Anil Parab vs Pratap Sarnaik on Employee Provident Fund : एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची आणि ग्रॅच्युइटीची रक्कम अदा करणं बाकी असल्याची बाब परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज (१२ मार्च) विधान परिषदेत मान्य केली. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना (ठाकरे) आमदार अनिल परब व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार शशिकांत शिंदे यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या मुद्द्यावरून मंत्री सरनाईकांना घेरलं. त्यावर उत्तर देताना सरनाईक म्हणाले, “पीएफ व ग्रॅच्युइटीची २,२१४.४७ कोटी रुपये इतकी रक्कम अदा करणे बाकी आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार आम्ही ती अदा करू.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरनाईक म्हणाले, “मध्यंतरी एसटी कामगारांचा संप झाला. तरीदेखील आम्ही कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली आहे. दुसऱ्या बाजूला भविष्य निर्वाह निधीसंदर्भात आमच्याकडे एकही तक्रार आलेली नाही. त्याचबरोबर भविष्यात अशा प्रकारे कुठल्याही निधीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च केली जाणार नाही.” यावर अनिल परब म्हणाले, “कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसे असे कुठेही वापरता येत नाहीत. हा फौजदारी गुन्हा आहे. ज्यांनी कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसे इतरत्र व पगारावर वापरले असतील त्यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करा. तसेच कर्मचाऱ्यांचे पैसे तात्काळ जमा करा.”

“एकाही कर्मचाऱ्याचा भविष्य निर्वाह निधी इतरत्र कुठेही खर्च झालेला नाही.”

यावर प्रताप सरनाईक म्हणाले, “महामंडळाची ६४ कोटी रुपयांची मासिक तूट आहे. तसेच शासनाकडून आम्हाला ५८२ कोटी रुपये येणे बाकी आहे. मानव विकास योजनेचे २६८ कोटी रुपये येणे बाकी आहे. त्यामुळेच आज ही स्थिती निर्माण झाली आहे. परंतु, मी सर्वांना आश्वस्त करतो की कर्मचाऱ्यांच्या पीएफवरील व्याजाच्या रक्कमेचं नुकसान झालेलं नाही. त्यांचं व्याज जमा केलं जात आहे. कोणाचंही नुकसान होणार नाही. एकाही कर्मचाऱ्याचा भविष्य निर्वाह निधी इतरत्र कुठेही खर्च झालेला नाही.”

कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या पैशांवर डल्ला मारला जातोय, या लोकांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी अनिल परब यांनी केली. तसेच या कटात मंत्री सरनाईक सहआरोपी आहेत का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. यावर मंत्री म्हणाले, “एसटी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचा कुठल्याही प्रकारचा एकही रुपया इतरत्र खर्च केला जाणार नाही. काही स्थितीत, किवा वेगळ्या वातावरणानुसार, राज्य शासनाच्या निधीअभावी काही गोष्टी घडत असतात. मात्र आम्हाला कोणत्याही कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधीसंदर्भात एकही तक्रार आलेली नाही. पैसे कामगारांच्या खात्यावर गेले आहेत आणि व्याजही जमा करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil parab vs pratap sarnaik over msrtc used employee provident fund gratuity elsewhere asc