परभणी : कृत्रिम बुध्दिमत्ता प्रणालीचा वापर करून एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे अश्लिल फोटो तयार करून बदनामीची धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रकार सेलू येथे उघड झाला. पालकांना माहिती देऊन बदनामी करण्याची धमकी देऊन संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीवर सातत्याने अत्याचार केल्याच्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (दि.३) हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीवरून सेलू पोलिसात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेलू येथील शिक्षक संतोष मलसटवाड याची शहरातील बाबासाहेब मंदिर परिसरात अभ्यासिका आहे. आरोपीने पीडितेचे कृत्रिम बुध्दिमत्ता प्रणाली वापरून अश्लिल फोटो तयार करून ते पालकांना दाखवण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी देऊन इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकणार्‍या अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार केला. तसेच आरोपी शिक्षकाने पीडितेचे चोरून व्हिडिओ चित्रण केले. अखेर या प्रकरणी पीडितेने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करत शिक्षक संतोष मलसटवाड याच्यासह अर्जून ठाकूर आणि नितीन परदेशी यांना ताब्यात घेतले आहे. चौकशीअंती शिक्षक मलसटवाड याने घटनेची कबुली दिली. यावरून सेलू पोलिसात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात शिक्षक मलसटवाडसह अर्जुन ठाकूर आणि नितीन परदेशी या दोघांनी संबंधित पीडितेवर अत्याचार केले. पीडिता दहावीत शिकत असताना हा प्रकार सुरू झाला. सध्या ही मुलगी अकरावीत शिकते. घरच्यांना हा प्रकार कळाल्यानंतर त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन सर्व माहिती विचारली. संबंधित पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर याप्रकरणी संबंधित कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली.दरम्यान सेलू हे शहर मराठवाडयातील शैक्षणिक दृष्ट्या प्रगत मानली जाते. या शहरात ग्रामीण भागातून असंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकण्यासाठी येतात. सेलू येथे हा प्रकार उघड झाल्यानंतर पालकांमध्ये खळबळ उडाली असून शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक असलेल्या या शहरात अशी घटना घडल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.