अहिल्यानगर: भाजपच्याच वर्चस्वाखाली असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक ताळेबंद अहवालातून भाजपचेच नेते तथा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा फोटो वगळण्यात आला आहे. त्याचे तीव्र पडसाद भाजपमध्ये उमटले आहेत. जिल्हा बँकेचे संचालक मंडळ व प्रशासनाचा निषेध करण्यासाठी भाजपमधील राम शिंदे समर्थकांनी आज, सोमवारी जामखेडमधील जिल्हा बँकेच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी केली.
या आंदोलनात ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात, ग्रामीणचे तालुकाध्यक्ष बापूराव ढवळे, शहराध्यक्ष संजय काशीद, भगवान मुरूमकर, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, उपसभापती नंदकुमार गोरे, संचालक सचिन घुमरे, माजी सभापती गौतम उतेकर, नारायण जायभाय, गणेश जगताप, पांडुरंग उबाळे, उदयसिंह पवार, तात्याराम पोकळे, राहुल बेदमुथा, राजेंद्र ओमासे आदी सहभागी झाले होते. आंदोलकांनी काळ्या फितीही लावल्या होत्या.
जिल्हा बँक काँग्रेसच्या वर्चस्वाखाली असताना व भाजपचे तत्कालीन नेते ना. स. फरांदे विधान परिषदेचे सभापती झाले असताना, त्यांचे छायाचित्र बँकेच्या ताळेबंद अहवालात छापण्यात आले होते. मात्र बँक भाजपच्या वर्चस्वाखाली येऊनही सभापती राम शिंदे यांचे छायाचित्र टाळण्यात आल्याचा आक्षेप शिंदे समर्थकांनी व्यक्त केला. बँकेचे संचालक नसताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार नीलेश लंके यांची छायाचित्रे ताळेबंदात छापण्यात आली आहेत, याकडेही लक्ष वेधण्यात आले.
या वेळी मधुकर राळेभात म्हणाले, की सभापती राम शिंदे हे जामखेडचे व शेतकऱ्यांची भूमिपुत्र आहेत. काँग्रेसने तत्कालीन सभापतींचे छायाचित्र छापले होते. राम शिंदे यांचे छायाचित्र छापून शेतकरी पुत्राचा गौरव करणे जिल्हा बँकेला शक्य होते, मात्र तसे करण्यात आले नाही. शेतकऱ्यांच्या जिवावरच बँक चालते, मात्र शेतकरी पुत्राचा गौरव बँकेला चालत नाही.
बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले आहेत. कर्डिले हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे गटाचे मानले जातात. भाजपमध्ये राधाकृष्ण विखे व राम शिंदे असे दोन स्वतंत्र गट आहेत. कर्डिले यांच्या वर्चस्वाखाली नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चिचोंडी पाटील उपबाजाराचे भूमिपूजन चार दिवसांपूर्वी झाले. या कार्यक्रमात व फलकावर सभापती राम शिंदे यांना स्थान दिले गेले नव्हते, याकडेही शिंदेसमर्थक लक्ष वेधत आहेत. बँकेच्या प्रशासनाच्या आडून प्रस्थापित राम शिंदे यांना डावलत आहेत, असाही आक्षेप घेतला जात आहे.