Ajit Pawar : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्य सरकार अॅक्शनमोडमध्ये आलं आहे. या घटनेची कारणं शोधण्यासाठी नौदल आणि सरकार मिळून संयुक्त तांत्रिक समितीची स्थापन करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याठिकाणी आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला साजेसं असं स्मारक उभारलं जाईल, असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन पुतळ्याच्या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पुतळा नेमका कसा कोसळला याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या पाहणीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवादही साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकार याप्रकरणाची सखोल चौकशी करत असून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच आदित्य ठाकरे यांच्या मालवण दौऱ्यादरम्यान राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि नारायण राणे समर्थकांमध्ये झालेल्या राड्यावरही त्यांनी भाष्य केलं.

हेही वाचा – Amol Mitkari : अजित पवार गटाबाबत केलेल्या विधानावरून अमोल मिटकरींचा मंत्री तानाजी सावंतांना टोला; म्हणाले, “जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात, ते…”

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

“मालवणमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेचं सर्वांनाच दुःख आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत सगळ्यांनाच अभिमान आहे. ही घटना घडल्यानंतर सगळ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र राज्य सरकार म्हणून आम्ही जनतेला सांगू इच्छितो की या ठिकाणी आम्ही महाराजांच्या नावाला साजेसं असं स्मारक उभारणार आहोत. राज्य सरकारने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री गेले दोन दिवस बैठका घेत आहेत”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

“राज्य सरकारने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. या प्रकरणात आम्ही लक्ष देऊन आहोत. याच्या खोलात जाऊन सखोल चौकशी केली जाईल. या पुतळ्याचं काम करणारे काही लोक अद्यापही फरार आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. तसेच नवीन पुतळा उभारण्यासंदर्भात राम सुतार यांच्याशी मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे. राम सुतार यांनी अनेक मोठे पुतळे उभारले आहेत, त्यांना मोठा अनुभव आहे. सगळ्या गोष्टी बारकाईने बघून निर्णय घेतले जातील”, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

“शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील शिवप्रेमींना संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. याबाबत विचारलं असता, आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. जनभावना लक्षात घेऊन पुढचे सर्व निर्णय घेतले जातील”, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा – ‘आता सत्तेतून बाहेर पडलेलं बरं’, विधानसभेआधीच महायुतीत धुसफूस; अजित पवार गटाचा इशारा

ठाकरे-राणे वादावर म्हणाले…

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि नारायण राणे समर्थकांमध्ये राडा झाला होता, यावरही अजित पवार यांनी भाष्य केलं. “ज्याचं त्याला कळलं पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असल पाहिजे, कसं राजकारण झालं पाहिजे, या गोष्टी त्यांनी आपल्याला शिकवल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने तारतम्या बाळगलं पाहिजे. कार्यकर्त्यांनी उत्साहाचा भरात येऊन काहीही करू नये. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. आपल्या संस्कृतीनुसार आपण वागलं पाहिजे”, असं ते म्हणाले.