Anjali Damania : बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटाचा संशयित मास्टरमाईंड आणि खंडणी प्रकरणात पोलिसांना शरण गेलेल्या वाल्मिक कराडवर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या आहेत. तर दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाल्मिक कराडवर मकोका लागू

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी असल्याचा दावा विरोधी पक्षांमधील नेते व मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केला आहे. तसंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने देखील वाल्मिक कराडवर आरोप केले आहेत. त्यामुळे वाल्मिक कराडवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई केली जावी अशी मागणी विरोधक करत होते. या हत्या प्रकरणात आतापर्यंत इतर आठ आरोपींना अटक करण्यात आली असून सर्वांवर मकोका लावण्यात आला आहे. मात्र, वाल्मिकवर मकोका लावण्यात आला नव्हता. त्याच्यावरही मकोका लावण्यात यावा अशी मागणी होत होती. नागरिकांची ही मागणी आता पूर्ण झाली आहे. दरम्यान या वाल्मिक कराडवरुन पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. वाल्मिक कराडला सरकारी अंगरक्षक होता का? असाही प्रश्न अंजली दमानियांनी विचारला आहे.

अंजली दमानियांनी काय प्रश्न उपस्थित केले आहेत?

या वाल्मिक कराडला शासकीय अंगरक्षक होता?

कोणामुळे दिला गेला अंगरक्षक ?

अशा माणसांची सुरक्षा आमच्या कराच्या पैशातून होणार ?

हा माणूस मुख्यमंत्री लाडकी योजनेचा अध्यक्ष ? कोणी केला ह्यांना अध्यक्ष ?

धनंजय मुंडे यांच्या आशिर्वादाने ना ? मग कधी राजीनामा घेणार त्यांचा ?

असे अनेक गंभीर FIR पण कारवाई केली गेली नाही ? का ?

परळीत कराड समर्थकांचं आंदोलन

असे प्रश्न अंजली दमानियांनी उपस्थित केले आहेत. एक्स या सोशल मीडिया साईटवर त्यांनी ही पोस्ट केली आहे. वाल्मिक कराडांवर मकोका दाखल करण्यात आल्यानंतर त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. यानंतर परळीत मात्र आंदोलन सुरू झालेलं पाहण्यास मिळालं. बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराड समर्थकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. वाल्मिक कराडची ७५ वर्षांची आई आणि पत्नीही या ठिय्या आंदोलनात सहभागी होत्या. यावेळी त्याच्या पत्नीने माध्यमांशी बोलताना, कराडवरील आरोप फेटाळून लावले.

वाल्मिक कराड यांच्या पत्नीने अंजली दमानिया यांचाही उल्लेख केला होता. “अंजली दमानिया यानी एसआयटीमधील काही पोलिसांचा वाल्मिक कराड यांच्याबरोबरचा फोटो दाखवला होता. पण आताच्या एसआयटीचे प्रमुख तेली हे आष्टीचे जावई आहेत. म्हणजे एसआयटीवर त्यांनी जावई आणून बसवला आहे. याचा अर्थ सुरेश धस यांनी आपल्या सोयीनुसार आपली माणसे एसआयटीत आणले असून त्यांनी वंजारी समाजाला लक्ष्य केले आहे”, असा आरोप त्यांनी केला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anjali damania asks this question regarding walmik karad she asked why govt security to him scj