गेली अनेक वर्षे भाजपसोबत असलेले आमदार अनिल गोटे धुळ्याच्या उमेदवारीवरून ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर भडकले असून राज्यातील धनगर मतदारांनी भाजपविरोधात मतदान करावे, यासाठी त्यांनी मोहीम सुरू केली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी जवळीक साधण्यापेक्षा ‘यापैकी कोणीही नाही’ या पर्यायाचा वापर करून माळी धनगर वंजारी समाजातील लोकांनीही संघटित होऊन मुंडे यांचा ‘माधव फॉम्र्युला’ उधळावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे गोटे यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.
गोटे महायुतीमध्ये नसले तरी त्यांची प्रदीर्घ साथ भाजपला राहिली. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्षाबरोबरच धनगर, वंजारी व अन्य समाजातील नेत्यांना भाजपसोबत आणण्यासाठी मुंडे यांनी पावले उचलली. महादेव जानकर, राजू शेट्टी यांना महायुतीमध्ये घेतले. गोटे हे भाजपबरोबर असल्याचे त्यांच्यासह अनेक नेत्यांनी जाहीरपणेही सांगितले होते. धुळे मतदारसंघातून गोटे यांनी निवडणूक लढवावी, असे मुंडे यांनीच गेल्या वर्षी सांगितले होते. पण हा शब्द फिरवून सुभाष भामरे यांना उमेदवारी दिल्याने गोटे संतापले आहेत.
उमेदवारी मागायला गेले नसताना अवमान केल्याने आता मुंडे व भाजपविरोधात त्यांनी संघर्षांची भूमिका घेतली आहे. मुंडे यांचा उल्लेख ‘कपटी मित्र’ असा करून ते धनगर समाजातील मतदारांची संख्या लाखापेक्षा अधिक असलेल्या राज्यातील १६ मतदारसंघात विशेष मोहीम राबविणार आहेत. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात किमान ३० हजार धनगर समाजाची मते फिरतील आणि ते ‘यापैकी कोणीही नाही’ या पर्यायाचा वापर करतील व आपली ताकद दाखवितील, असे गोटे म्हणाले. केवळ धनगरच नाही, तर माळी व वंजारी समाजातील मुंडेंव्यतिरिक्त कोणाला भाजपने उमेदवारी दिली, असा त्यांचा सवाल आहे.
शरद पवार यांच्या बारामती या कौटुंबिक मतदारसंघात महादेव जानकर हे विजयी होण्याची सुतराम शक्यता नसल्याने त्यांची फसवणूक करून उमेदवारी दिली. ते माढामधून लढले असते, तर विजयी होण्याची शक्यता होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीसाठी मुंडे यांनी ही खेळी केल्याचा आरोप गोटे यांनी केला.
अनिल गोटे हे बराच काळ आमच्याबरोबर होते. त्यांच्या निर्णयामुळे आम्ही व्यथित आहोत. त्यांनी फेरविचार करावा, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.