वसंतराव देसाईंना संगीत साहाय्यक म्हणून लाभलेले वसंतराव आचरेकर, वाद्यवृंद संयोजक सॅबेस्टियन, इनॉक डॅनियल्स, सनी कॅस्टेलिनो यांचाही महत्त्वाचा वाटा या गाण्यांच्या यशामध्ये होता. वसंत आचरेकर, माधव पवार या तालवाद्यांतल्या ‘दादा’ माणसांनी वाजवलेले डौलदार, स्वच्छ ठेके ऐकणं म्हणजे निखळ
गाण्यांत काही विशेष ‘साऊंडस्’ वापरण्यात वसंतरावांचा हातखंडा होता.echo effect चा पहिला वापर वसंतरावांनीच केला. ‘जो दर्द बनके आया’ (पर्बत पे अपना डेरा (१९४४) हे ते गाणं. शिवाय, बलाच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज (जीवन से लंबे है) कधीतरी प्रत्यक्ष अनुभवलेल्या झाडाच्या फांद्या वाऱ्याने एकमेकांवर घासल्याचा, वाऱ्याने दार आपटल्याचा आवाज (मं गाऊँ तू चुप हो जा) असे अनेक साऊंडस् त्यांनी वापरले. हा आवाज ‘पाइप तरंग’वर काढल्याचे घडावादक वसंत सामंत सांगतात. ‘उमड घुमड’ किंवा ‘सया झूठों का बडा’ मधला तो ‘कोका’ आठवा.. चित्रपट माध्यमावर विलक्षण पकड असल्यामुळे चित्रपटांना पाश्र्वसंगीत देण्यातही वसंतदा निष्णात होते. सुबह हा तारा, गीत गाया पत्थरोंने अशा अन्य संगीतकारांची गाणी असणाऱ्या चित्रपटांना पाश्र्वसंगीत मात्र वसंतरावांचं होतं. ‘अचानक’सारख्या वेगळ्या गीतविहीन चित्रपटातही त्यांनी परिणामकारक पाश्र्वसंगीत दिलं.
मृतप्राय होत असलेल्या मराठी संगीत नाटकात संजीवनी फुंकत पंडितराज जगन्नाथ, जय जय गौरीशंकर, प्रीतीसंगम, देव दीनाघरी धावला.. यासारख्या अनेक नाटकांना वसंतरावांनी संगीत दिलं. आणि कुमार गंधर्वाकडून आपल्याला ‘उठी उठी गोपाळा’ ऐकायला मिळालं.. ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’ मध्ये कुमारांचे मराठी शब्द, ‘जल्म जल्मलो’ ऐकताना गंमत वाटते.. ‘कधी गहिवरलो कधी धुसफुसलो’ मधला अभिनय ऐकण्यासारखा.. सुंदर छोटय़ा छोटय़ा तानांनी नटलेलं हे पद, वाणीच्या आवाजाचीसुद्धा एक वेगळी धार दाखवून जाते. .
