scorecardresearch

नवरात्रोत्सव ‘नऊ दिवस’च साजरा का होतो?

नवरात्रात प्रत्येक दिवसाला आई दुर्गेच्या वेगवेगळया रूपाची पूजा केली जाते. यात कुमारी, पार्वती आणि काली रूपाचे पूजन महत्त्वाचे मानले जाते.

नवरात्रोत्सव ‘नऊ दिवस’च साजरा का होतो?
नवरात्र हा नऊ दिवसच का साजरा केला जातो? यामागे एक महत्त्वाचे कारण आहे.

‘सर्व मंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते’ हा श्लोक ऐकला की फार प्रसन्न वाटतं. सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. आपल्याकडे आजही अनेक जुन्या प्रथा, परंपरा, सण अतिशय भक्तिभावाने आणि निष्ठेने साजरे केले जातात. त्यातीलच एक सण म्हणजे नवरात्र… या उत्सवाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतातील अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव म्हणून याकडे पाहिले जाते. नवरात्रोत्सव हा दुर्गा देवीला समर्पित केला जातो. पण नवरात्र हा नऊ दिवसच का साजरा केला जातो? यामागे एक महत्त्वाचे कारण आहे.

संस्कृतमध्ये नवरात्र या शब्दाचा अर्थ “नऊ रात्री” असा आहे. या नऊ रात्री वेगवेगळया देवींची पूजा केली जाते. दहाव्या दिवशी विजयादशमी अर्थात दसरा असल्याने हा दिवस साडे तीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. सर्वत्र शारदीय नवरात्र म्हणून हा उत्सव प्रसिद्ध आहे. अनेक भाविक आपापल्या कुळाचाराप्रमाणे नवरात्रौत्सवात घटस्थापना करतात. नवरात्राच्या पहिल्या तीन दिवसात दुर्गेची पूजा केली जाते. या सर्व देवी ऊर्जा आणि शक्तीची देवता मानल्या जातात. नवरात्रात प्रत्येक दिवसाला आई दुर्गेच्या वेगवेगळया रूपाची पूजा केली जाते. यात कुमारी, पार्वती आणि काली रूपाचे पूजन महत्त्वाचे मानले जाते.
आणखी वाचा : नवरात्रीचे नऊ रंग नेमके कसे ठरवले जातात? जाणून घ्या यामागे दडलेले गुपित

पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्याकडे हिंदू धर्मात श्रावण महिन्यातील उपवासालाही विशिष्ट कारणं आहेत. पूर्वी घरात धान्य नसायचं. श्रावणात पावसाळा असल्याने नवीन धान्य अश्विन महिन्यात घरात यायचं. त्यामुळे पूर्वी श्रावण, भाद्रपद महिन्यात काहीही नसायचे म्हणून उपवास करा असे सांगितले जायचे.

पितृपक्षात सूर्य हा दक्षिण गोलार्धात प्रवेश करतो. दक्षिण गोलार्ध हा पितरांचा आणि उत्तर गोलार्ध हा देवांचा अशी प्राचीन ग्रंथात नोंद आहे. २३ सप्टेंबरला सूर्य हा दक्षिण गोलार्धात प्रवेश करतो हे विज्ञान आहे. म्हणून पितृपक्ष हा त्या काळात आहे.

तसेच भाद्रपद महिन्यात मातीच्या गणेश मूर्तीचे पूजन करा, असे सांगितलेले आहे. त्याचे कारण म्हणजे त्यावेळी पृथ्वी ही धान्य तयार करत असते आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त व्हावी त्यामुळे मातीचे पूजन करा, म्हणूनच मातीची मूर्ती असते. पूर्वी घरी मूर्ती आणत नव्हते. शेतावर जायचं तिथेच पूजा करायची आणि लगेच तिथेच विसर्जन करायचे. अजूनही दक्षिण भारतात ही प्रथा सुरु आहे. त्यानंतर पितृपक्ष येतो, यात ज्याने आपल्याला जमीन ठेवली, पैसे ठेवले, शेती ठेवली त्यांचे स्मरण करणं, अशी श्रद्धा होती.
आणखी वाचा : मासिक पाळीच्या ‘त्या’ गोळ्या घेणं योग्य की अयोग्य?

नवरात्रोत्सव नऊ दिवसांचाच का?

नवरात्रीत सृजन शक्तीची पूजा असते. कारण त्यावेळी धान्य घरात येते. सृजन शक्ती आणि नऊ अंक याचं साम्य आहे. बी पेरल्यानंतर ९ दिवसात ते अंकुरते. गर्भधारणा झाल्यापासून ९ महिने ९ दिवसांनी मूल जन्माला येते. त्यामुळे निर्मिती किंवा सृजन म्हटलं की नऊ. त्यामुळे नऊ या संख्येला ब्रह्मसंख्या म्हटले जाते. जास्तीत जास्त मोठा अंक नऊ आहे, म्हणूनच नवरात्र ही नऊ दिवसांची मानली जाते. ती सृजन शक्तीची पूजा असते. या सर्व गोष्टी ऋतू आणि शेतीचे चक्र यावर आधारित आहे, असेही पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी म्हटले.

दरम्यान सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी देवीचा उत्सव साजरा केला जात आहे. कॉलेजपासून ऑफिसपर्यंत आणि ट्रेनपासून ते अगदी प्रत्येक लहान मोठ्या चाळीत नवरात्रीच्या नऊ रंगाचे राज्य सर्वत्र पाहायला मिळतं आहे. नवरात्र हा स्त्रियांसाठी मनसोक्त आनंद लुटण्याचा सण मानला जातो. नवरात्र म्हटलं की गरबा-दांडिया रास आणि ठिकठिकाणी तालावर थिरकणारे पाय या गोष्टी पाहायला मिळत आहे. दिवसागणिक हा उत्साह वाढत जाणार असून यंदाची नवरात्र कोविडच्या दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर येणारी निर्बंधमुक्त असल्याने खासच आहे.

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या