अहिल्यानगर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण ६८ जागांसाठी प्रभागनिहाय आरक्षण आज, मंगळवारी सोडतीद्वारे जाहीर करण्यात आले. या आरक्षणामुळे आता कोण, कुठून लढणार याची चर्चा सुरू झाली आहे. आरक्षणामुळे काही दिग्गजांची कोंडी झाली आहे तर काहींना फटकाही बसला आहे. महिला आरक्षणामुळे आई, पत्नी, बहीण यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

एकूण ६८ जागांमध्ये अनुसूचित जातीच्या ९ (पैकी ५ महिला), ओबीसींच्या १८ (पैकी ९ महिला), अनुसूचित जमातीसाठी एक जागा आरक्षित करण्यात आली आहे. तसेच सर्वसाधारण प्रवर्गाच्या ४० (पैकी २० महिला) आरक्षित झाल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २७ जागा थेट आरक्षित करण्यात आल्या होत्या तर ओबीसीच्या एका जागेसाठी सोडत काढण्यात आली. त्यामुळे प्रभाग ४ मध्ये दोन जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत.

मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या अध्यक्षतेखाली आज शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षणाची सोडत काढण्यात आली. सोडतीनंतर उपस्थितांमध्ये काहींच्या आशा पल्लवीत झाल्या तर काहींना निराशेने झाकोळले. त्यानंतर लगेचच समाज माध्यमातून स्वतःची उमेदवारी जाहीर करण्याची स्पर्धा सुरू झाली. महिला आरक्षणामुळे अनेकांच्या समाज माध्यमावर स्वतःसह पत्नी, आई, बहिणीचे छायाचित्रे झळकवण्यास सुरुवात झाली आहे. सभागृहात यावेळी उपायुक्त विजय मुंडे, नगरसचिव मेहेर लहारे उपस्थित होते. महात्मा फुले विद्यालयातील (सावेडी) विजया रवींद्र कांबळे, श्रावणी रवींद्र बांगर, रुद्र विजय वाघमारे व शौर्य किशोर कुऱ्हाडे या विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षणाची सोडत काढण्यात आली.

यांची झाली कुचंबना

सोडतीद्वारे अनुसूचित जातीच्या जागेवर महिला आरक्षण निघाल्याने प्रभाग २ मध्ये माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके, प्रभाग ५ मध्ये माजी महापौर तथा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, प्रभाग १५ मध्ये माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड, माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांची कुचंबना झाली तर ओबीसी महिला आरक्षणामुळे प्रभाग ७ मध्ये माजी उपमहापौर अनिल बोरुडे, प्रभाग ८ मध्ये माजी नगरसेवक अशोक बडे, प्रभाग १२ मध्ये माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांचीही अडचण झाली. त्यामुळे त्यांनी आता इतर ठिकाणावरूनही चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.

जुळवाजुळव सुरू

सोडतीमुळे राजकीय पक्षांच्या पॅनेलची जुळवाजुळवा सुरू झाली. एससी, ओबीसी असे दोन्ही आरक्षण असलेल्या प्रभागात दोन जागा सर्वसाधारण प्रवर्गाच्या आहेत. त्यात काही ठिकाणी एक जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने त्यादृष्टीने उमेदवारांची जुळवाजुळव सुरू झाली. काहींनी सर्वसाधारण ऐवजी ओबीसी प्रवर्गातून लढण्यासाठी कुणबी प्रमाणपत्राचा आधार घेत तयारी सुरू केली आहे.

महापौर आरक्षणाची प्रतीक्षा

महापालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण प्रतीक्षेत आहे. २००३ मध्ये प्रथम महापौर भगवान फुलसौदर (ओबीसी) व संदीप कोतकर (प्रवर्ग खुला), २००८ मध्ये संग्राम जगताप ( ओबीसी) व शीला शिंदे (खुला महिला), २०१३ मध्ये संग्राम जगताप (खुला प्रवर्ग) व अभिषेक कळमकर तसेच सुरेखा कदम (खुला महिला), २०१८ मध्ये बाबासाहेब वाकळे (खुला प्रवर्ग) व रोहिणी शेंडगे (राखीव) असे महापौर झाले आहेत. आता नव्याने २०२६ चा महापौर खुला असेल की राखीव याची उत्सुकता आहे. शासन यासंदर्भात कधी आरक्षण सोडत काढते, याकडे इच्छुकांचे डोळे लागले आहेत.

प्रभागनिहाय आरक्षण

प्रभाग १: अ- अनुसूचित जाती. ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क- सर्वसाधारण महिला. ड- सर्वसाधारण प्रवर्ग. प्रभाग २: अ- अनुसूचित जाती महिला, ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग. क- सर्वसाधारण महिला. ड- सर्वसाधारण प्रवर्ग. प्रभाग ३ : अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब- सर्वसाधारण महिला. क- सर्वसाधारण महिल. ड- सर्वसाधारण प्रवर्ग. प्रभाग ४: अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग. क- सर्वसाधारण महिला. ड- सर्वसाधारण प्रवर्ग. प्रभाग ५: अ- अनुसूचित जाती महिलांसाठी, ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग. क- सर्वसाधारण महिला, ड- सर्वसाधारण प्रवर्ग. प्रभाग ६: अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब आणि क जागा सर्वसाधारण महिला. ड- सर्वसाधारण प्रवर्ग. प्रभाग ७: अ- अनुसूचित जमातीसाठी (एसटी). ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग, क- सर्वसाधारण महिला. ड- सर्वसाधारण प्रवर्ग. प्रभाग ८: अ-अनुसूचित जाती (एससी) महिला, ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. क आणि ड- सर्वसाधारण प्रवर्ग. प्रभाग ९ : अ- अनुसूचित जातीसाठी (एससी), ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. क- सर्वसाधारण महिला ड- सर्वसाधारण प्रवर्ग.

प्रभाग १०: अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग. ब आणि क- सर्वसाधारण महिला. ड- सर्वसाधारण प्रवर्ग. प्रभाग ११: अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग. ब आणि क- सर्वसाधारण महिला, ड- सर्वसाधारण प्रवर्ग. प्रभाग १२: अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. ब- सर्वसाधारण महिला, क आणि ड- सर्वसाधारण प्रवर्ग. प्रभाग १३: अ- अनुसूचित जातीसाठी (एससी), ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. क- सर्वसाधारण महिला ड- सर्वसाधारण प्रवर्ग. प्रभाग १४: अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब आणि क- सर्वसाधारण महिला. ड- सर्वसाधारण प्रवर्ग. प्रभाग १५: अ- अनुसूचित जाती (एससी) महिला. ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग, क- सर्वसाधारण महिला. ड- सर्वसाधारण प्रवर्ग. प्रभाग १६: अ- अनुसूचित जाती (एससी) महिला, ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. क आणि ड- सर्वसाधारण प्रवर्ग. प्रभाग १७: अ- अनुसूचित जातीसाठी (एससी), ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. क- सर्वसाधारण महिला तर ड- सर्वसाधारण प्रवर्ग.