agitation started for the demand of solapur flight zws 70 | Loksatta

सोलापूरमधील विमानतळाच्या आंदोलनामागे राजकीय कुरघोडीची किनार; विमानसेवेसाठीच्या आंदोलनाविरोधात प्रतिआंदोलन

देशमुख यांच्या निकटच्या मंडळींपैकी काही जण विमानसेवा सुरू होण्याच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनात आघाडीवर आहेत.

सोलापूरमधील विमानतळाच्या आंदोलनामागे राजकीय कुरघोडीची किनार; विमानसेवेसाठीच्या आंदोलनाविरोधात प्रतिआंदोलन
विजय देशमुख व धर्मराज काडादी

एजाज हुसेन मुजावर, लोकसत्ता

सोलापूर : सोलापूर विमानसेवेच्या मागणीसाठी सुरू झालेले आंदोलन चिघळले आहे. विमानसेवेसाठी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज प्रकल्पाच्या चिमणीचा कथित अडथळा ठरत असल्यामुळे चिमणी पाडून टाकण्याचा विषयही प्रलंबित आहे. याच मुद्दय़ावर सिद्धेश्वर साखर कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांना लक्ष्य बनवून आंदोलन पेटविले जात आहे.

या घडामोडीत सत्ताधारी भाजपसह इतर सर्व राजकीय पक्षांची भूमिका तटस्थ असतानाच भाजपचे आमदार विजय देशमुख आणि धर्मराज काडादी यांच्यात कुरघोडय़ांचे शीतयुद्ध सुरू असल्याचे दिसून येते. विमानसेवेसाठी सुरू असलेल्या आंदोलनामागचा डाव ओळखून काडादी समर्थकांनी बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाची मागणी पुढे रेटत सिद्धेश्वर साखर बचावासाठी प्रतिआंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे शहर व परिसरातील वातावरण तापले आहे.  ५० वर्षांपूर्वी शहरातील होटगी रस्त्यावर दिवंगत नेते मडेप्पा बंडप्पा तथा अप्पासाहेब काडादी यांनी सिद्धेश्वर साखर कारखान्याची उभारणी केली होती. वीरशैव लिंगायत समाजासह इतर सर्व घटकांमध्ये दबदबा राहिलेले माजी खासदार अप्पासाहेब काडादी यांच्या पश्चात त्यांच्याच कुटुंबीयांकडे कारखान्याची सूत्रे चालत आली आहेत. त्यांचे पुत्र मेघराज, नातू धर्मराज आणि सध्या पणतू पुष्पराज याप्रमाणे सत्ताकारण सुरू आहे.

प्रामुख्याने वीरशैव लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या सिद्धाराम साखर कारखान्याशिवाय सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर समितीही वर्षांनुवर्षे काडादी घराण्याच्या ताब्यात आहे. ही दोन्ही संस्था वीरशैव लिंगायत समाजाच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. लिंगायत समाजाने काडादी घराण्यावर वेळोवेळी विश्वास दर्शविल्यामुळे या दोन्ही संस्थांपुरते तरी लिंगायत समाजात काडादी यांचे नायकत्व कायम राहिले आहे. सोलापूर शहर उत्तरचे सलग चौथ्यांदा विधानसभेवर निवडून आलेले भाजपचे आमदार विजय देशमुख हेसुद्धा प्रतिष्ठित अशा देशमुख घराण्यातील आहेत.  शहरात भाजपवर त्यांची मजबूत पकड आहे. लिंगायत समाजाचाच प्रभाव राहिलेल्या आणि राज्यात चौथ्या क्रमांकावर असलेल्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद आमदार विजय देशमुख हे सांभाळत आहेत. ही राजकीय चढती कमान पाहता त्यांची महत्त्वाकांक्षा आणखी वाढली आहे. त्यातूनच संपूर्ण लिंगायत समाजाचे नेतृत्व मिळविण्यासाठी त्यांची सुप्त धडपड सुरू आहे. तर दुसरीकडे धर्मराज काडादी यांनी राजकारणापासून सदैव दूर राहून समाजावर आपला पगडा कायम ठेवला आहे. आमदार विजय देशमुख हे भाजपच्या माध्यमातून राजकारणात यशस्वीपणे वाटचाल करीत असले तरी लिंगायत समाजाचे नेतृत्व मिळत नसल्याची त्यांच्या अंतर्मनात खंत आहे. त्यामुळेच देशमुख आणि काडादी यांच्यात अलीकडे काही वर्षांपासून शीतयुद्ध सुरू आहे.

देशमुख यांच्या निकटच्या मंडळींपैकी काही जण विमानसेवा सुरू होण्याच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनात आघाडीवर आहेत. ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर सुशोभीकरणासह बेकायदेशीर बांधकामप्रकरणी काडादी यांच्यावर फौजदारी कारवाई होण्यासाठी देशमुख यांचे हितचिंतक असलेली मंडळीच पुढे सरसावत आल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यांचा बोलावता धनी कोण, ही बाब लपून राहिली नाही.

या पार्श्वभूमीवर होटगी रस्त्यावर जुन्या विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या नावाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू आहे. आंदोलन चालविणारे केतन शहा यांनी महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या भेटीप्रसंगी धर्मराज काडादी यांचा थेट नामोल्लेख टाळून गुन्हेगार म्हणून संबोधले. त्यामुळे एरव्ही संयमी असणारे धर्मराज काडादी संतापले. त्यांनी आंदोलनस्थळी येऊन केतन शहा यांना जाब विचारत थेट पिस्तूल काढून दाखविले. त्यामुळे वातावरण तापले असून आंदोलन चिघळले आहे. काडादी यांच्याविरोधात शहा यांनी पोलिसांत अद्यापि फिर्याद दिली नाही. शहा यांच्या पाठीशी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी धावून आले आहेत. तर दुसरीकडे धर्मराज काडादी यांच्या बाजूने सिद्धेश्वर साखर कारखान्याचे सर्व संचालकांसह कामगार आणि सुमारे २७ हजार शेतकरी सभासद एकत्र येऊन प्रतिआंदोलनासाठी पुढे सरसावले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बाजूने प्रतिआंदोलन सुरू आहे. या प्रतिआंदोलनात बोरामणीत दोन हजार एकर क्षेत्रात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीचा मुद्दा पुढे आला आहे.  आमदार विजय देशमुख हे विमानसेवा प्रश्नावर स्पष्ट भूमिका जाहीर करीत नाहीत. तर दुसरीकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीला हात न लावता विमानसेवा सुरू करण्याची सूचना केली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, शिवशरण पाटील हे लिंगायत समाजातील आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि विविध संघटना काडादी यांच्या बाजूने आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 02:33 IST
Next Story
“मंत्रिपद चुलीत घाला” नाराजीनाट्यानंतर बच्चू कडूंचं मोठं विधान; म्हणाले, “नवीन सुखाची पाऊलवाट…”