अलिबाग : रायगड जिल्ह्यातील 707 अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत नसल्यामुळे ग्रामपंचायत इमारत, समाजमंदिर किंवा अन्य ठिकाणी चिमुकल्यांना अभ्यासाचे धडे गिरवावे लागत आहेत. त्यामुळे शिक्षणाचा श्रीगणेशा होत असलेल्या ज्ञानमंदिरांची अवस्था अतिशय बिकट झाली असून, दर्जेदार, मोकळ्या वातावरणातील शिक्षणाच्या अधिकारापासूनच वंचित राहण्याची वेळ मुलांवर आली आहे.
जिल्ह्यात तीन हजार 161 अंगणवाड्या आहेत. यापैकी दोन हजार 454 अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत असल्याने भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. उर्वरित अंगणवाडी केंद्रांना मात्र स्वतंत्र इमारती नाहीत. लहान मुलांना मोकळ्या आणि हवेशीर वातावरणात शिक्षण देणे गरजेचे आहे. अनेक अंगणवाड्यांना हक्काची जागा नसल्यामुळे अपुऱ्या आणि सोयी-सुविधांचा अभाव असलेल्या ठिकाणी अंगणवाड्या चालवण्यात येतात. भाडयाच्या जागेमध्ये असल्याने तेथे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देता येत नाहीत.
स्वतंत्र इमारत नसल्याने अडचण
जिल्ह्यात तीन हजार 161 अंगणवाड्या कार्यरत आहेत. यामधून मुलांना ज्ञान दिले जाते. पण हक्काची जागा नसल्यामुळे लोकवस्तीत तसेच भाड्याच्या खोलीत असलेल्या ज्ञानमंदिरांचा आजूबाजूचा गोंगाटामुळे मुलांच्या अभ्यासावर विपरित परिणाम होण्याची भीती जास्त आहे.
लहान मुलांना खेळण्याची विशेष आवड असते. हसत-खेळत शिक्षणाचे धडे दिले तर त्यांचा विकासही चांगला होतो. मात्र जागेची समस्या असल्याने चिमुरड्यांच्या खेळण्यावरच मर्यादा आल्या आहेत. लोकवस्तीत अंगणवाड्या असल्याने मुलांना खेळवायचे कसे, असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे. भाड्याच्या जागेत अंगणवाड्या चालतात, अशा ठिकाणी जागेची अडचण जाणवते. परिणामी पोषण आहार शिजवताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे अंगणवाड्यांना हक्काची जागा मिळणे गरजेचे आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे रायगड जिल्ह्यात चे मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करतात. मात्र त्यांच्याच जिल्ह्यात अंगणवाड्यांच्या इमारतींची कमतरता आहे.
अंगणवाडीचा लाभ घेणारी बालके – 115410
अंगणवाडीचा लाभ घेणाऱ्या माता – 17 हजार 815
जिल्ह्यात तीन हजार 161 अंगणवाड्या असून, यापैकी दोन हजार 454 अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारती आहेत. इमारती नसलेल्या ठिकाणी ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळा, समाजमंदिरात पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंर्गत 273 अंगणवाडी केंद्रांचे बांधकाम मंजुर आहे.बांधकाम पूर्ण होताच त्या ठिकाणी अंगणवाडी भरवली जाईल निर्मला कुचिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण