Abdul Sattar महायुतीच्या अडीच वर्षांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. अब्दुल सत्तार यांनी छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी सत्कार सोहळ्यात मी पुन्हा येईन असं वक्तव्य केलं आहे. तसंच पुढील अडीच वर्षात काय होईल हे सांगता येत नाही असंही म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले अब्दुल सत्तार?

“काही लोक धर्माच्या नावाने राजकारण करतात, काही लोक म्हणतात सिल्लोडला येणार, एकाला घरी बसवलं आता दुसरा येत आहे. पण, मी संभाजीनगरमध्ये येणार आणि गुंडगिरी सपंवणार, मंत्री असल्यावर असं कुणीही बोलू शकतं, असं म्हणतअब्दुल सत्तार यांनी नाव न घेता संजय शिरसाट यांच्यावर टीका केली. “कुछ देर तक खामोशी है, फिर कानो में शोर आयेंगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त है, हमारा तो दौर आयेगा” असा शेरही अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना ऐकवला. काही लोक जसा नाला खळखळ करतो, तशी खळखळ करू लागले आहेत. पण, जोपर्यंत शिंदे साहेबांचा माझ्यावर विश्वास आहे, तोपर्यंत मी त्यांचाच आहे, त्यांचाच राहणार, कुठेही जाणार नाही. ज्या दिवशी विश्वास संपला त्या दिवशी तुमच्या आदेशाचं पालन करणार, अजून देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास माझ्यावर आहे, अजितदादांवरही विश्वास आहे. पद येतं आणि जातं असेही सत्तार यांनी म्हटलंय.

हे पण वाचा- मंत्रिपद नाकारल्यावर अब्दुल सत्तार यांचे संभाजीनगरात शक्तिप्रदर्शन

पुढील अडीच वर्षात काय होईल सांगता येत नाही

बाळासाहेब ठाकरेंची सभा व्हायची आणि ती चर्चा वर्षभर राहायची. आज काही नाही, मी एक साधा कार्यकर्ता आहे, आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेल्या कार्यकर्त्यांची परतफेड करण्यासाठी मी कमी पडणार नाही. मला पाच वर्ष मंत्री पदाची संधी मिळाली, पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही. कारण राजकारणामध्ये त्या गोष्टी कधीही पूर्ण होत नाहीत. फक्त आश्वासन दिली जातात, मलाही त्याची जाणीव आहे, असं म्हणत पुढील मंत्रि‍पदावरही त्यांनी भाष्य केलं.

मी पालकमंत्री होतो, तिथं महायुती जिंकली

माझ्या नेत्याने सर्वांना सांगितलं अडीच वर्ष हे राहतील,अडीच वर्षे ते राहतील, तुम्हाला थांबावं लागेल. पण, मी काम करायला कुठेही कमी पडणार नाही, मी चारवेळा मंत्री राहिलो. मी ज्या ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलो,त्या त्या जिल्ह्यात महायुतीचा १०० टक्के विजय झाला आहे. मी धुळ्याचा पालकमंत्री असताना शंभर टक्के महायुती निवडून आली. हिंगोलीतही आले, मी संभाजीनगरचा पालकमंत्री राहिलो इथेही १०० टक्के महायुती निवडून आली. छत्रपती संभाजीनगर हे नामकरण झाल्यावर मी पहिला पालकमंत्री ठरलो, असेही सत्तार यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abdul sattar answer on will yoy leave eknath shinde what did he say scj