अलिबाग : रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीपदाचा वाद थांबण्याची चिन्हे नाहीत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून, त्यामुळे थंडीच्या हंगामातही जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या आक्रमक भूमिकेनंतर आदिती तटकरे यांच्या रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली. मात्र या निर्णयानंतर महायुतीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद विकोपाला गेले आहेत. शिवसेनेच्या तिन्ही आमदारांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना लक्ष्य करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने प्रामाणिकपणे सुनील तटकरेंचे काम केले. मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मदत केली नाही. सुधाकर घारे यांना निवडून आणण्यासाठी महेंद्र दळवी यांना पाडण्याचे प्रयत्न केले गेले. तर गोगावले निवडून आले तर पालकमंत्री होतील म्हणून त्यांना पाडा, अशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचा आरोप राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे. ‘आम्ही करतोय ते आरोप चुकीचे आहेत. हे सिद्ध करा, मंत्रीपदासह आमदारकीचाही राजीमाना देईन’, असे थेट आव्हानच गोगावले यांनी दिले आहे. आमदार महेंद्र थोरवेही तटकरे यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. तटकरेंच्या बाबतीत कुठलीही तडजोड आम्ही स्वीकारणार नाही, असे आमदार महेंद्र दळवी म्हणाले.

पदाची अपेक्षा बाळगण्यात काही गैर नाही. पण आपण ती कशा पद्धतीने व्यक्त करतो याचे भान जपले पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही ही सर्वांची जबाबदारी आहे, असा टोला आदिती तटकरे यांनी शिवसेना आमदारांना लगावला.

वादात भाजपचीही उडी

रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली असताना आता या वादात महायुतीतील प्रमुख घटकपक्ष भाजपने उडी घेतली आहे.

● भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला कानपिचक्या देत चांगलेच सुनावले. जिल्ह्यात भाजपचे पण तीन आमदार आहेत हे विसरू नका, असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे. ते गोरेगाव येथे माध्यमांशी बोलत होते.

● राज्यातील जनतेने महाविकास आघाडीला नाकारून महायुतीवर विश्वास टाकला आहे. महायुतीच्या सर्वच आमदार, मंत्र्यांनी या विश्वासाला शोभेल असे वागले पाहिजे. पालकमंत्रीपदासाठी रस्त्यावर वादविवाद होणे महायुतीला शोभा देणारे नाही, असे दरेकर म्हणाले.

आम्ही सुसंस्कृत आहोत. आघाडी, युतीच्या राजकारणात सर्वांनाच सर्वकाही मिळेल असे होत नाही. काही बाबतीत राजकीय मतभेद असू शकतात. पण त्याची चर्चा होऊ शकते. आयुष्यभर मी अशाच संघर्षाला तोंड देत आलो आहे. माझ्यावर ज्यावेळला निराधार पद्धतीचे आरोप, राजकीय हेतू समोर ठेवून झाले. त्यांचे राजकारणात नंतर काय झाले हे सर्वांनी पाहिले आहे.– सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अप)

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allegations over the post of guardian minister of raigad amy