नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गेल्या ३६ तासांत ३१ रुग्ण दगावल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. हाफकिनकडून औषधे घेण्यासाठी निधी नसल्याने औषधांचा पुरवठा होऊ शकलेला नाही. परिणामी औषधांच्या कमतरतेमुळे हे मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. नांदेडची घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातही गेल्या २४ तासांत दोन नवजात बालकांसह ८ जणांचा मृत्यू झाला आहे. घाटी रुग्णालयातही औषधांअभावी हे मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. रुग्णालयात औषधं नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना डॉक्टरांनी दिलेल्या औषधांच्या चिठ्ठ्या (प्रिस्क्रिप्शन) घेऊन वणवण फिरावं लागत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या दोन दिवसांत राज्यातील दोन शासकीय रुग्णालयांमध्ये तब्बल ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. औषधांअभावी हे मृत्यू झाल्याचा दावा करत विरोधक राज्य सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. औषधांसाठी निधी नसल्याने रुग्णालयांची ही अवस्था झाली असल्याचं सांगितलं जात आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षांमधील नेते राज्य सरकारला धारेवर धरत आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीदेखील या प्रकरणावरून सरकारच्या कारभारावर बोट ठेवलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट एक्सवर (ट्विटर) एक ट्वीट केलं आहे. यामध्ये ठाकरे यांनी म्हटलं आहे की, कालच नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचं थैमान झाल्याची भीषण धटना घडली असताना, आज तसाच भयानक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयात घडल्याचं समोर येतंय. २ बालकांसह ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नांदेडच्या रुग्णालयातही अजून ७ मृत्यू झाल्याचं समजतंय. हे सगळं भयानक आहे. शासकीय रुग्णालय हा मृत्यूचा सापळा बनलाय का अशी शंका येतेय.

हे ही वाचा >> नांदेडच्या शासकीय रुग्णालयात औषधांअभावी रुग्णांचा मृत्यू? मुख्यमंत्री शिंदे स्पष्टीकरण देत म्हणाले…

आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था या भ्रष्ट मिंधे-भाजपा सरकारच्या काळात कोलमडून गेल्याचं ढळढळीतपणे दिसतंय. लोकांच्या जीवाची यांना पर्वा नाही, परिस्थितीचं गांभीर्य नाही. अशा लोकांना सत्तेच्या खुर्चीत बसून महाराष्ट्र सांभाळण्याचा हक्कच नाही!

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackery slams shinde fadnavis govt over 39 deaths incidents in government hospitals nanded sambhaji nagar asc