अहिल्यानगर : भारतीय रिझर्व्ह बँकेने अहमदनगर मर्चंट सहकारी बँकेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा दिला आहे. ‘आरबीआय’ने दोन दशकांनंतर शेड्युल्ड बँक दर्जा देण्यास सुरुवात केली. त्याअंतर्गत महाराष्ट्रातील मर्चंट बँकेला हा मान मिळाला आहे. बँकेचे संस्थापक अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांनी ही माहिती दिली.

शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळाल्यामुळे मर्चंट बँकेला डिमॅट सुविधा सुरू करता येणार आहे, शाखाविस्तार, त्याचबरोबर शासकीय प्रकल्पांना कर्ज देण्याचा अधिकार, लिक्विडिटी फॅसिलिटी, क्लिअरिंग हाऊस सिस्टीममध्ये सहभागी होण्याचा हक्क, बँकेची विश्वासार्हता, कार्यक्षमता, व्यावसायिक विस्तारात वाढ होणार असल्याचे उपाध्यक्ष अमित मुथा यांनी सांगितले.

बँकेने नुकताच सुवर्णमहोत्सव साजरा केला. यानिमित्त सभासदांना भेटवस्तू दिली जाणार असून, त्यासाठीची परवानगी आरबीआयकडे प्रलंबित आहे. बँकेने ३१ मार्चअखेर एकूण ठेवी १४६२ कोटी १६ लाख, कर्ज वितरण ९६८ कोटी ३९ लाख, तर बँकेला ७ कोटी ३ लाखांचा निव्वळ नफा झाला आहे. नेट एनपीए शून्य टक्के आहे. शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळणे ही ऐतिहासिक उपलब्धी असल्याची भावना हस्तिमल मुनोत यांनी व्यक्त केली.

देशभरात १४२३ सहकारी बँका आहेत. त्यांपैकी सध्या ५२ बँकांना शेड्युल्ड बँक म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यात नगर मर्चंट बँकेचा समावेश आहे. नगर जिल्ह्यातील ही दुसरी शेड्युल्ड बँक ठरली आहे. शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळाल्याने संचालक मंडळाने पेढे वाटून आनंद साजरा केला. संचालक अनिल पोखरणा, आनंदराम मुनोत, संजय चोपडा, मोहनलाल बरमेचा, संजय बोरा, अजय मुथा, किशोर मुनोत, सुभाष बायड, मीना मुनोत, विजय कोथिंबिरे, राजेश झंवर, प्रसाद गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पुराणिक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन भंडारी आदी उपस्थित होते.