खासदार गोपीनाथ मुंडे यांनी प्रचारासाठी आणलेल्या खासगी कंपनीच्या हेलिकॉप्टर पायलटला मारहाण केल्याप्रकरणी चार दिवसांनंतर फौजदार धरमसिंह चव्हाण यांच्या तक्रारीवरून भाजपचे प्रचारप्रमुख प्रवीण घुगे यांच्यासह १० कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड लोकसभेचे उमेदवार मुंडे तीन एप्रिल रोजी शिवसंग्राम संघटनेच्या मेळाव्यासाठी मुंबईहून रेमंड या खासगी कंपनीच्या हेलिकॉप्टरने दुपारी आले. मेळाव्यानंतर मुंडे यांनी पायलटला केज तालुक्यातील विडा येथे चलण्यास सांगितले. मात्र पायलटकडे मुंबई ते बीड, बीड ते परळी असाच मार्ग आखून दिलेला अक्षांश रेखांश होता. त्यामुळे पायलटने विडा येथे जाण्यास परवानगी घ्यावी लागेल आणि त्यासाठी एक तास लागेल असे सांगितले. त्यावेळी मुंडेंनी टीका करताच पायलटनेही प्रतिउत्तर दिले. कार्यकर्त्यांसमोर वाद नको म्हणून मुंडे गाडीत बसून निघून गेले. मुंडे जाताच पायलटला घेरले आणि साहेबांशी उद्धट वर्तन का केले म्हणत मारहाण केली.