शहापूर तालुक्यामधील वेहळोली गावातील मुक्तजीवन सोसायटीच्या फार्ममधील ३०० हून अधिक देशी कोंबड्या आणि बदके बर्ड फ्लू मूळे मृत पावल्याची माहिती समोर आली होती. जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून शुक्रवार सकाळी सात वाजेपर्यंत बाधित ठिकाणच्या एक किलोमीटर परिघातील सुमारे २३ हजार ३८९ कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये १५ हजार ४६७ ब्रॉयलर आणि ७ हजार ९२२ अंडी देणाऱ्या कोंबड्या यांचा समावेश आहे. तसेच सुमारे ३० बदके, अंडी आणि पशु खाद्य नष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या बर्ड फ्ल्यू आजाराबाबतच्या नियमावलीनुसार बाधित क्षेत्राच्या १० किलोमीटर परिघातील सर्व फार्ममधील आणि नागरिकांनी घरी पाळलेल्या कोंबड्यांचे सर्वेक्षण केले जाणार असून त्या कोंबड्यांचे नमुने दर १५ दिवसांनी तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती शहापूर पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी दर्शन दळवी यांनी दिली.
शहापूर तालुक्यातील वासिंद येथील वेहळोली गावातील मुक्तजीवन सोसायटीच्या फार्ममधील देशी कोंबड्या आणि बदके गेल्या काही दिवसांपासून मृत पावत होती. याबाबत मुक्तजीवन सोसायटीने वासिंद येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला माहिती दिली होती. यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी फार्ममधील कोंबड्या आणि बदकांवर औषधोपचार सुरु केले होते. त्यानंतरही कोंबड्या दगावत होत्या. यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत कोंबड्यांचे शवविच्छेदनाचे आणि जिवंत कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने पुणे येथील रोग अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी ११ फेब्रुवारीला पाठविले होते. त्या अहवालातून त्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याचे निष्पन्न झाले होते.
या पार्श्वभूमीवर बाधितक्षेत्र संसर्गमुक्त होईपर्यंत बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिघातील चिकन विक्रेते आणि वाहतूकदारांचे दैनंदिन कामकाज रोखण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच शहापूर मधील वेहळोली गाव वगळता ठाणे जिल्ह्यातील इतर कोणत्याही गावात आणि तालुक्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला नसल्याने नागरिकांनी घाबरून नये असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
अशा केल्या कोंबड्या नष्ट
जिल्हा पशुसंवर्धन विभागतर्फे बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिघातील सुमारे २३ हजार ३८९ कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आल्या आहेत. या कोंबडयांना संबंधित फार्मच्या आवारात काही फूट खोल खड्डा खणून त्यात पुरण्यात आले. तसेच संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून त्या कोंबड्यांवर पुरण्याआधी चुना आणि काही रसायनांची फवारणी करण्यात आली.