‘लोकशाहीर राम जोशी’, ‘अमर भूपाळी’, ‘साखरपुडा’, ‘श्यामची आई’, ‘मोलकरीण’ सारखे चित्रपट म्हणजे मराठी चित्रपट संगीताला एका वेगळ्या उंचीवर नेणारे मलाचे दगडच. ‘घडी घडी अरे मनमोहना’ हे गाणं बारकाईनं पाहिलतं, तर त्याची सुरुवात किती वेगळी आहे हे जाणवेल. तो अत्यंत ग्रेसफुल ठेका.. त्यावर गद्य/पद्याच्या सीमेवरचे ‘छबीदार.’ हे शब्द, एक सुरेख स्टेप घेऊन संध्याचं येणं.. ‘नको रे बोलू ‘मशी’ हे खास शब्द.. सगळंच विलोभनीय! ‘भरम धरील जन तुझा नि माझा ’, किंवा ‘कुठे दिसे ना दुजा पुरुष मज तुजसम रे देखणा’ हे धिटाईचे शब्द फार वेगळे वाटतात ऐकायला. ‘सुंदरा मनामधी भरली.’ चा जोश, मर्दानगी काही और, तर ‘घनश्याम सुंदरा’च्या रूपाने अजरामर, खरोखरच ‘अमर’ भूपाळी आपल्या संगीताचं वैभव वाढवून गेली. अशी अत्यंत पवित्र, सात्त्विक भाव जागृत करणारी सुरावट बांधावी तर ती वसंतरावांनीच.. शुभ्रधवल वस्त्रांकिता सरस्वतीच साकार व्हावी तशी ही भूपाळी, या जगात जे जे म्हणून मांगल्यमय आहे, सर्व विकारांच्या पलीकडचं, निर्मळ.. अत्यंत शुद्ध.. देवटाक्याच्या पाण्यासारखं आहे, ते स्वरात साकारल्यासारखं वाटतं.. ‘आनंदकंदा, प्रभात झालीऽऽ’ हा स्वर किती निरागस लागावा! त्या स्वराला कुठल्याही विकाराचा स्पर्शच नाही. स्वच्छ निळ्या आकाशासारखा अथांग.. ‘घनश्याम सुंदरा’ या एका भूपाळीनं, मराठी चित्रपटसंगीत कुठल्या कुठे नेलं. ‘लटपट लटपट तुझं चालणं’ सारखी लावणी बघायला गेलं तर तशी साधी चाल. पण ‘नारी गं.’ वरची फिरत अप्रतिम, मध्ये वाजवलेल्या टाळ्या.. ‘बोलणं गं मंजुळ मनेचं’ म्हणताना माडगूळकरांच्या भाषेत खडीसाखर आणि गुलाब एकत्र यावेत तितका गोड लागलेला लताबाईंचा आवाज.. ‘दिसे नार सुकुमार नरम गाल व्हट पवळी’सारख्या चार शब्दांत जे शाहीर सांगतात, ते चार पानांतही सांगता येणं कठीण. अत्यंत ठसकेबाज केरवा, पायावर ठेका धरायला लावतो. तब्बल ६५ वर्षांनतरही टिकून राहते ही मेलडी! यातच सगळं आलं.. ‘सांगा मुकुंद कुणी हा पाहिला’, सारखं चतन्यमय गाणं, आजही मफलीत ‘जान’ आणतं, याचा अनुभव मी घेतलाय. ‘तुझ्या प्रीतीचे दुख मला’सारख्या चाली इतक्या ताकदीच्या आहेत, की एकदा ऐकूनही त्या विसरल्या जात नाहीत. याच गाण्यांवरचा थोडय़ा हलक्या मूडचं ‘बडे भोले हो हसते हो’ हे िहदी गीतही गाजलं.
‘श्यामची आई’चं संगीत तर ‘मातृप्रेमाचं महन्मंगल स्रोत्रच! ‘भरजरी ग पीतांबर’ ला परंपरेशी नातं राखत दिलेली चाल, ‘आई कुणा म्हणू मी’ तर विलक्षण. घरी दारी नसणाऱ्या आईला शोधणारं ते मूल.. त्याची तडफड.. तो हंबरडा. काळीज पिळवटून टाकणारा..
वसंतरावांच्या काही सुंदर मेलडींची चर्चा जाता जाता..
झिरझिर बरसे सावनी अखियाँ (गुलजार, आशीर्वाद)
खमाज आणि गौडमल्हारचं अद्भुत मिश्रण असलेल्या या गाण्याला, आधी ‘सावनी’ अखियाँ हे गुलजारचे शब्दच वेगळेपण देतात. डोळ्यांना, ‘सावनी’ हे विशेषण किती वेगळया मूडचं! किती तरल.. त्यातला तो ‘घर आऽऽ’ दोन्ही निषाद मस्त दाखवून जातोच. पण अंतऱ्यांची बांधणीही किती कल्पक, संतुरची ती रेशमी रिमझिम किती नाजूक! दोन्ही अंतरे वेगळे, त्यांच्या ’linking ओळीसुद्धा वेगळ्या, पण येतात एकाच जागी. दोन सुंदर पायवाटांनी डोंगराच्या एकाच शिखरावर पोचावं, तशा..!
