कार्यकर्त्यांच्या ७-८ गाडय़ांचा ताफा, प्रत्येक विभागातील विभाग अध्यक्षांशी सतत संपर्क करत मनसे उमेदवार आदित्य शिरोडकर मतदार संघात पक्षाचा प्रभाव असलेल्या विभागांमध्ये दिवसभर फिरत होते. अणुशक्तीनगर परिसरात बुधवारी रात्री शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमधील झटापटीमुळे रात्रभर त्यांचे जागरण झाले. तरीही शिरोडकर सकाळी कार्यकर्ते घराखाली पोहाचण्यापूर्वीच ७.४५च्या सुमारास माहीमच्या व्हिक्टोरीया हायस्कूलमध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावून आले. दादर येथील प्रकाश हॉटेलच्या मागच्या गल्लीतील मातोश्री हाईट्स या इमारतीत १९व्या मजल्यावरील शिरोडकर यांचे निवासस्थान. त्यांच्याच मतदारसंघात राज ठाकरे यांचे निवासस्थान आणि मतदार केंद्र असल्यामुळे त्यांचे मतदान झाल्यावर संपूर्ण मतदार संघात फिरण्याचे त्यांनी ठरविले होते. त्यानुसार १०.३०च्या सुमारास शिरोडकर यांची गाडी बालमोहन शाळेच्या दिशेने निघाली राज यांना आणण्यासाठी आमदार नितीन देसाई एव्हेंजर या बाईकने राज यांच्या निवासस्थानी पोहोचले. राज कुटुंबीय तसेच बंटी कुत्रा याच्यासोबत चालत बालमोहनपर्यंत आले. मतदानानंतर त्यांना घरी पोहचवून ११ च्या सुमारास शिरोडकर चेंबूरच्या दिशेने निघाले.  चेंबूरला कार्यकर्त्यांचे चहापान आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. तेथून ताफा जॉय रुग्णालयाच्या दिशने रवाना झाला. आदल्या रात्री राडय़ात जखमी झालेल्या पोलीस हवालदारांच्या प्रकृतीची विचारपूस  केली. तेथून मग प्रतीक्षानगर परिसरात त्यांचा ताफा पोहाचला.  मतदारसंघातील विविध बुथवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधत ४ च्या सुमारास दौरा आटोपून ते पुन्हा निवासस्थानी पोहोचले.