Ajit Pawar Assets Cleared In Benami case : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारल्यानंतर नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर काही तासांतच राष्ट्रवादीचे (अजित पवार) अध्यक्ष अजित पवार यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयकर विभागाने ६ डिसेंबर २०२१ रोजी बेनामी मालमत्ता प्रकरणात जप्त केलेली अजित पवार यांच्या कुटुंबियांशी संबंधित मालमत्ता मुक्त केली आहे. दिल्लीतील बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक अपीलीय न्यायाधिकरणाने हा निर्णय दिल्यानंतर अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांनाही दिलासा मिळाला आहे. दरम्यान या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

आयकर विभागाने ७ ऑक्टोबर २०२१ रोजी अजित पवार व त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित असलेल्या काही कथित कंपन्यांवर छापे टाकले होते. त्यावेळी आयकर विभागाने काही कागदपत्रे आणि मालमत्ता जप्त केल्या होत्या. पण नंतर बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक अपीलीय न्यायाधिकरणाने पुराव्याअभावी आयकर विभागाचे दावे फेटाळले होते.

हे ही वाचा : मनपा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत बिघाडी? हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून काँग्रेस-शिवसेना आमनेसामने, एक्सवर राडा

काय म्हणाले न्यायालय?

न्यायाधिकरणाने अजित पवार यांच्या कुटुंबियांविरोधातील आरोप फेटाळून लावताना आपल्या निर्णयात, नमूद केले की, “सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कोणतीही अनियमितता आढळली नाही. अपीलकर्त्याने सादर केलेल्या कागदपत्रांमधून त्यांनी कोणताही बेनामी व्यवहार केलेले दिसत नाही. या प्रकरणातील मालमत्तेसाठी सर्व व्यवहार कायदेशीर तसेच बँकिंग प्रणालीद्वारे केले गेले आहेत. त्यामुळे असे म्हणता येणार नाही की, अजित पवार, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी बेनामी मालमत्ता खरेदी करण्यासाठी निधी हस्तांतरित केला आहे.”

हे ही वाचा : मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर आता फडणवीसांची पुढील योजना काय?; म्हणाले, “माझा भर हा…”

काय आहे नेमकं प्रकरण?

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री असताना ऑक्टोबर २०२१ मध्ये आयकर विभागाने बेनामी मालमत्ता प्रतिबंधक कायद्यांतर्गत एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त केली होती. या कारवाईमध्ये महाराष्ट्र आणि मुंबईतील अजित पवार यांचे नातेवाईक, बहिणी आणि जवळच्या सहकाऱ्यांसह त्यांच्याशी संबंधित लोकांची निवासस्थाने आणि कार्यालये यांची झडती घेण्यात आली होती. मात्र, यातील एकाही मालमत्ता थेट अजित पवार यांच्या नावावर नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar gets relief in benami case as assets cleared parth pawar sunetra pawar aam