अहिल्यानगर: शहरासह जिल्ह्यात आज, बुधवारी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत, ढोल-ताशांच्या निनादात, गुलालाची उधळण करत मिरवणुका काढण्यात आल्या. नगर शहरातील बहुसंख्य मंडळांनी सायंकाळनंतर ‘आवाजाच्या भिंती’च्या (ध्वनीक्षेपक यंत्रणा) दणदणाटात मिरवणूक काढली.
नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते प्रतिष्ठापनेची पूजा करण्यात आली. महंत संगमनाथ महाराज, देवस्थानाचे अध्यक्ष ॲड. अभय आगरकर, तसेच विश्वस्त या वेळी उपस्थित होते. रुद्रवंश पथकाने मानवंदनेचे ढोलवादन केले. देवस्थानाच्या वतीने दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
शहरातील चितळे रस्ता, दिल्ली दरवाजा, बालिकाश्रम रस्ता, प्रोफेसर चौक, पाइपलाइन रस्ता, कल्याण रस्ता या ठिकाणी पूजेचे साहित्य, फूल-पत्री, सजावटीचे साहित्य विक्रेत्यांनी स्टॉल लावले होते. तेथे खरेदीसाठी झुंबड उडाली होती.
शहरात मानाची १२ गणेश मंडळे आहेत; मात्र यांपैकी कोणीही प्रतिष्ठापनेची मिरवणूक काढली नाही. शहरातील इतर बड्या मंडळांनी सायंकाळी मिरवणूक काढण्यास सुरुवात केली. चौपाटी कारंजावरील विक्रांत गणेश मंडळाने सोवळ्यात पालखीसह मिरवणूक काढली. सातभाई गल्ली मित्र मंडळाने ढोलपथकासह मिरवणूक काढली.
जय आनंद महावीर तरुण मंडळाने चांदीच्या गणेश मूर्तीची रथातून मिरवणूक काढली. याशिवाय जंगूभाई तालीम, धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान, वरद विनायक मित्र मंडळ, नालेगावातील हिंदुत्व युवा प्रतिष्ठान, वीरराजे युवा प्रतिष्ठान, तोफखाना तरुण मंडळ यांनी डीजेचा कर्णकर्कश दणदणाट करत मिरवणूक काढली. मिळेल त्या मार्गाने मिरवणुका काढण्यात आल्या. शहरात अनेक मंडळे प्रतिष्ठापनेची मिरवणूक काढताना विसर्जन मिरवणुकीत सहभाग टाळतात, तर मानाची मंडळे प्रतिष्ठापनेची मिरवणूक टाळून विसर्जन मिरवणुकीत दणदणाट करतात.
टिळक रस्त्यावरील लोकमान्य टिळक मित्र मंडळ व पाइपलाइन रस्त्यावरील एकदंत मित्रमंडळाने १८ फूट उंचीच्या गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे.
महापालिका निवडणुकीचे पडसाद
महापालिकेची निवडणूक दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. त्याचे वेध राजकीय पदाधिकाऱ्यांना लागले आहेत. त्याचेच पडसाद गणेशोत्सव, तसेच मिरवणुकांमधून उमटले आहेत. बहुसंख्य मंडळांच्या मिरवणुकीतील वाहनांच्या अग्रभागी इच्छुकांचे फलक लावण्यात आले होते. मिरवणुकीत नाचणाऱ्या कार्यकर्त्यांनी या इच्छुकांचे फलक हाती घेतले होते. अनेक इच्छुकांनी मंडळांना निधी पुरवला आहे.
३११९ सार्वजनिक मंडळे
सायंकाळपर्यंत नगर शहरासह उपनगरांतून ३३२ सार्वजनिक मंडळांनी विघ्नहर्त्याची प्रतिष्ठापना केली, तर जिल्ह्यात ३११९ हून अधिक गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केल्याची नोंद सायंकाळपर्यंत पोलिसांकडे झालेली होती. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत मंडळांची संख्या घटलेली आहे.
गुलालाऐवजी ‘पेपर ब्लास्ट’चा वापर
प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीमध्ये गुलालाची उधळण दर वर्षी कमी होत चालली आहे. यंदा गुलालाऐवजी ‘पेपर ब्लास्ट’चा वापर अधिक होत असल्याचे दिसले. याशिवाय ‘फॉग ब्लास्ट’चा वापरही वाढला आहे. गुलालामध्येही विविध छटा आढळत आहेत.
वाद्यपथकांची निराशा
प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीत वादनाची सुपारी घेण्यासाठी परिसरातील गावांसह जुन्नर, मावळ भागांतील वाद्यपथके नगरमध्ये दाखल झाली होती. चितळे रस्त्यावर त्यांनी उपस्थिती होती. मात्र, बड्या मंडळांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. बॅन्जो पार्टी, बँड पथके तर अपवादानेही आढळली नाहीत