भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि मध्य प्रदेशच्या प्रभारी पंकजा मुंडे यांनी बुधवारी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “मला लोक म्हणतात पक्ष माझा. मी भारतीय जनता पक्षाची आहे. पण पक्ष माझा नाहीये. भारतीय जनता पक्ष खूप मोठा आहे. आम्हाला काही नाही मिळालं तर मी जाईन ऊस तोडायला आणि महादेव जानकर जातील मेंढ्या चरायला”, तसेच त्या म्हणाल्या, “रासप माझ्या भावाचा पक्ष आहे. वडिलांशी भांडण झालं तर मी भावाच्या घरी जाईन”, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यातून त्यांची खदखद त्यांनी व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंकजा मुंडे यांना २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यावरून बरेच राजकीय तर्क-वितर्क लावले जाऊ लागले होते. स्वतः पंकजा मुंडे यांनी त्यांची नाराजीदेखील व्यक्त केली होती. आता त्यांनी त्यांच्या मनातली खदखद पुन्हा एकदा मांडली आहे. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे नेते अंबादास दानवे याबाबत म्हणाले, पंकजा मुंडे यांनी असं बोलून दाखवलं असेल तर ही भूमिका एकट्या पंकजाताईंची नाही. भजापाचे महाराष्ट्रातील, तसेच देशातील असे कार्यकर्ते आणि नेते आहेत ज्यांची घुसमट होत आहे, त्यांची भूमिका पंकजाताईंनी मांडली आहे.

अंबादास दानवे म्हणाले, भाजपात मोठ्या प्रमाणात कमर्शियलायजेशन आलं आहे. पंकजाताईंनी हजारो कार्यकर्त्यांची भूमिका व्यक्त केलेली असावी, असं मला वाटतं. एक दिवस पंकजाताईंना न्याय मिळेल. ज्या पद्धतीने गोपीनाथ मुंडे यांचं मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात नेतृत्व होतं, त्यांनाही अशाच अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं. त्या तुलनेत पंकजाताईंसमोर काहीच अडचणी नाहीत. गोपींनाथ मुंडे यांनाही असा त्रास झाला होता. मला वाटतं पंकजाताईंचा एक दिवस येईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambadas danve says gopinath munde was also troubled on pankaja munde statement asc