षदचा त्यावर विश्वास नाही. कुमारची हुशारी असह्य़ होऊन आपल्या मार्गातील काटा दूर करण्यासाठी बिपीननेच त्याचा खून केला असावा अशी त्याची खात्री आहे. प्रत्यक्ष बिपीन पार्टीत आल्यावर या कल्पनेचा फुगा फोडतो. बिपीनच्या बायकोचे- म्हणजेच कुमारच्या वहिनीचे आणि कुमारचे अनैतिक संबंध होते. त्या निशावहिनीमुळेच कुमार आत्महत्येला प्रवृत्त झाला. अप्रत्यक्षरीत्या वहिनीनेच कुमारचा खून केला, हे बिपीन सप्रमाण सिद्ध करून दाखवतो. निशावहिनीही दीराशी असलेल्या आपल्या संबंधांची कबुली देते. पार्टीतले लोक या धक्क्य़ाने अचंबित होतात. आणि अकस्मात कुमारच अवतरतो. तो सगळ्यांना ओळखतो. पण त्याला कुणीच ओळखत नाही. नाटकाच्या अखेरीस कुमारला कधीही न पाहिलेली अभिलाषा त्याला ओळखते आणि त्याला सांगते, ‘तुम्ही जिवंत झालात तर आम्ही पार्टीत गप्पा तरी कसल्या मारणार? आमच्या रोजच्या सरळ-साध्या, कंटाळवाण्या आयुष्यात रहस्य, रोमान्स, मिस्ट्री कशी येणार? आम्हाला मेलेला कुमारच हवा. जिवंत नको. तेव्हा तुम्ही आता जा.’ अभिलाषाच्या या अखेरच्या संवादातच या रहस्यनाटय़ाचे सार आहे. एकाच व्यक्तीशी संबंधित दोन कल्पनांचा खेळ हे या नाटकाचे मुख्य सूत्र. स्वत:चा अहंभाव जपणाऱ्या व फुलवणाऱ्या उच्चभ्रू लोकांचं हे पारदर्शक दर्शन आहे. मेलेल्या कुमारची कथा आणि त्याचं जिवंत होणं या दोन कल्पना आहेत, हे ठसविण्यासाठी लेखकाने एकदा बिपीनच्या हातात खेळण्यातलं पिस्तुल दिलं आहे; तर अखेरीस अभिलाषा जिवंत कुमारला ‘जा’ म्हणताना हाताच्या बोटांचं पिस्तुल करते. त्याचा आवाज होतो आणि कुमार अदृश्य होतो. या नाटकातला कुमार गच्चीवरच राहतो. गच्ची हेच नाटय़स्थळ आहे. यात नेपथ्यकार गौतम जोशी यांनी उभारलेली गच्ची झकास होती. बिपीनच्या भूमिकेत मोहन गोखले, निशाच्या भूमिकेत सुनीला प्रधान व कुमारच्या भूमिकेत उदय टिकेकर यांनी अत्यंत सराईतपणे व्यक्तिचित्रे उभी केली. कुमारच्या मोठय़ा भावाच्या- हर्षदच्या भूमिकेत अरुण सरनाईक यांनी प्रभावी छाप पाडली. अनंत अमेंबल यांच्या पाश्र्वसंगीतानं परिणामकारक नाटय़मयतेसाठी पाश्र्वसंगीत किती महत्त्वाचं असतं, हे स्वकर्तृत्वानं पटवून दिलं.
‘पान कौर नाके जाके’ हे मधु राय यांचं आणखी एक नाटक ‘आंतरनाटय़’ या प्रायोगिक संस्थेनं मराठीत त्याच नावानं आणलं. (१९९५) एका यानातून कल्पित देशांत प्रवास केला जातो. पहिल्या देशात भावना नसलेली माणसं भेटतात. दुसऱ्या देशात उंटांचंच राज्य असतं. माणसं प्राणिसंग्रहालयात ठेवलेली असतात. तिसऱ्या देशातील माणसं बोलतच नाहीत. जन्म व मृत्यूच्याच वेळी फक्त त्यांच्या तोंडून आवाज उमटतो. माणसांची ही तीन दर्शने नाटककार दाखवतो. माणूस फार बोलतो आणि स्वत:चा अध:पात करून घेतो. म्हणून या बडबड करणाऱ्या माणसालाच नष्ट केलं पाहिजे. ते कसं करणार? तर उत्तर येतं- ‘बोलूनच!’ बोलणारा माणूस बोल बोल बोलूनच नाहीसा करता येईल अशी या नाटकाची ‘मॅड’ थीम आहे. माणसाच्या निर्थक बोलण्यावरचं भेदक भाष्य म्हणजे हे नाटक. अजित भुरे दिग्दर्शित या नाटय़प्रयोगात संजय मोने, धनंजय गोरे, दीपाली शेलार, मिनोती पाटणकर व अर्चना केळकर यांचा सहभाग होता. नेपथ्यकार राजन भिसे होते, तर प्रकाशयोजनाकार होते राकेश सारंग. १९९५ साली या नाटकाने सुमारे १५ प्रयोगांची मजल मारली, ही मोठी कौतुकाचीच बाब होती.
