राहाता: शिर्डी – दिल्ली विमानप्रवासात एका प्रवाशाने हवाई सुंदरीशी असभ्य वर्तन केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रवाशांची येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याने मद्यपान केल्याचे आढळले. त्याला पुढील चौकशीसाठी हजर राहण्याबाबत पोलिसांनी नोटिस दिली आहे.

संदीप सुमेर सिंग(रा. राजस्थान ) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो सैन्यदलात असून तो शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी आला होता. या घटनेबाबत विमान कंपनीचे वरिष्ठ सुरक्षा आधिकारी संतोष कोंडिंबा चौरे (वय ४४, धंदा नोकरी, रा. लोणी, राहाता) यांनी राहाता पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, संबंधित विमानातील हवाई सुंदरीने प्रवासी संदीप सुमेर सिंग याच्या विरोधात विनयभंगाचा लेखी अर्ज दिल्याचे कळवले आहे. या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी संदीप सुमेर सिंगविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा शुक्रवारी दाखल केला. पोलिसांनी संदिप सुमेर सिंग यांची येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. त्याने मद्यपान केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला पुढील चौकशीसाठी हजर राहाण्याबाबात नोटीस बजावुन सोडून दिले.