ठाणे महापालिकेच्या अख्यारित येणाऱ्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या २४ तासांत १६ ते १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील सिव्हिल रुग्णालय बंद पडल्याने ठाणे जिल्ह्यातून रुग्ण कळवा येथील रुग्णालयात जात आहेत. त्यामुळे रुग्णालय प्रशासनावर मोठा ताण निर्माण झाला आहे. परिणामी सर्व रुग्णांवर वेळेत आणि योग्य उपचार करण्यास डॉक्टरांची दमछाक होतेय. दरम्यान, गेल्या २४ तासांत १६ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. मनसे, ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी थेट रुग्णालयात जाऊन प्रशासनाला जाब विचारला आहे. तर, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनीही ट्वीट करून सरकारवर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> “कळव्यात मृत्यूचं तांडव, रुग्णांना मरायला…”, एका रात्रीत १६ रुग्ण दगावल्याप्रकरणी मनसे आक्रमक!

“अजून असे किती निष्पाप बळी घेतले जाणार?” असा सवाल अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. ते पुढे म्हणाले की, “शिरूर लोकसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत बोलत असताना अनेकदा सार्वजनिक आरोग्यावर सरकारचे लक्ष वेधले होते. खरंतर सरकारची प्राथमिकता ही सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर जास्तीत जास्त खर्च करून प्रत्येक देशवासियाला उत्तम आरोग्यसेवा देण्याला असली पाहिजे! पण आपण देशाच्या GDP च्या १.५ टक्के इतका खर्चच आरोग्यव्यवस्थेवर करतोय, ही दुर्दैवी बाब आहे. कोविडच्या काळात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा आपण पाहिलेलाच आहे. म्हणूनच गेल्या ३ वर्षांपासून मी इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पासाठी पाठपुरावा करतोय”, असं अमोल कोल्हे म्हणाले.

“प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक सार्वजनिक दवाखाना होणे गरजेचे आहे. सरकारी दवाखाने बनवतेवेळी भौगोलिक क्षेत्र आणि लोकसंख्येची घनता या निकषाचा विचार केला गेला पाहिजे. त्यासोबतच आतापर्यंत उभारल्या गेलेल्या प्रत्येक सरकारी दवाखान्यात अत्याधुनिक सेवा-सुविधा देणे आवश्यक आहे, तरच आपण खऱ्या अर्थाने आरोग्य व्यवस्थेच्या गलथान कारभारामुळे नाहक जाणारे आपल्या लोकांचे जीव वाचवू शकतो!”, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला आहे.

रुग्णालयाचे डीन काय म्हणाले?

“मृतांमध्ये एक चार वर्षांचा मुलगा होता. त्याने मोठ्या प्रमाणात रॉकेल प्यायलं होतं. त्यामुळे आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. बाकीचे काही रुग्ण मागील काही दिवसांपासून उपचार घेत होते. कुणी तीन दिवस तर कुणी चार दिवसांपासून उपचार घेत होते”, असं रुग्णालयाचे डीन राकेश बारोट यांनी सांगितले.

“एका रुग्णाच्या डोक्याला मार लागला होता. या अज्ञात रुग्णाचाही मृत्यू झाला. तर अन्य एका रुग्णाच्या मेंदूला ट्रॉमा होता, त्यांचाही मृत्यू झाला. दोन रुग्णांची फुफ्फुसं खराब होती. त्या रुग्णांना संसर्ग होऊन मृत्यू झाला. इतर तीन-चार रुग्णांना मल्टी ऑर्डर डिस्फंक्शन झालं होतं. कुणाला हृदयाची समस्या होती, तर कुणाला अनियंत्रित मधूमेह होता. अशा रुग्णांना वाचवण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण त्यांना वाचवू शकलो नाही”, अशी प्रतिक्रिया डीन राकेश बारोट यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol kolhe tweet over kalva death case sgk