X
X

ज्यांना मोठं केलं त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, खडसेंचा फडणवीसांना टोला

READ IN APP

ज्यांना मोठं केलं त्यांच्याकडून अपेक्षा नव्हती

ज्यांना आम्ही मोठं केलं त्यांच्याकडून आम्हाला छळाची अपेक्षा नव्हती, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. पाच वर्षात गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक उभारु शकले नाहीत अशीही टीका खडसे यांनी केली. मुंडे अपघात विमा योजना सुरु करण्याचं काम मी केलं होतं असंही खडसे यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे या वाघीण आहेत. आम्ही हजारोंच्या संख्येने त्यांच्यासोबत आहोत असंही खडसेंनी म्हटलं आहे.

भाजपाचं आजचं चित्र राज्यात उभं राहिलं ते जनतेला मान्य नाही असं म्हणत गोपीनाथ गडावर एकनाथ खडसे यांनी पक्षातली खदखद बाहेर आणली. एवढंच नाही पंकजा मुंडे यांचा निवडणुकीतला पराभव ठरवून केला गेला आहे, असा आरोपही खडसे यांनी केला. “आपल्या लोकांनीच माझंही नुकसान केलं असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष उभारणीसाठी आयुष्य वेचलं. त्यामुळेच तुम्ही, मंत्री झालात, मुख्यमंत्री झालात. मात्र त्याच गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीला पाडण्याचं पाप तुमच्या डोक्यात कसं आलं? आपोआप पक्ष सोडून गेलं पाहिजे ही नीती पक्षातल्या लोकांकडून राबवली जाते आहे ती योग्य नाही” असंही खडसे यांनी म्हटलं आहे. “छळायचं, मारायचं, दुर्लक्ष करायचं आणि मग म्हणायचं की गोपीनाथजी असते तर एकनाथ खडसेच मुख्यमंत्री झाले असते” याला काहीही अर्थ नाही. एकनाथ खडसे यांच्या भाषणाच्या रुपाने भाजपातली खदखद चव्हाट्यावर आली आहे.

गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर संघर्ष केला. तोच संघर्ष आणि तसाच्या तसा संघर्ष आज माझ्या वाट्याला आला आहे. मी तसाच संघर्ष आज अनुभवतो आहे असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं. जिथे गोपीनाथ तिथे एकनाथ असं ते कायम म्हणायचे. आजही तो आवाज येईल असं वाटतं. मात्र तसं होत नाही. भाजपा मला आजही प्रिय आहे. मात्र भाजपाचं जे आज चित्र आहे ते महाराष्ट्राला मान्य नाही.

“शेठजी-भटजींचा पक्ष असं म्हणून भाजपाला हिणवलं जात असे. मात्र या पक्षाला बहुजनांचा पक्ष म्हणून ओळख मिळवून दिली ती गोपीनाथ मुंडे यांनी. गोपीनाथ मुंडे यांच्या आणि पंकजाताई यांच्या प्रेमापोटी इथे लोक आले आहेत. मुंडे यांच्या काळातला भाजपा हा पक्ष आम्ही अनुभवला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांची साथ कधीही सोडणार नाही” असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. खुल्या आणि मोकळ्या मनाने गोपीनाथ मुंडे यांनी कार्यकर्ते घडवले. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर संघर्ष केला मात्र त्यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसला नाही. गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांनी शक्तीप्रदर्शन केलं. या निमित्त जो मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात एकनाथ खडसे बोलत होते.

24
X