ज्ञानोबा माऊली, तुकाराम! ज्ञानोबा माऊली, तुकाराम!, विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल!, “विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल!”…..हरिनामाचा जयघोष करत, अनेक अभंग गात दरवर्षी आषाढ महिन्यात लाखो वारकरी पंढरपूर वारीमध्ये सहभागी होतात. पंढरपूर वारीला आषाढी वारी, असेही म्हटले जाते. ही वारी महाराष्ट्रातील सर्वांत पूजनीय आणि शतकानुशतके जुनी तीर्थयात्रा आहे. दरवर्षी देहू येथून तुकोबांची आणि आळंदीहून ज्ञानोबांची पालखी पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीसाठी जाते. पालखीबरोबर लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी चालत जातात. टाळ-मृदंग हातात घेऊन वारकरी विठुनामात हरवून जातात. महिला डोक्यावर तुळस घेऊन पालखीबरोबर चालतात. प्रत्येक गावात पालख्यांचे उत्साहाने स्वागत केले जाते. लाखो भाविक तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पावलांचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून येतात. वारीतील सर्वांत महत्त्वाचं आकर्षण म्हणजे रिंगण सोहळा आहे. ‘याचि देही याचि डोळा’ असा हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी लाखो लोक लांबून लांबून येतात.

रिंगण म्हणजे काय?

“भान हरपून खेळ खेळतो,
दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा,
भक्तिने भारलेला रिंगण सोहळा
पाहावा ‘याचि देही याचि डोळा’”

असं वारीतल्या रिंगण सोहळ्याचं वर्णन केलं जातं. पंढरपूरच्या वारी सोहळ्यात रिंगणाची परंपरा आहे. रिंगण याचा अर्थ वर्तुळाकार, असा होतो. वारीतील रिंगण म्हणजे हा खेळाचा एक प्रकार आहे, असे म्हणता येईल. रिंगण म्हणजे पालखीभोवती गोल फिरणे.

वारीमध्ये रिंगण सोहळा कसा सुरू झाला?(How did the ringan ceremony start in Wari?)

वारीत मराठा सरदार सहभागी होत होते. ते आपले लष्कर घेऊन वारीला येत असत. त्यांनीच वारीत रिंगण सोहळ्याची परंपरा सुरू केली. त्यामुळेच एखाद्या लष्कारी छावणीसारखी रिंगणाची रचना केली जाते. तसेच रिंगण लष्करी शिस्तीप्रमाणे पार पडते.

वारीदरम्यान किती रिंगण सोहळे होतात?(How many ringan ceremony are held during the war?)

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात तरडगावजवळील चांदोबाचा लिंब, वाखरीजवळील बाजीरावाची विहीर व वाखरी अशा तीन; तर माळशिरस, खुडुस फाटा, ठाकूरबुवा समाधी, भंडीशेगावच्या पुढे अशा चार ठिकाणी गोल रिंगण होते. संत तुकोबा महाराजांच्या पालखी सोहळ्यात बेलवंडी, इंदापूर, अकलज, माळीनगर, बाजीरावाची विहीर व वाखरी या ठिकाणी गोल आणि उभ्या रिंगणाची परंपरा आहे.

रिंगणाचे स्वरूप कसे असते?(What is the appearance of the ringan ceremony?)

वारीमधील रिंगण मोठ्या मैदानात पार पडते. वारकरी रिंगणाच्या स्थळी पोहोचले की, चोपदार रिंगण तयार करतात. त्यामध्ये मध्यभागी पालखी असते आणि पालखीच्या सभोवती पताकाधारी वारकरी व दिंड्या असताता. त्याभोवती रिंगणासाठी मोकळी जागा ठेवली जाते आणि पुन्हा त्याभोवती वारकरी, दिंड्या व रिंगण बघायला आलेले भाविक उभे राहतात. रिंगण लावणे हे कौशल्याचं काम आहे. चोपदारांचं कौशल्य व वारकऱ्यांची शिस्त या ठिकाणी दिसून येते. रिंगणामध्ये मोकळ्या ठेवलेल्या मार्गावर – तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, हातात पताका म्हणजे झेंडा घेतलेले वारकरी व विणेकरी हे स्वतंत्ररीत्या पळतात. अश्वांची दौड हे रिंगणाचे मुख्य आकर्षण असते. पालखी सोहळ्यात एक अथवा दोन अश्व सहभागी झालेले असतात. त्यात एका अश्वावर जरी पताका घेतलेला स्वार असतो; तर एक अश्व रिकामा असतो. रिकाम्या अश्वावर संत महाराज बसतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. चोपदार अश्वाला रिंगणाचा मार्ग फिरून दाखवतात. त्यानंतर त्यात अश्व मोकळा सोडतात. अश्व रिंगणाला तीन फेऱ्या मारतात. या वेळेस भाविक ‘माऊली माऊली’, असा गजर करतात.

रिंगणाचे प्रकार (Types of ringan ceremony)

रिंगणाचे गोल रिंगण आणि उभे रिंगण, असे दोन मुख्य प्रकार आहेत. उडीचे रिंगण आणि मेंढी/बकरीचे रिंगण हे उपप्रकार आहेत.

गोल रिंगण

गोल रिंगण म्हणजे सर्व जण गोलाकार स्थितीत असतात आणि त्यामधून अश्वाची दौड होते.

उभे रिंगण

उभे रिंगण म्हणजे दिंड्या वर्तुळाकार उभ्या न राहता, पालखीच्या दोन्ही बाजूंनी समोरासमोर उभ्या राहतात. त्यामधून अश्वाची दौड होते.

उडीचे रिंगण

उडीचे रिंगण हा प्रकार रिंगण सोहळे झाल्यावर असतो. रिंगण झाल्यावर दिंड्यांचे विविध खेळ होतात. हे खेळ होताना टाळ व भजन सुरू असते. त्यामध्ये मध्यभागी पालखी ठेवून, बाजूने पाकळ्यांप्रमाणे रचना करून टाळकरी बसतात. वेगवेगळ्या ठेक्यांवर संतांची भजने होतात. या वर्तुळाच्या बाजूने पखवाजवादक उभे राहून पखवाज वाजवतात.

बकरीचे रिंगण

बकरीचे रिंगण. संत तुकाराम महाराज व संत सोपानकाका पालखी सोहळ्यात मेंढरांचे अथवा बकऱ्यांचे रिंगणसुद्धा होते. पालखी सोहळ्याच्या मार्गावर असलेले शेतकरी भाविक आपली मेंढरे घेऊन येतात. ही मेंढरे रथाभोवती प्रदक्षिणा घालतात. पालखी सोहळ्यात अशा प्रकारे विविध समाजांतील लोक सहभागी होतात