भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य बुधवारी मतदानानंतर ठरेल. सातव्या टप्प्यात सात राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशातील एकूण ८९ जागांसाठी मतदान होणार आहे. तसेच आंध्र प्रदेशात विधानसभेच्या ११९ जागांसाठीही मतदान होणार आहे.
आतापर्यंत ३४९ मतदारसंघांमध्ये मतदान झाले असून सुमारे ३५ कोटी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. गतवेळी याच जागांवर झालेल्या मतदानाची टक्केवारी ५७.५३ इतकी होती, जी यंदा वाढून ६६ टक्क्य़ांवर गेली आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. त्यामुळे आज ८९ जागांवर होणाऱ्या मतदानाच्या टक्केवारीवरून बरीच समीकरणे स्पष्ट होतील. देशात ‘मोदी लाट’ असल्याची ‘लिटमस चाचणी’ गुजरातमध्ये होणार आहे.
शिरोमणी अकाली दलासमवेत सत्तेत सहभागी असलेल्या भारतीय जनता पक्षाला ही निवडणूक सोपी नाही. पंजाबमधील युवकांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता आणि विद्यामन अकाली दल सरकारमधील मंत्र्यांवर ‘अंमली पदार्थाच्या तस्करी’विषयी होणारे आरोप यामुळे भाजपसमोर कडवे आव्हान आहे. अमृतसरमधून अरुण जेटली मैदानात उतरले आहेत. त्यांचा सामना माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमिरदर सिंह यांच्याशी होणार आहे. उत्तर प्रदेशातील लखनौमधून राजनाथ सिंह, रायबरेलीतून सोनिया गांधी तर कोळसामंत्री श्रीप्रकाश जयस्वाल कानपूर लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत. यापैकी राजनाथ सिंह व सोनिया गांधी यांच्या विजयाचा दावा स्वपक्षीयाकडून करण्यात येत असला; तरी कुणाला सर्वाधिक मताधिक्य यावर कार्यकर्तेच पैजा लावत आहेत. बंगालमधील श्रीरामपूर लोकसभा मतदारसंघातून संगीतकार बप्पी लहरी यांना भाजपने उमेदवारी बहाल केली. तेलंगणानिर्मितीच्या निर्णयामुळे आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेस चाचपडत आहे.
डाव्यांच्या अस्तित्वाची लढाई
तिसऱ्या आघाडीसाठी मोर्चेबांधणी करण्यात डावे पक्ष नेहमीच आघाडीवर असतात. त्यामुळ पश्चिम बंगालमधील ९ जागांवर होणारे मतदान महत्त्वाचे मानले जात आहे. मोदींवरील टिकेमुळे मोठय़ा प्रमाणावर मुस्लीम मते तृणमूलकडे वळू शकतात. अन् नवमतदार डाव्या पक्षांकडे वळण्याची शक्यता नाही. तेव्हा आता नवमतदारच भाजपचे अन् डाव्यांचे भवितव्य ठरवतील.
दृष्टीक्षेपात मतदान..
निवडणुकीचा टप्पा – सातवा
लोकसभेच्या जागा – ८९
मतदार – १३ कोटी ८३ लाख
कुठे – सात राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेश
गुजरात (२६), जम्मू-काश्मीर व दादरा व नगर हवेली आणि दीव दमणच्या प्रत्येकी एक, पंजाब (१३), उत्तर प्रदेश (१४), पश्चिम बंगाल (९) तर आंध्र प्रदेश (१७) जागा
प्रमुख उमेदवार
फारूख अब्दुल्ला ,अरुण जेटली , राजनाथ सिंह, सोनिया गांधी, श्रीप्रकाश जयस्वाल , मुरली मनोहर जोशी, बप्पी लहरी, ज्येष्ठ पत्रकार चंदन मित्रा, शरद यादव, राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव