उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारीवरून चिंता व्यक्त केली होती. “ठाण्याची लोकसंख्या अधिक असल्यानं गुन्हेगारीचे प्रकार चालतात. त्यासाठी कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं हे पोलिसांचं काम आहे,” असं विधान अजित पवारांनी केलं होतं. याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अजित पवार काय म्हणाले होते?

“राज्यातील ३६ जिल्ह्यांचा विचार केला असता ठाण्यात गुन्हेगारी अधिक आहे. कारण, ठाण्याची लोकसंख्या अधिक आहे. अनधिकृत कामेही जिल्ह्यात होतात. त्यासाठी कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं हे पोलिसांचं काम आहे. तिथे राजकीय हस्तक्षेप होऊ न देणं हे राज्यकर्त्यांचं काम आहे. जर कुणी कायदा तोडून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर कडक कारवाई करण्यात यावी,” असं अजित पवारांनी म्हटलं होतं.

हेही वाचा : “अजित पवारांनी ५० हजार रूपये पगारावर ठेवलेल्या माणसानं…”, जितेंद्र आव्हाडांचा मिटकरींना इशारा

“पुण्यात दिवसाढवळ्या खून पडतात”

यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “ठाण्यात गुंडगिरी आहे, असं अजित पवार म्हणतात.. पुण्यात काय आरत्या होतात का? पुण्यात जेवढी गुंडगिरी आहे, तेवढी मुंबईतही नाही. खुलेआम दिवसाढवळ्या कोयते मारले जातात, खून पडतात.”

पुण्यात गुंड शरद मोहोळचा खून

दरम्यान, पुण्यात ५ जानेवारीला सराईत गुंड शरद मोहोळ यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. जमिनीच्या वादातून मोहोळचा पूर्वीचा साथीदार साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले होतं. मोहोळविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण आदी गंभीर दाखल होते.