अहिल्यानगर : जिल्ह्यात यंदा प्रथमच शिक्षण विभागाने ११ वीच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया अवलंबली. आतापर्यंत प्रवेशाच्या चार फेऱ्या पूर्ण झाल्या. महाविद्यालयातून अकरावीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र जिल्ह्यातील अकरावी प्रवेश क्षमतेपैकी एकूण ४४ हजार ७२७ जागा रिक्त राहिल्या असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली. या रिक्त जागांमुळे शिक्षक संच मान्यतेनंतर त्याचा परिणाम होणार असल्याची भीती शिक्षक संघटनांकडून व्यक्त केली जाते. जिल्ह्यातील विज्ञान, वाणिज्य व कला या शाखांबरोबरच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अकरावीचे वर्ग असलेली ४५३ उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यामध्ये सर्व प्रकारच्या म्हणजे अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, स्वयंअर्थसाय्यित, अल्पसंख्याक अशा सर्व प्रकारच्या शाळा महाविद्यालयांचा समावेश आहे. यामध्ये ९८ हजार ५९० जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी ५३ हजार ८६३ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
यंदा जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ६१ हजार ४१२ होती. त्यातील काही तंत्रनिकेतन व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाकडेही विद्यार्थी वळले आहेत. अद्याप जिल्ह्यात अकरावी प्रवेशाच्या ४४ हजार ७२७ जागा रिक्त आहेत आणि महाविद्यालयातून अकरावीचे वर्ग सुरूही झाले आहेत. मात्र रिक्त जागांमुळे प्रवेश प्रक्रिया शिक्षण विभागाकडून अजूनही सुरू ठेवण्यात आली आहे. रिक्त राहिलेल्या बहुसंख्य जागा कला व वाणिज्य शाखेच्या आहेत. त्यातही त्या स्वयंअर्थसहाय्यित व विनाअनुदानित प्रकारच्या तुकड्यातील आहेत. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थी व पालकांचा विशिष्ट शाळा, महाविद्यालयाकडे असलेल्या ओढ्यास आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, त्याला मात्र प्रतिबंध बसलेला दिसत नाही. यंदा दि. १९ मेपासून अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली.
यंदा प्रथमच राज्यभरासाठी ही प्रक्रिया अकरावी प्रवेशासाठी राबवली गेली. यापूर्वी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक अशा काही प्रमुख शहरातच केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबवली गेली होती, यंदा राज्यभर राबवली गेली. तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा ही प्रक्रिया रखडली. प्रवेशाचे वेळापत्रक वारंवार बदलण्यात आले. आता प्रवेशाच्या चौथ्या फेरीअखेर ५३ हजार ८६३ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यात सर्वाधिक विज्ञान शाखेत ३३ हजार ६९१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या शाखेच्या एकूण ४९ हजार ७७० जागा होत्या त्यापैकी १६ हजार ७९ जागा रिक्त आहेत.
कला शाखेच्या ३२ हजार ४८० जागांपैकी १३ हजार ६३६ जागांवर प्रवेश झाले. उर्वरित १८ हजार ८४४ जागा रिक्त राहिल्या तर वणिज्य शाखेच्या एकूण २६ हजार ३४० जागांपैकी अवघ्या ६ हजार ५३७ जागांवर प्रवेश झाले. तर १९ हजार ८०३ जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे पटसंख्येअभावी शिक्षकांची पदे कमी होण्याची शक्यता आहे.