सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूमधाम आहे. भारतातील अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव म्हणून याकडे पाहिले जाते. नवरात्रोत्सव हा सण दुर्गा देवीला समर्पित केला जातो. भारतात दोन वेळा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यातील एक वसंत नवरात्र आणि दुसरी म्हणजे शारदीय नवरात्र. नवरात्रात प्रत्येक दिवसाला आई दुर्गेच्या वेगवेगळया रूपाची पूजा केली जाते. यात कुमारी, पार्वती आणि काली रूपाचे पूजन महत्त्वाचे मानले जाते. नवरात्रोत्सवात अष्टमीला फार महत्त्व दिले जाते. त्याला एक विशिष्ट कारणही आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आई दुर्गेची नऊ रुपे आहेत. नवरात्र उत्सवाच्या प्रत्येक दिवशी देवीच्या एका विशिष्ट रूपाची पूजा केली जाते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कृष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धीदात्री अशी यांची नावे आहेत. नवरात्रीची एक दंतकथा फार प्रसिद्ध आहे. प्राचीन काळी दुर्गम नावाचा एक दृष्ट आणि क्रूर राक्षस होता. तो खूप शक्तिशाली होता. त्याने पृथ्वी, आकाश आणि ब्रह्मांड या तिन्हीलोकी अत्याचार सुरु केले. त्याची दहशत इतकी प्रचंड होती की या तिन्ही लोकातील देव कैलासात निघून गेले.
आणखी वाचा : Navratri 2023: नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग हे कसं ठरतं?

कोणत्याही देवाला त्याचा नाश करणे शक्य होत नव्हते. तसेच त्याला शिक्षाही करता येत नव्हती. यानंतर सर्व देवतांनी भगवान शिव शंकराला या प्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी विनंती केली. यानंतर शेवटी भगवान शिव शंकराने एक मार्ग शोधून काढला. त्याने त्याची सर्व ऊर्जा एकत्र करत शुक्ल पक्षात अष्टमीला देवी दुर्गेला जन्म दिला. या देवीला त्याने सर्वात शक्तीशाली शस्त्र देऊन राक्षसचा वध करण्याचे आदेश दिले. दुर्गा देवीने दुर्गम नावाच्या राक्षसाचा वध केला. त्यानंतर दुर्गाष्टमीची सुरुवात झाली.

अष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीने महिषासूर राक्षसाचा वध करत विजय मिळविला होता. पौराणिक कथेनुसार या दिवशी दुर्गा देवीने रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे या दिवसाला देवी भद्रकालीच्या रूपाने देखील ओळखले जाते. या दिवशी राक्षसाचा वध करत देवीने संपूर्ण ब्रह्माण्डाला भयमुक्त केले होते. हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. दुर्गाअष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीच्या शस्त्रांची पूजा केली जाते. शस्त्रांच्या प्रदर्शनामुळे हा दिवस विराटष्टमी म्हणूनही प्रसिद्ध आहे.

अष्टमीचे नेमके महत्त्व काय?

पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवात अष्टमी तिथीला खूप महत्त्व आहे. यावर्षी रविवार २२ ऑक्टोबर रोजी श्रीमहालक्ष्मी पूजन आहे. तांदळाच्या पिठाचा महालक्ष्मीचा मुखवटा करतात. रात्रभर घागरी फुंकत जागरण करतात. कोकणस्थांमध्ये नवीन लग्न होऊन सासरी आलेली मुलगी पाच वर्षे महालक्ष्मी पूजन करते.

तर महाष्टमीच्या दिवशी कडक उपवास करून नवार्ण यंत्राची आणि दुर्गेची पूजा करतात. तसेच या दिवशी होम करुन सप्तशतीचा पाठ करतात. अष्टमी तिथी संपण्यापूर्वीची २४ मिनिटे आणि नवमी तिथी प्रारंभाची २४ मिनिटे या कालाला संधीकाल म्हणतात. यावर्षी सोमवार २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.२६ मिनिटांपासून ते ६.४४ मिनिटांपर्यंत संधीकाल आहे. यावेळी भगवती देवी आणि दीपपूजा करतात. श्रीसूक्ताचे पठण करतात. महानवमीलाही कडक उपवास करतात.

आणखी वाचा : नवरात्रोत्सव ‘नऊ दिवस’च साजरा का होतो?

महागौरी रुपाची पूजा

अष्टमीला नवदुर्गेचा आठवा अवतार महागौरीचा असतो. तसेच या दिवशी दुर्गाष्टमी असते. या दिवशी संधीपूजा केली जाते म्हणून अष्टमी तिथी महत्त्वाची असते. संधीकालात केलेल्या पूजेला संधीपूजा म्हणतात. यावेळी १०८ दीप लावतात. होम करतात. प्राचीनकाळी पशूबळी देण्याची प्रथा होती. पण आधुनिक काळात कोहळा कापला जातो.

अष्टमीच्या दिवशी माँ दुर्गेच्या महागौरी रुपाची पूजा केली जाते. या दिवशी महागौरीच्या रुपाची तुलना शंख, चंद्र किंवा चमेलीच्या पांढऱ्या रंगाशी केली जाते. या रुपात महागौरी लहान मुलासारखी निरागस दिसते. या दिवशी देवीकडे शांती आणि दयाळूपणा येतो. या दिवशी तिचे चार हात आशीर्वाद देण्याच्या मुद्रेत असतात. या दिवशी उपवास करणाऱ्या भक्तांना देवी संरक्षण, समृद्धी, व्यवसायात नफा, विकास, यश आणि जीवनात शांती मिळते, अशी श्रद्धा आहे.

मराठीतील सर्व लोक उत्सव बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navratri 2023 why durga ashtami celebrate know date puja time and importance behind nrp