Navratri 2023 Marathi News : नवरात्र हा आदिशक्तीचा सण मानला जातो. महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातील विविध भागांत नवरात्र हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी, असे तिचे नाव रूढ झाले. या तिच्या शक्ती रूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजली जाते. दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण, मंगल व कल्याण करणाऱ्या आदिमाया शक्तीचे या काळात पूजन केले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशी देवीची नऊ रूपे आहेत; ज्यांचे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पूजन केले जाते. महाराष्ट्रात माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तश्रृंगी देवी अशी देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. नवरात्रोत्सवातील नऊ दिवस येथे मोठी यात्रा भरते. देशभरातून भक्त या देवींच्या दर्शनासाठी येथे येतात.

पितृपक्ष संपत आला की, शरद ऋतूची चाहूल लागते. शारदीय नवरात्रोत्सवाला आपल्याकडे खूप महत्त्व दिले जाते. यंदा शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात रविवार (१५ ऑक्टोबर)पासून होणार आहे. प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना किंवा कलश स्थापना करून, दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. नवरात्रोत्सवामध्ये गुरुवारी (१९ ऑक्टोबर) ललिता पंचमीच्या दिवशी ललिता देवीची पूजा केली जाते. २१ ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन असून, त्या दिवशी घागरी फुंकण्याचा कार्यक्रम केला जातो. २२ ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी किंवा महाष्टमीचा उपवास केला जातो. नवमीला म्हणजेच २३ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन म्हणजेच नवरात्र समाप्ती असून, २४ ऑक्टोबर रोजी दसरा आहे. नवरात्रीनंतर दहाव्या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो.

हेही वाचा – नवरात्रीचे उपवास करताय? कसा असावा तुमचा आहार? मधुमेही अथवा गर्भवती महिलांनी उपवास करावा का?

घटनस्थापना केव्हा केली जाते?

“अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जातो. कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते. काही जणांकडे देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करतात; तर काही जणांकडे कलश मांडतात, त्याला घटस्थापना म्हणतात. घटस्थापनेचा विशेष असा मुहूर्त नाही. “अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी दिवसभरात केव्हाही ही पूजा मांडू शकता. एकदा ती पूजा मांडली की नऊ दिवस ती हलवत नाहीत. या नऊ रात्री देवीपुढे तेल किंवा तुपाचा अखंड दीप प्रज्वलित केला जातो. देवीची त्रिकाल पूजा केली जाते. म्हणजे दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते. दुपारच्या पूजेनंतर नऊ दिवस फुलांची माळ बांधली जाते.” अशी माहिती गुरुजी अवधूत शेंबेकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

घटनस्थापना करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. कुणाकडे उठता-बसता सवाष्ण, कुठे अष्टमीला, तर कुठे नवमीला ब्राह्मण, सवाष्ण जेवू घालतात. कुणाकडे कुमारिकेचे भोजन असते. नवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी होमहवन असते. पुरणावरच स्वयंपाक असतो. बरेच जण नऊ दिवस उपवास करतात. काही घरांमध्ये देवीचा गोंधळही घातला जातो.

अशी केली जाते घटनस्थापना

१. प्रत्येकाने आपल्या कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावे. शेतातील माती आणून, तिचा दोन बोटांचा जाड चौकोनी थर लावावा. त्यात पाच किंवा सात धान्ये टाकावीत घालावी. उदा. जवस, गहू, तीळ, मूग, राळे, सावे व चणे इ.

२. मातीचा किंवा तांब्याचा कलश घेऊन, त्यात पाणी, गंध, फुले, दूर्वा, अक्षता, सुपारी, पंचरत्ने किंवा नाणे इत्यादी वस्तू घालाव्यात आणि मातीच्या मधोमध कलशाची स्थापना करावी.

३. सप्तधान्ये आणि कलशस्थापनेचे वैदिक मंत्र येत नसल्यास पुराणोक्त मंत्र म्हणावेत. तेही येत नसल्यास, त्या त्या वस्तूचे नाम घेऊन ‘समर्पयामि’ म्हणून नाममंत्रांचा विनियोग करावा. कलशामध्ये माळ पोहोचेल अशी बांधावी.

४. अखंड दीपप्रज्वलन, त्या देवीचे ग्रंथवाचन, देवीची भजने, स्तोत्रांची पारायणे करावीत. त्यामध्ये देवीचे माहात्म्यपठण (चंडीपाठ), सप्तशतीपाठ, देवी भागवत, ब्रह्मांडपुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण, ललितापूजन, सरस्वतीपूजन, उपवास, जागरण इत्यादी गोष्टी प्रत्येकाच्या क्षमता आणि सामर्थ्यानुसार कराव्यात.

हेही वाचा – नवरात्रीत नथ जिंकण्याची सुवर्णसंधी! ‘तू ही दुर्गा’ उपक्रमात सहभाग कसा घ्यायचा?

देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत

देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे. देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी.

भोंडला
भोंडला हा नवरात्रीमध्ये महिलांनी एकत्र येत साजरा करायचा एक अनोखा खेळ आहे. पाटावर हत्ती काढून, त्याच्याभोवती मैत्रिणींसह फेर धरून, गाणी म्हटली जातात. त्यामध्ये शेवटी खिरापत ओळखण्याची पद्धत असते आणि नंतर ती एकत्र मिळून खाल्ली जाते. शाळांमध्ये भोंडला आयोजित केला जातो. आता या भोंडल्याचे प्रमाण कमी झाले आहे.

मराठीतील सर्व लोक उत्सव बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shardiya navratri 2023 date puja vidhi durga puja celebration snk