अहिल्यानगरः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहे. त्यामध्ये दक्षिण-उत्तर असा संबंध येण्याचे कारण काय? सरकारची आणि जिल्हाधिकाऱ्यांची समिती आहे. ही समिती जेथे जागा उपलब्ध असेल, त्याचा अहवाल सादर करेल, त्यानुसार निर्णय होईल, असे मत व्यक्त करत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी खासदार नीलेश लंके यांच्या भूमिकेवर टीका करताना महाविद्यालय उत्तर जिल्ह्यात होऊ शकते असे, अप्रत्यक्ष सूचित केले.

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापण्याचा शासन आदेश जारी झाला आहे. त्यासाठी ४८५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. खासदार लंके यांनी हे महाविद्यालय शिर्डीकडे वळवण्याची शक्यता व्यक्त करत, महाविद्यालय नगर शहरातच व्हावे, अशी भूमिका मांडली व त्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

याकडे लक्ष वेधले असता मंत्री विखे यांनी लंके यांच्यावर टीका केली. मंत्री विखे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात महाविद्यालय सुरू करण्याचा आदेश काढला गेला. महाविद्यालय जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहे, त्यामध्ये दक्षिण-उत्तर असा संबंध येतो कुठे? त्यासाठी सरकारची समिती आहे, जिल्हाधिकाऱ्यांची समिती जागेचा पाहणी अहवाल सादर करेल, त्यानंतर कुठे होईल याचा निर्णय होईल.

उद्धव व राज ठाकरे एकत्र असल्यास भाजप संपून जाईल, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले. याकडे लक्ष वेधले असता मंत्री विखे म्हणाले, संजय राऊत यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपत चालली आहे. भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे, दोघे एकत्र आल्याने भाजपला काही फरक पडत नाही.

लोकांनी नाकारलेल्यांसाठी उपचार कक्ष

शासकीय व महाविद्यालयाबाबत खासदार लंके यांनी केलेल्या भूमिकेवर टीका करताना मंत्री विखे म्हणाले, ज्यांचे अस्तित्व लोकांनी नाकारले अशांना आता काही काम राहिलेले नाही. त्यामुळे त्यांच्या डोक्यात अशा गोष्टी येत आहेत. आवश्यकता भासल्यास अशा लोकांसाठी शासकीय महाविद्यालयात उपचारासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केला जाईल.

सत्यजित तांबे यांच्या भाजप संपर्काची माहिती नाही

विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा होत आहेत, यावर बोलताना मंत्री विखे म्हणाले, कुणी जर पक्षात येत असेल तर त्यांचे स्वागतच आहे. मात्र आमदार तांबे यांच्याबाबत मला माहिती नाही. असे निर्णय पक्ष संघटनेच्या पातळीवर होत असतात. माझ्याशी याबाबत चर्चा झालेली नाही.