इतिहासाच्या विस्तृत पटावर एखाद्या तुलनेने नवजात राष्ट्राच्या आयुष्यातील २५ वर्षांचा काळ खूप मोठा म्हणता नाही येणार. पण पाकिस्तानसारख्या सतत राजकीय, सामाजिक, धार्मिक उलथापालथींना सामोऱ्या जात असलेल्या राष्ट्राच्या इतिहासात या एवढय़ा काळातही नोंदवून ठेवण्यासारख्या पुष्कळच घटना घडल्या
पुस्तकातील लेखांचा कालखंड १९८५ पासूनचा असून त्यातील शेवटचा लेख २०१० सालचा आहे. ‘जंग’, ‘नवाए-वक्त’, ‘डॉन’ इत्यादी पाकिस्तानी वृत्तपत्रं-नियतकालिकांमध्ये तेथील घडामोडींचे पडणारे प्रतििबब
धर्मावर आधारित राजकारण, वेळोवेळी दिली जाणारी इस्लामीकरणाची हाक, दहशतवाद यामुळे पाकिस्तानचे कट्टरतावादी रूप वेळोवेळी पुढे येत असले तरीही लोकशाहीवादी, पुरोगामी विचार मांडणाऱ्या विचारवंतांचा आवाजही या भूमीमध्ये सातत्याने ऐकू येत राहिला आहे. अशरफ यांच्या लेखांमध्ये अशा आवाजांना प्रामुख्याने स्थान दिले गेले आहे. मग तो इक्बाल यांच्या विचारांवरून झडणाऱ्या वादविवादांचा विषय असो, राजकीय दडपशाहीचा सामना करत वाटचाल करणाऱ्या तेथील पुरोगामी लेखक संघाच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडणारा लेख असो, लाहोरमध्ये रुजलेल्या रंगभूमीच्या चळवळीचा विषय असो किंवा परंपरेने चालत असलेल्या उर्दू-पंजाबी सुफी संत-कवींच्या उरूसांचे वर्णन असो. पाकिस्तानातील ही उदारमतवादी विचारधारा नेमके काय सांगू पाहत आहे याची झलक या लेखांतून मिळते. त्यातही व्यक्तिचित्रणात्मक लेख विशेषत्वाने वाचण्यासारखे आहेत.
‘पाकिस्तानात ‘मे’ दिन’, ‘पाकिस्तान शोधतो आहे संस्कृतीची मुळे’, ‘सांस्कृतिक वेगळेपणाची वेदना’, ‘रसिकराज लाहोर’ अशा लेखांमधून पाकिस्तानचे सांस्कृतिक संचित, त्यामागचा इतिहास, पाकिस्तानातील मूळच्या मिश्र संस्कृतीची पाळेमुळे याबद्दलचे अनेक संदर्भ सहज सापडतात. फाळणीच्या वेळी तेथे गेलेले भारतीय मुस्लीम, बांगलादेशी मुस्लीम, त्याचबरोबर िहदू, पारशी, ख्रिश्चन असे काही गट पाकिस्तानातील अल्पसंख्य समाजात मोडतात. या समाजासमोरील बिकट प्रश्नही काही लेखांमधून मांडले गेले आहेत. तसेच अन्सार बर्नी यांच्यासारख्या काही लढाऊ समाजसेवकांची व्यक्तिचित्रणेही यात आहेत.
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध नेहमीच सौहार्द आणि तणावाच्या दरम्यान झुलत राहतात. या नाजूक विषयावर निरीक्षकाच्या तटस्थ दृष्टिकोनातून अशरफ यांनी टीका केलेली दिसते. पाकिस्तानी समाज-संस्कृतीविषयी कुतूहलाने वाचताना आपल्याच समाजातल्या अनेक वास्तवांवर या लेखांतून नकळत बोट ठेवले गेलेले दिसते. मात्र लेखांतील निवेदनाचा सूर अत्यंत संयत आहे. सहवेदनेचा आहे. त्यामुळे ‘आपण-ते’ ही नेहमीची ढोबळ विभागणी येथे उरत नाही.
२५ वर्षांच्या या काळात पाकिस्तानच्या राजकीय पटलावर अनेक बदल घडले, राजवटी बदलल्या. या संग्रहातील लेखांना त्या साऱ्या घडामोडींचे तत्कालीन संदर्भ आहेत. हिरा जनार्दन यांनी या लेखांचा मराठी अनुवाद केला असून त्यात मूळ िहदी भाषेच्या मांडणीचा बाज तसाच आहे. ‘आपण एकमेकांचा दुस्वास का करतो?’ या प्रश्नाचा हा लेखसंग्रह समंजसपणे विचार करण्यास मदत करणारा आहे.
‘पाकिस्तान : समाज आणि संस्कृती’ – फिरोज अशरफ, अनुवाद – हिरा जनार्दन, लोकवाड्मय गृह, मुंबई, पाने- २३२, मूल्य- ३०० रुपये.