पंढरपूर : उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे धरणांमधून मोठय़ा प्रमाणात पाण्यचा विसर्ग सुरू आहे. उजनी धरणातून ६० हजार क्युसेकचा तर वीर धरणातून १७ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. तर नाझरे धरणातून कऱ्हा नदीत १५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. कऱ्हा नदीचे पाणी निरा नदीत मिसळत आहे. त्यामुळे भीमा नदी पात्राच्या पाणी पातळीत  वाढ होत असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “आधी खिसा कापणारे मग किराणा वाटणारे महाठग आणि…” बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर बोचरी टीका!

यंदाच्या हंगामात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील आणि उजनी धरण १०० टक्के भरली आहेत. मात्र पुणे जिल्ह्यात आणि उजनी धरण लाभक्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. परिणामी भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. भीमा नदी पात्रात सध्या ३० हजार ७५९ क्युसेक पाणी वाहत आहे.  त्यामुळे दगडी पूल  तसेच नदीवरील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर, मुंढेवाडी, पूळूज हे  ६ बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> तेव्हा ‘हा’ समंजसपणा कुठे जातो? पुण्याच्या पावसावरून फडणवीसांना पेडणेकरांचा खोचक सवाल; म्हणाल्या, “पुण्याची सत्ता…”

भीमा  नदीपात्रात १ लाख १५ हजार  क्युसेक विसर्ग आल्यावर नदीकाठी असणाऱ्या व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरते. नदीपात्रात जर १ लाख ३८  हजार  क्युसेक विसर्ग आल्यावर  गोपाळपूर येथील नवीन पुलावर पाणी येते. सध्या वाढता विसर्ग पाहता नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेऊन सतर्कता बाळगावी. असे आवाहनही प्रांताधिकारी गुरव यांनी केली आहे. भीमा नदीवरील पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर, मुंढेवाडी, पुळूज हे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली जात असल्याने या बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक बंद राहणार आहे. नदीकाठच्या  गावातील नागरिकांना सतर्कता बाळगावी. नदीपात्रात उतरू नये. स्थानिक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, तलाठी, मंडलअधिकारी, पोलीस पाटील पूरस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी. प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 60 thousand cusecs of water released from ujani dam zws