अखियाँ भूल गयी है सोना (भरत व्यास, गूँज उठी शहनाई)
लता-गीताचं खेळकर, खटय़ाळ गाणं. दोघींच्या आवाजातली खासियत ओळखून त्याचा कल्पक उपयोग करून घेत, विलक्षण सुंदर बांधलेलं गाणं. यातला स्त्री कोरसही अप्रतिम. यात ‘सोना.’ ‘जादूटोना’ या शब्दांना गीता दत्त जे ‘सोडते’ ते खास ऐकण्यासारखं. त्यात तो ‘चिडवण्याचा’ मूड मस्त जमतो..
‘शहनाईवाले तेरी शहनाई रे करेजवा को
चीर गई चीर गईचीऽऽर गई.’
म्हणताना, शेवटचा ‘चीऽऽर गई’ फार सुंदर.
‘सखियाँ न मार मोहे ताने
जिसको न लागी वो क्या जाने’
म्हणत लताबाईंची एन्ट्री होते.. त्यातल्या आवाजातलं मार्दव आणि elegance आधीच्या त्या आवाजांच्या पाश्र्वभूमीवर उठून दिसणारा..
कैसे बचके रहोगी, आहे भरके कहोगी,
में तो हार गई, हार गई हार गई.
ही लांबलचक ओळ लताबाई एका श्वासात गातात, आणि आपलाच दम कोंडतो.. शेवटचा ‘हार गई’ ऐकताना काळजातलं गुपित ओठांवर आल्याचा अत्यंत गोड ‘फील’ येतो.
उमड घुमड कर आयी रे घटा (दो आँखे बारह हाथ- भरत व्यास)
मस्त रांगडी सुरुवात आणि भरत व्यासांची ती विलक्षण नादमयी अनुप्रास शैली..
सन सनन सन पवन का मदन ‘तीर’
बादल को ‘चीर’ निकला रे ‘नीर’
सरसरसरसरसर धार झरे
हो धरती जलसे माँगभरे.
नन्ही नन्ही बूंदनियों की सनन सनन सन बन्सरी
बजाती आयी, देखो भाई बरखा दुल्हनिया.
हे शब्द नुसते म्हटले तरी रोमांच उभे राहतात. तर स्वरस्पर्श झाल्यावर ‘उमडघुमडकर’ हा भाग संपता संपता आतूनच ठेका बदलतो. आणि लताबाईंचा अंतरा, विलक्षण दमश्वास वापरत त्या गातात. त्यात कारी कारी. या ‘इ’ काराच्या वेळी ताल थांबतो, आणि पुन्हा सुरू होतो. जणू त्या शब्दांना अधांतरी उचलून घेतलंय वरच्या वर. एकाच गाण्यात, किती गोष्टींना दाद द्यायची..
आयी परी रंग भरी (दो फूल)
दोन अंतऱ्यांमध्ये, ‘सरगम’ चा सुंदर उपयोग म्युझिक पीस म्हणून करत, एक वेगळंच गाणं वसंतरावांनी दिलंय. मंद्रातला धवत त्या गाण्याला एक वेगळा ‘तोल’ देतो. कारण ‘पुकारा’वर मध्य धवत आहे. गाणं जणू दोन्ही सप्तकातल्या धवतांवर तोलून धरलंय.. यातला कोरससुद्धा ‘पुकारा’ शब्दावर सुंदर गमक घेऊन येतो.. ‘पगसा’ ही फ्रेज आशाबाईंच्या आवाजातून आणि कोरसमधून लागोपाठ येते. कमी ऐकलं जाणारं पण खूप वेगळं गाणं!
