केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते के. चिरंजीवी यांचे बंधू पवन कल्याण यांनी नवा राजकीय पक्ष स्थापन केला असून त्यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याबद्दल चिरंजीवी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर सीमांध्रमध्ये काँग्रेस पक्षाची स्थिती उत्तम नसल्याचेही चिरंजीवी यांनी मान्य केले आहे. गोध्रा प्रकरणानंतर मोदी यांनी दिलगिरीही व्यक्त केलेली नाही, अशा स्थितीत त्यांची भेट घेण्याची पवन कल्याण यांची कृती योग्य नसल्याचे चिंरजीवी यांनी म्हटले आहे.
पवन कल्याण हे लोकप्रिय तेलगू अभिनेते असून त्यांनी जनसेना पक्ष स्थापन केला आहे. आंधात जनसेना पक्ष आणि भाजपची आघाडी होण्याचे संकेतही कल्याण यांनी दिले आहेत. कौटुंबिक कलहामुळे कल्याण यांनी नवा राजकीय पक्ष स्थापन केल्याच्या वृत्ताचा चिरंजीवी यांनी इन्कार केला. तर घरगुती कलहामुळेच प्रजा राज्यम पक्षही काँग्रेसमध्ये विलीन केल्याचा आरोपही त्यांनी फेटाळले.