आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन आणि महाराष्ट्राने घवघवीत यश पदरी दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात महाराष्ट्राला झुकते माप दिले आहे. प्रादेशिक आणि जातीधर्माचा समन्वय साधताना मोदी यांनी प्रवक्त्यांनाही मंत्रिपदाचा लाभ दिला आहे. भाजपच्या बरोबरीने यश संपादन केलेल्या आणि रालोआतील जुना सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला मात्र केवळ एकच मंत्रीपद बहाल करण्याच्या कृतीतून त्यांना फारसे महत्व देत नसल्याचे दाखवून दिले आहे.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे माजी राष्ट्रीय अध्यक्ष असून गेली काही वर्षे ते राष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेत. अपेक्षेप्रमाणे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आणि विदर्भाला प्रतिनिधीत्व मिळाले. ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हे ओबीसी समाजाचे व मराठवाडय़ातील आहेत. त्याचबरोबर दीर्घकाळ खासदार राहिलेले रावसाहेब दानवे हे मराठा समाजाचे असून मराठवाडय़ातील नेते आहेत. मुंबईत महायुतीला घवघवीत यश मिळाले व सहाही जागा निवडून आल्या. पियूष गोयल हे राज्यसभेतील खासदार असून मुंबईचे आहेत. गोयल हे भाजपचे राष्ट्रीय खजिनदार व भाजपचे जुने निष्ठावंत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेला एकच मंत्रिपद
महायुतीने राज्यात ४२ जागा पटकावताना शिवसेनेने १८ जागा मिळविल्या. मात्र त्या तुलनेत त्यांना केवळ एकच मंत्रिपद मिळाल्याने शिवसेना नाराज आहे. भविष्यात मंत्रिमंडळ विस्तार लगेच होईल, ही शक्यता धूसर आहे. त्यामुळे त्यांना किती काळ वाट पहायला लागणार, याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या भूमिकेवर त्यांना आणखी किती मंत्रीपदे मिळतील, हे अवलंबून राहील.

प्रवक्ते मंत्रिमंडळात
मोदी यांची प्रसिध्दीमाध्यमांमधील छबी सर्वसामान्यांना भिडली व त्याचा मोदींच्या यशात मोठा वाटा आहे. त्यामुळे पक्षाच्या प्रवक्त्यांना मोदी यांची चांगली संधी दिली आहे. रवि शंकर प्रसाद, निर्मला सीतारामन, स्मृती इराणी आणि प्रकाश जावडेकर यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. त्यापैकी महिलांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या स्मृती इराणी मुंबईच्या आणि जावडेकर हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. नजमा हेपतुल्ला या अल्पसंख्याक समाजातील आहेत.

मराठवाडय़ात जल्लोष
औरंगाबाद : केंद्रीय मंत्रिमंडळात मराठवाडय़ातून गोपीनाथ मुंडे व रावसाहेब दानवेया दोघांचा प्रथमच समावेश झाल्याच्या वृत्ताने बीड व जालना या दोन्ही जिल्ह्य़ांमध्ये सोमवारी जल्लोष करण्यात आला. ‘अच्छे दिन आने वाले हैं’ असे म्हणत भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले. राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकून उभा राहणारा नेता अशी मुंडे यांची ओळख आहे. भाजपशी एकनिष्ट राहत सातत्याने निवडून येणाऱ्या जालन्याचे रावसाहेब दानवे यांनाही प्रथमच मंत्रिपद मिळाल्याने मराठवाडय़ाचा विकासातील मागासलेपणा दूर होण्यास आता मदत होईल, असा दावा भाजपचे कार्यकर्ते करीत आहेत.

रायगडमध्येही उत्साह
अलिबाग : अनंत गीते यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशानंतर रायगड जिल्ह्य़ात उत्साहाचे वातावरण आहे. जिल्ह्य़ातील विविध भागांत फटाक्यांची आतषबाजी करून सेना-भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. आता त्यांच्यावर कोणत्या मंत्रिपदाची जबाबदारी टाकली जाते याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. नवीन मंत्रिमंडळात आपण पहिल्या ५ मध्ये असू, हे अनंत गीते यांचे शब्द खरे ठरले आहेत. बॅ. ए. आर. अंतुले यांच्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होणारे ते दुसरे खासदार ठरले आहेत, तर कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांची ही दुसरी टर्म असणार आहे.

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6 mps from maharashtra feature in narendra modis cabinet