याशिवाय, ‘कल्पना के घन बरसते’ (अमर ज्योती) ‘देखा है सपना कोई’ (यादें) हीसुद्धा खूप वेगळी सुंदर गाणी. ‘झनक झनक पायल बाजे’ साठी गाणी करताना, वसंतरावांनी आणि त्यांच्या सर्व साथीदारांनी किती अथक मेहनत केली असेल याची कल्पनाच केलेली बरी. कथ्थकचे तोडे, तबल्याचे बोल आणि शब्दांची ती अचूक गुंफण, प्रचंड तालमीशिवाय आणि परफेक्शनशिवाय साध्य होणं शक्यच नाही. ‘मुरली मनोहर’ ऐकताना, शब्दांनुरूप जाणारे तबल्याचे बोल.. त्यावरचं चपखल लयबद्ध नृत्य.. श्वास रोखून ती रचना आपण अनुभवतो.
त्यातही, मध्येच नीलाचं गिरधरकडे पाहणं, लाजणं, नाचाच्या स्टेप्स चुकणं आणि गुरुजींचं ‘नीला!’ असं ओरडणं.. सगळं इतकं नसíगक. पण ‘बसवायला’ खूप अवघड.
विलक्षण देशभक्ती असलेला आणि स्वत:च्या कृतीतून खरोखरच ती बांधिलकी सिद्ध करणारा संगीतकार म्हणून वसंतरावांचं नाव आदरानं घेतलं जातं. ‘एक सूर एक ताल’च्या माध्यमातून लाखो मुलांना शिकवलेली देशभक्तीपर गीतं म्हणजे त्यांच्या शिरपेचातला मानाचा तुराच. ‘जिंकू किंवा मरू’चा जोश आजही कायम आहे.. वसंतरावांनी ही बांधिलकी शेवटच्या श्वासापर्यंत जपली.
२२ डिसेंबर १९७५ पर्यंत या जगात परमेश्वर होता.. या दिवशी मात्र त्याचं अस्तित्व त्यानं स्वत:च पुसून टाकलं. तब्येतीने खणखणीत, उत्साहाचा अखंड धबधबा असलेल्या या सुरेल सुकुमार व्यक्तिमत्त्वाच्या त्यानं लिफ्टमध्ये एका क्षणात चिंधडय़ा उडवल्या.. खरंच या अशा मार्गाने वसंतरावांचं आयुष्य संपवल्याबद्दल देवाने स्वत:लाच शिक्षा का करून घेऊ नये? वसंतरावांच्या ‘अशा’ जाण्याची जखम काळानेही भरून निघाली नाही. काळजात या घटनेची कळ तेवढय़ाच जोरात आजही उठते..
दारूला स्पर्श न करता, अॅवॉर्ड्स ‘मॅनेज’न करता, बिनाका गीतमालेची पर्वा न करता, नावाची प्रचंड ‘क्रेझ’ वगरे निर्माण न करताही िहदी-मराठी चित्रपट संगीतावर चिरंतन नाममुद्रा उमटवणाऱ्या या मनस्वी कलाकाराला मानाचा मुजरा!
संग्रहित लेख, दिनांक 5th Oct 2014 रोजी प्रकाशित
घनश्याम सुंदरा..
वसंतराव देसाईंना संगीत साहाय्यक म्हणून लाभलेले वसंतराव आचरेकर, वाद्यवृंद संयोजक सॅबेस्टियन, इनॉक डॅनियल्स, सनी कॅस्टेलिनो यांचाही महत्त्वाचा वाटा या गाण्यांच्या यशामध्ये होता.

First published on: 05-10-2014 at 01:06 IST
मराठीतील सर्व रहे ना रहे हम बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasantrao achrekar use special sounds in music