आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळी विधानसभेतून निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले त्यानंतर शिंदे गटाकडून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. सोशल मीडियावरही यावर बरीच चर्चा झाली. यानंतर आज आदित्य ठाकरे यांना या विषयाबद्दल माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी एका वाक्यात शिंदे गटाला पुन्हा डिवचलं. ते म्हणाले, “माझ्या वक्तव्यावरुन बरीच चर्चा झाली. सोशल मीडियावर देखील हाच विषय होता. एक नक्की हिला दिया. एवढ्या सर्व लोकांना पुढे करण्याऐवजी त्यांनी स्वतःच सांगितले असते की लढायची हिमंत नाही. तरी चालले असते.” असे सांगत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या ७ फेब्रुवारी रोजी वरळी येथील सत्कार कार्यक्रमात याला काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“चाळीस लोकांनी कुठूनही राजीनामा देऊ द्या किंवा महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक घ्या, आम्ही तयार आहोत. पण आमची लढायची तयारी नाही, एवढं सांगितलं असतं तरी चाललं असतं. त्यासाठी भाजपाला आणि त्यांच्या सोशल मीडियाला सक्रीय करण्याची काय गरज होती? असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वेदांता फॉक्सकॉनबाबत उत्तर आलेले नाही, डाव्होसबाबत काही वक्तव्य आलेले नाही. मात्र इतर गोष्टीवर लगेच त्यांच्याकडून उत्तरं येतात.

आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा आजपासून सुरु होत आहे. नाशिक, जालना, संभाजीनगरमध्ये ही शिवसंवाद यात्रा जाणार आहे.

हे वाचा >> आदित्य ठाकरेंनी शिंदेंना दिलेल्या आव्हानावर शहाजीबापू पाटील यांचा पलटवार, म्हणाले, “आम्ही बारक्या पोराकडून..”

बारक्या पोरोकडून आदित्य ठाकरेंचा पराभव करु

“आदित्य ठाकरे यांनी लवकरच राजीनामा द्यावा आणि मंजूर करुन घ्यावा. त्यांनी टीव्हीवर आव्हान देऊ नये. पटकन राजीनामा लिहायचा आणि राज्यपालांकडे द्यायचा. मग मैदानात उतरण्याचे आव्हान द्यावे. आम्ही बारक्या मुलाकडून त्यांचा पराभव करु”, असे प्रतिआव्हान शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी खास आपल्या शैलीत दिले होते. शहाजीबापू पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्वसामान्य कार्यकर्ता आदित्य ठाकरेंचा वरळीत दारूण पराभव करेल. त्यासाठी एकनाथ शिंदे यांची गरज नाही. एखाद्या फाटक्या माणसाकडून आम्ही तुमचा पराभव करुन दाखवू कारण तुम्ही हिंदूहृदय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडून सत्येसाठी ज्या पद्धतीने तीन वर्षात उलाढाली केल्या. त्या महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या कुठल्याही शिवसैनिकाला आणि शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या माणसाला आवडलेल्या नाहीत.

हे वाचा >> शिंदे – फडणवीस सरकार सत्तारुढ झाल्यानंतर जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च; RTI मधून ‘एवढी’ रक्कम उघड

शिंदे गटाकडून वरळीतील पदाधिकारी खेचण्याचा प्रयत्न

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून वरळी विधानसभेतील ठाकरे गटाच्या नेत्यांना खेचण्याचा प्रयत्न सुरु आहे. नुकतेच वरळीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक संतोष खरात यांनी शिंदे गटात (बाळासाहेबांची शिवसेना) प्रवेश केला आहे. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विशेष करून आदित्य ठाकरेंसाठी हा धक्का असल्याचे मानले जात आहे. वरळीत शिंदे गट सक्रीय झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच निवडणूक लढण्याचे आव्हान दिले आणि त्यानंतर वाद सुरु झाला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray challenge once again cm eknath shinde over worli assembly kvg
First published on: 06-02-2023 at 10:48 IST