अहिल्यानगर : गायवर्गीय जनावरांमध्ये जिल्ह्यात लम्पी आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणावर आढळू लागला आहे. जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांतच ४७२ जनावरे बाधित आढळली आहेत. यापैकी २० जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. दरम्यान लसीकरणासाठी पशुसंवर्धन विभागाच्या यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली आहे. लसीकरणात निष्काळजीपणा केल्याबद्दल एका पशुधन पर्यवेक्षकास निलंबित करण्यात आले आहे.

पशुसंवर्धन विभागाने पंधरा दिवसांपूर्वीच लम्पी आजाराने १५ जनावरे बाधित झाल्याची माहिती दिली होती. आज, मंगळवारी बाधित जनावरांची संख्या ४७२ वर पोहोचली आहे. यापैकी २३३ जनावरे लम्पीमुक्त झाली आहेत तर २१९ जनावरांवर उपचार सुरू आहेत. त्यातील ६ अत्यवस्थ आहेत. गेल्या १५ दिवसांत २० दुभती जनावरे मृत्युमुखी पडली. यामध्ये एकट्या राहता तालुक्यातील दाढ येथील १३ जनावरांचा, नेवासा ३, संगमनेर २, शेवगाव १ व राहुरी १ अशी एकूण २० जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. केवळ नगर, पाथर्डी व श्रीरामपूर हे तीन तालुके वगळता जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव आढळल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात गायवर्गीय १३ लाख ७८ हजारांवर जनावरे आहेत. त्यांचे लसीकरण एप्रिलमध्ये सुरू करण्यात आले होते. मात्र असे असतानाही लम्पी बाधित होऊ लागली आहेत. लसीचे डोस मिळूनही जनावरांना लसीकरण न केल्याने, लसीकरणात निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल राहता तालुक्यातील पशुसंवर्धन पर्यवेक्षक दर्शना सातदिवे यांना निलंबित केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिली.

यापूर्वी सन २०२१-२०२२ मध्ये जिल्ह्यातील दुभत्या जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव प्रचंड मोठ्या प्रमाणात आढळून आला होता. शेकडो जनावरे मृत्युमुखी पडली. त्यामुळे दूध उत्पादनावर परिणाम झाला होता. ऑक्टोबर २०२३ दरम्यान लम्पीचा प्रादुर्भाव थांबल्याचे पशुसंवर्धन विभागाने जाहीर केले होते. मात्र दरवर्षी लसीकरण करूनही पुन्हा दुभती जनावरे बाधित होऊ लागली आहेत.

लसीकरणासाठी धावपळ

जिल्हा पशुसंवर्धन विभागाने एप्रिलमध्ये लम्पी प्रतिबंधित लसीकरण मोहिमेला सुरुवात केली होती. जिल्ह्यात एकूण १३ लाख ७८ हजार गायवर्गीय जनावरे आहेत. आतापर्यंत ९२ टक्के लसीकरण झाल्याचा दावा विभागाने केला आहे. मात्र सुरुवातीला जिल्ह्यासाठी ९ लाख ४४ हजार लसींचे डोस प्राप्त झाले होते. ते संपल्यावर आणखी ३ लाख डोस मागवण्यात आले. त्यानंतर धुळ्याहून २३ हजार डोस मागवण्यात आले. आता पुन्हा जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून ७६ हजार डोस मागवले गेले आहेत.

मार्गदर्शक तत्त्वे जारी

लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणती कार्यपद्धत अवलंबित करायची याच्या मार्गदर्शक सूचना पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. गोठ्यांची स्वच्छता, धूर फवारणी, निर्जंतुकीकरण यावर भर दिला जात आहे. कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या ठिकाणी थांबण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. लंपी बाधित जनावरांचे विलगीकरण केले जात आहे. – आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

प्रतिबंधासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

लम्पी हा संसर्गजन्य आजार असल्याने प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांचा बाजार, उत्सव, प्रदर्शन, शर्यती यामध्ये केवळ लसीकरण केलेल्या जनावरांनाच प्रवेश देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना मान्यतेसाठी सादर करण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दशरथ दिघे यांनी दिली.