लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मोदीमय वातावरण लक्षात घेऊन एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीने विधानसभेसाठीजय्यत तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे तर ‘जिंत मया’ म्हणत शिवसेनेने गुजराती समाजालाच अंगावर घेण्याचा उद्योग केला. हा उद्योग अंगावर येतो असे दिसताच मराठी-गुजराती भाई भाईचा नाराही सेना नेतृत्वाने देऊन टाकला. महाराष्ट्रातील सत्ता मिळविण्यासाठी गुजराती मतांचे समीकरण सेना-भाजप जुळवू लागली असताना लोकसभेच्या केवळ दहाच जागा लढणाऱ्या मनसेमध्ये मात्र ‘सारे काही शांत शांत’ असल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
पंतप्रधानपदासाठी मोदींना पाठिंबा देत महाराष्ट्रात अवघ्या दहाच जागा लढविणाऱ्या मनसेचा जोर यावेळी प्रचारात फारसा जाणवला नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत लाखांनी मते घेणाऱ्या मनसेची पक्षबांधणी नसल्याचा तसेच मोदीलाटेचा फटका या निवडणुकीत मनसेला मोठय़ा प्रमाणात बसण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून जशी व्यक्त करण्यात येत आहे तशीच भीती मनसेच्या काही आमदारांनाही बोलून दाखवली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने अकरा जागा लढविल्या होत्या. त्यापैकी पुणे वगळता अन्यत्र लाखांपेक्षा जास्त मते मनसेला मिळाली होती. यावेळी दहाजागा लढविणाऱ्या मनसेला निम्म्यापैकी जास्त जागांवर लाखापेक्षा कमी मते मिळतील अशी भीती मनसेच्याच पदाधिकाऱ्यांना वाटत आहे. उत्तर मुंबई व ईशान्य मुंबईत मनसेचे आमदार असतानाही लोकसभा निवडणूक न लढविल्याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसू शकतो हे लक्षात घेऊन मुंबईसह राज्यात पक्षबांधणीचा कार्यक्रम राज ठाकरे यांनी तात्काळ हाती घ्यायला हवा, असे मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
विधानसभेत स्वबळावर लढण्याची भूमिका यापूर्वी अनेकदा राज ठाकरे यांनी जाहीर केली असून राज यांनी आता ठोस कार्यक्रम जाहीर करण्याची गरज असल्याचेही या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्यावेळी मुंबईत मनसेमुळे लोकसभेत सेना-भाजपचे सर्व उमेदवार पडले होते. यावेळी परिस्थितीत बदल होऊन सेना-भाजपचे उमेदवार निवडून येणार हे स्पष्ट असताना मुंबई, ठाणे, पुणे व नाशिकसह राज्यातील गेल्यावेळी लढलेल्या विधानसभा मतदारसंघात पक्षबांधणीचा कार्यक्रम राबविण्याची गरज असल्याचे मनसेच्या कार्यकर्त्यांना वाटते. महायुतीमध्ये रिपाइंसह सामील झालेले पक्ष तसेच गुजराती समाजाची मते लक्षात घेऊन मुंबईतील विधानसभेच्या सहाजागा राखणे हे आव्हान असल्याचे मनसेचे आमदारही खासगीत मान्य करताना दिसतात.
मनसेची पक्षबांधणी नसल्याचा तसेच मोदीलाटेचा फटका या निवडणुकीत मनसेला मोठय़ा प्रमाणात बसण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून जशी व्यक्त करण्यात येत आहे तशीच भीती मनसेच्या काही आमदारांनाही बोलून दाखवली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th May 2014 रोजी प्रकाशित
मनसेत सारे काही शांत शांत!
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मोदीमय वातावरण लक्षात घेऊन एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीने विधानसभेसाठीजय्यत तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे

First published on: 05-05-2014 at 02:21 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Everything cool in mns