विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ५ डिसेंबर रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सहाव्यांदा शपथ घेतली. यानंतर ६ डिसेंबरला आयकर विभागाने अजित पवारांना दिलासा दिला आहे. आयकर विभागाने अजित पवार कुटुंबियांशी संबंधित मालमत्ता मुक्त केली. ही मालमत्ता सुमारे एक हजार कोटींची आहे. ही मालमत्ता मुक्त झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली. आपल्या तळपायांची आग मस्तकात गेली असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंजली दमानिया काय म्हणाल्या?

अजित पवार यांना १ हजार कोटीची त्यांची मालमत्ता परत देण्यात आली अशी बातमी आज माध्यमांपुढे आली. खरंच सांगते तळपायाची आग मस्तकात गेली, अशा शब्दात अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला. तुम्ही आधी त्यांच्या मागे ईओडब्ल्यू लावणार, त्यांच्या मागे सगळ्या यंत्रणा लावणार, इन्कम टॅक्सच्या रेड करणार आणि तुमच्याबरोबर त्यांना घेणार. अजित पवार यांना परत उपमुख्यमंत्रीपद मिळालं, जे ते सहा वेळा भूषवतात, सो कॉल्ड हे त्यांना पद दिलं गेलं. १ हजार कोटींची मालमत्ता परत दिली तर अजित पवार इतर कुठेही जातीलच कशाला? असा सवाल अंजली दमानियांनी केला आहे.

हा खेळ कुठेतरी थांबला पाहिजे-दमानिया

अंजली दमानिया म्हणाल्या, हा जो सगळा खेळ चाललाय ना की यंत्रणांचा वापर करायचा, केसेस टाकायच्या, नंतर आपल्या पक्षात घ्यायचं आणि मग केसेस परत घ्यायच्या हे चित्र जोपर्यंत बदलत नाही आणि एकाचच नाही. भाजपाच नाही सगळेच पक्ष तेच आहेत, सगळ्यांच्या फायली यांच्याकडे आहेत आणि त्याच दाखवून ब्लॅकमेल करून हे जे आपल्या पक्षात घेतलं जातंय त्याचं धडधडीत उदाहरण ही ऑर्डर आहे, असं म्हणत दमानिया यांनी संताप व्यक्त केला. मला असं खूप वाटतंय की आता जनतेने शुद्धीवर यायला हवं. बटेंगे तो कटंगे नही, हम साथ साथ लुटेंगे. हात जोडा परत परत आपण बघतोय हेच यंत्र तंत्र वापरलं जातं आहे आणि हे कुठेतरी आता थांबायला हवं, अशी सादही अंजली दमानिया यांनी जनतेला घातली आहे.

२०२१ मध्ये जरंडेश्वर साखर कारखान्यावर रेड झाली होती. त्यामध्ये, आणि त्याच्यात फायर पॉवर नावाच्या कंपनीज जेवढ्या आहेत, ज्या सुनेत्रा पवार व अजित पवार यांनी सुरू केलेल्या आहेत. मात्र, रेड झाल्यानंतर सुनेत्रा पवार आणि अजित पवार कंपनीतून बाहेर पडले. पण आजतागायत त्यांच्या जवळचे नातेवाईकच ह्या कंपन्या चालवतात, असे दमानिया यांनी म्हटले. या सगळ्या प्रॉपर्टीजच्या अटॅच केले होत्या, त्या कशा सुटल्या आणि कशा सोडवल्या गेल्या हे तुमच्या पुढे आज आणायचं आहे. हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. समजून घ्या एक साखर कारखाना जरंडेश्वर एस एस के नावाचा साखर कारखाना जो होता तो १९९९-२००० साली सुरू होतो. २०१० त्याचा एन. पी. ए होतो. त्याचं लोन प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतं, म्हणून महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक हे त्यांचा लिलाव करतात. या लिलावात हायस्पीडर कोण होतं तर गुरु कमोडिटी नावाची कंपनी होती, जी दहा वर्ष बंद असलेली कंपनी. ज्याचे फक्त ऑथराईज आहे ते कॅपिटल फक्त साडेसहा लाखाच्या आसपास होतं. ह्या गुरु कंपनीमध्ये सगळ्या कंपन्यांकडून पैसे येतात आणि हे पैसे आल्यानंतर आणि त्याच्यापैकी एक कंपनीची शेवटची त्या ऑर्डरमध्ये आणि आज मी हे जे बोलतेय ते फक्त आणि फक्त या इन्कम टॅक्सच्या कारवाई आधारे बोलते, असे म्हणत दमानिया यांनी अजित पवारांच्या कारभाराचा लेखाजोखाच पत्रकार परिषदेतून मांडला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anjali damania allegation on ajit pawar sunetra pawar what did she say scj