अहिल्यानगर : शहरातील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने पारनेर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन शहरासह जिल्ह्यात जाणीवपूर्वक जातीय तणाव निर्माण करणाऱ्या घटना वारंवार घडत असल्याकडे लक्ष वेधले. उपमुख्यमंत्री पवार यांनी या प्रश्नावर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना बोलावून जातीय तणाव निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरोधात त्याचा पक्ष न पाहता कठोर कारवाई करावी, असा आदेश दिला. तसेच जातीय तणाव कमी करण्यासाठी मोहल्ला समिती स्थापण्याची सूचना केली.
कोठला येथील रास्ता रोको आंदोलनाशी संबंध नसताना अनेकांना अटक करण्यात आली, त्यांची नावे वगळावीत. पोलीस गुन्ह्याशी संबंध नसलेल्या व्यक्तींना त्रास देत आहेत, ते त्वरित थांबवावे. पोलीस प्रशासनाने पहाटेची गस्त वाढवावी. प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांविरोधात ‘हेट स्पीच’प्रकरणी पोलिसांनी स्वतःहून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.या प्रसंगी उबेद शेख, शौकत तांबोळी, माजी उपमहापौर नजीर शेख, शाकीर शेख, माजी समाजकल्याण अधिकारी रफिक मुन्शी, सय्यद खलील, शफी जहागीरदार, अथर खान, मतीन सय्यद, राजू सुपेवाले, ॲड. सय्यद अख्तर, मोबीनमुल्ला तांबटकर, फारुख बागवान, डॉ. रिजवान शेख, ॲड. हाफिज जहागीरदार, माजी पोलीस अधिकारी रऊफ रोख, ॲड. मोबीन, फय्याज जहागीरदार, फैरोज सय्यद आदींच्या शिष्टमंडळाने मागणी केली.
शिष्टमंडळाने सांगितले, की मागील १० महिन्यांपासून काही लोकप्रतिनिधी व जातीयवादी संघटनेचे लोक वारंवार तणाव निर्माण होईल असे वक्तव्य करत आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासाठी जाणूनबुजून कृत्य सुरू आहे. पोलीस प्रशासन त्यांच्या विरोधात कारवाई करत नाही.
सूत्रधार शोधा
‘आय लव्ह मोहम्मद’ रांगोळी विटंबना प्रकरणावरून शहरात जातीय तणाव निर्माण करण्यात आला. यातील आरोपी व त्याच्या कुटुंबीयांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून त्याला हद्दपार करण्याची व हे कृत्य करण्यास भाग पाडणारा सूत्रधार शोधण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. जिल्ह्यात मुस्लिम समाजाला लक्ष्य करून हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडण लावले जात असल्याने अल्पसंख्याक समाज भीतीच्या सावटाखाली आहे. शहरात अशांतता निर्माण झाल्याने त्याचा रोजगार, स्थानिक बाजारपेठेवर दुष्परिणाम झाला आहे. वारंवार घटना घडत असल्याने ग्रामीण भागातील मुस्लिम समाजासाठी असुरक्षित वातावरण निर्माण झाल्याकडे उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी सायंकाळी पारनेर येथे रोजगार मेळाव्यास उपस्थित होते. या मेळाव्यानंतर शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. या वेळी आमदार काशिनाथ दाते उपस्थित होते.