काँग्रेसच्या मंगळवारी जाहीर झालेल्या यादीत यवतमाळच्या उमेदवारीबाबत कोणताही निर्णय झाला नाही. मात्र, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची दाट शक्यता आहे. स्वत माणिकराव आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. परंतु त्यांच्या मुलाला काही जणांनी विरोध दर्शवला आहे. चंद्रपूरमध्ये नरेश पुगलिया यांना डावलून सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. औरंगाबादमधील जागेचा मात्र तिढा तिसऱ्या यादीतही सुटू शकलेला नाही. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा हे औरंगाबादमधून लढण्यासाठी उत्सुक नाहीत. त्यामुळे या जागेचा तिढा कायम आहे. राष्ट्रवादीने तीन मंत्र्यांना रिंगणात उतरविले आहे. संजय देवतळे व आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना उमेदवारी जाहीर झाल्याने आघाडी सरकारमधील पाचही मंत्र्यांपुढे निवडून येण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. अ. भा. युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव हे हिंगोली तर प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम हे पुण्यातून असे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील अध्यक्ष आपले भवितव्य राज्यातून अजमविणार आहेत, हे विशेष.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manikrao gavit will battle election form yavatmal