Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana: गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती सरकारला मोठं यश मिळालं. या पार्श्वभूमीवर आता सरकार आल्यानंतर लाडक्या बहि‍णींना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कधी होणार? असा प्रश्न विचारला जात आहे. जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेतील हप्ता १५०० वरून २१०० केला जाईल, असं महायुतीनं नमूद केलं होतं. मात्र, अद्याप तो निधी वाढवला नसल्यानं चर्चा सुरू झाली असून त्यासंदर्भात महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी विधानसभेत निवेदन केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाल्या आदिती तटकरे?

लाडकी बहीण योजनेसंदर्भात विरोधकांनी काही लाभार्थी महिलांना वगळण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर आदिती तटकरेंनी यावेळी उत्तर दिलं. “लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय जारी केला तेव्हाच त्यात नमूद करण्यात आलं होतं की १५०० हून अधिकचा आर्थिक लाभ इतर कोणत्या योजनेतून लाभार्थी महिलांना मिळत असेल, तर त्यांना लाडकी बहीण योजना लागू होणार नाही”, असं त्यांनी नमूद केलं.

“नमो शेतकरी महिला योजनेत महिलांना १००० रुपयांचा लाभ मिळतो. शासन निर्णयानुसार प्रत्येक पात्र महिलेला किमान १५०० रुपयांचा लाभ शासनाकडून मिळायला हवा. त्यानुसार नमो शेतकरी महिला योजनेतील लाभार्थी महिलांना त्या योजनेतून १००० रुपये तर वरचे ५०० रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळतात. त्यामुळे त्या महिलांना योजनेतून वगळण्यात आलेलं नाही. २० ते २५ लाख महिला लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याचे आकडे अफवा आहेत”, असं आदिती तटकरेंनी यावेळी सांगितलं.

वरूण सरदेसाईंचे तीन प्रश्न

दरम्यान, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात विधानसभेत तीन प्रश्न उपस्थित केले. “या योजनेसंदर्भात माझे तीन प्रश्न आहेत. पहिला, निवडणुकीपूर्वी योजना जाहीर केली तेव्हा किती लाभार्थी होते? दुसरा, निवडणुकीनंतर सगळे निकष लावले गेले, त्यामुळे नेमक्या किती लाभार्थी महिलांना अपात्र केलं गेलं? आणि तिसरा, सरकारनं सांगितल्याप्रमाणे महिलांना २१०० रुपये देणार आहात की नाहीत?” असे प्रश्न वरुण सरदेसाईंनी आदिती तटकरेंना विचारले.

वरुण सरदेसाईंनी विचारलेल्या प्रश्नांना आदिती तटकरेंनी आकडेवारी मांडत उत्तर दिलं. “ऑक्टोबर २०२४ मध्ये आचारसंहितेच्या आधी लाडकी बहीण योजनेच्या २ कोटी ३३ लाख ६४ हजार लाभार्थी महिला होत्या. फेब्रुवारीत आपण हप्ता दिला तेव्हा लाभार्थी महिलांचा आकडा २ कोटी ४७ लाखाहून जास्त आहे. याचा अर्थ असा की आता लाभार्थी महिलांचा आकडा वाढला आहे”, अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली.

२१०० रुपयांचं काय होणार?

दरम्यान, यावेळी आदिती तटकरेंनी यावेळी २१०० रुपये हप्ता होण्यासंदर्भात उत्तर दिलं. “महायुती सरकारनं ही योजना आणली आहे. महिलांना १५०० रुपयांचा लाभ देणारं महायुतीचं एकमेव सरकार आहे. महिलांना हा लाभ कायम मिळत राहणार आहे. २१०० रुपयांसंदर्भात आमचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून योग्य वेळी निर्णय घेतील. पण लाडक्या बहि‍णींची फसवणूक होणार नाही”, असं आदिती तटकरे म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीसांचं २१०० रुपयांबाबत स्पष्टीकरण

दरम्यान, अर्थसंकल्प सादरीकरणानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लाडकी बहीण योजनेबाबत विचारणा केली असता त्यांनी २१०० रुपयांच्या हप्त्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली.

“लाडकी बहीण योजनेसाठीचा हप्ता २१०० करण्याबाबत आमचं काम चालू आहे. पण त्याचवेळी अर्थसंकल्पाचं संतुलन कायम राखणंही महत्त्वाचं आहे आणि घोषणाही आपल्याला पूर्ण करायची आहे. जर आपल्याला शाश्वत पद्धतीने योजना कायम चालू ठेवायच्या असतील, तर आर्थिक शिस्तही महत्त्वाची आहे. त्यामुळे व्यवस्थित संतुलन करून आम्ही दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करणार आहोत. याचा अर्थ एप्रिल महिन्यात १५०० रुपयेच मिळणार. ज्यावेळी आम्ही २१०० रुपयांची घोषणा करू तेव्हापासून मिळणार”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditi tatkare on ladki bahin yojana 2100 rupees installment in assembly session pmw