रंगमंचावर नाटक छान चाललं आहे. एखादं कानेटकरी कौटुंबिक नाटक चालल्याचा भास होतोय. प्रयोग ऐन रंगात आलाय. आणि अचानक रंगमंचावरचं एक पात्र पिस्तुल घेतं आणि थेट प्रेक्षकांकडे रोखत चाप ओढतं. गोळी सुटल्याचा आवाज येतो आणि त्याच क्षणी एक प्रेक्षक गँगवेमध्ये धाड्दिशी कोसळतो. गडबड-गोंधळ उडतो. माणसं धावत येऊन पडलेल्या माणसाला उचलून आत नेतात. पूर्वार्धाचा पडदा पडतो. ‘आणि म्हणून कुणीही’ या नाटकाचा हा पहिला अंक. १९७७ च्या राज्य नाटय़स्पर्धेत या नाटकाने सवरेत्कृष्ट नाटय़निर्मितीचे पारितोषिक मिळवलं. दिग्दर्शनाचं पहिलं पारितोषिकही याच नाटकाच्या दिग्दर्शनाबद्दल दिलीप कुळकर्णी यांनी पटकावलं. वैयक्तिक अभिनयाची पारितोषिके चित्रा पालेकर व अबोली यांना मिळाली.
पारंपरिक मेलोड्रामा आणि वास्तवनाटय़, रहस्यनाटय़ आणि नाटकातील रहस्य, खरा खून आणि खुनाचे नाटक, खरा प्रियकर, काल्पनिक प्रियकर आणि प्रेक्षागृहातली व्यक्ती, खरी शिक्षा आणि शिक्षेची केवळ कल्पना अशा सर्व परस्परविरोधी घटकांचा नाटककाराने या नाटकात प्रकट केलेला खेळ दिग्दर्शकाने आपल्या चातुर्याने विलक्षण प्रभावी केला होता.
या प्रयोगातली प्रकाशयोजनेची एक युक्ती आजही आठवते. चित्रा पालेकर रंगमंचावर विशिष्ट स्थळी येऊन बोलत उभी राहते आणि अचानक तिच्यावर वेगळाच प्रकाशझोत पडतो. अचानक ती साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभी राहिल्याचं दृश्य दिसतं. केवळ प्रकाशयोजनेच्या साहाय्याने कोर्ट व साक्षीदाराचा पिंजरा उभा करण्याचं हे गिमिक नाटकाच्या एकूण स्वभावाला पोषकच ठरलं.
भारतीय भाषांतील अशा नाटकांबरोबरच भारतीय नाटककारांनी इंग्रजी भाषेतून जी नाटकं लिहिली, त्याचीही भाषांतरं मराठी रंगमंचावर आली. चेतन दातार यांनी केलेले ‘डुंगाजी हाऊस’चे भाषांतर आणि ग्रिव्ह पटेललिखित ‘मि. बेहराम’ या नाटकाचा शांता गोखले यांनी केलेला अनुवाद ही अगदी अलीकडची ‘इंग्रजी इनटु मराठी’ उदाहरणे आहेत.
वेगवेगळ्या प्रकारची प्रायोगिक नाटकं करण्याबरोबरच राज्य नाटय़स्पर्धेने अमराठी भारतीय नाटकांचीही महाराष्ट्राला ओळख करून दिली. स्पर्धेच्या या कृतीमुळे काही नाटकांची मराठी रूपांतरे व्यावसायिक रंगभूमीवरही आली. देशातील अन्यभाषिक रंगभूमीचे स्वरूप परिचित होण्यास त्यामुळे मदत झाली.
आज निकृष्ट दर्जाची मराठी नाटकं मोठमोठय़ा जाहिरातींचा भडिमार करून रंगमंचावर आणण्यापेक्षा काही चांगल्या अमराठी नाटकांची रूपांतरे रंगभूमीवर आणली गेली तर ते रंगभूमीच्या प्रगतीच्या दृष्टीने अधिक श्रेयस्कर ठरेल. म्हणून अमराठी नाटकांचंही मराठी रंगभूमीनं स्वागत करणं आवश्यक आहे. कालच्या स्पर्धेनं हेच तर पटवून दिलं आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jul 2013 रोजी प्रकाशित
‘आणि म्हणून’ अमराठीही!
वेगवेगळ्या प्रकारची प्रायोगिक नाटकं करण्याबरोबरच राज्य नाटय़स्पर्धेने अमराठी भारतीय नाटकांचीही महाराष्ट्राला ओळख करून दिली. स्पर्धेच्या या कृतीमुळे काही नाटकांची मराठी रूपांतरे व्यावसायिक रंगभूमीवरही आली. देशातील अन्यभाषिक रंगभूमीचे स्वरूप परिचित होण्यास त्यामुळे मदत झाली. निकृष्ट दर्जाची मराठी नाटकं मोठय़ा जाहिरातींचा भडिमार करून रंगमंचावर आणण्यापेक्षा काही चांगल्या अमराठी नाटकांची रूपांतरे रंगभूमीवर आणली गेली तर ते रंगभूमीच्या प्रगतीच्या दृष्टीने अधिक श्रेयस्कर ठरेल यात काहीच शंका नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 07-07-2013 at 12:13 IST
मराठीतील सर्व नाटकबिटक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Non marathi plays translated in marathi