भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद न स्वीकारता शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले. भाजपाने आपल्या धक्कातंत्रानुसार घेतलेला हा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी खोच शब्दांमध्ये शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर टीका केलीय. मिटकरी यांनी ट्विटरवरुन दोन ट्विट करत या निर्णयावर बाष्य केलं आहे.

नक्की वाचा >> ‘शिंदे सरकार’मध्ये देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या भूमिकेत असणार का?; भाजपाच्या नेत्याने स्पष्टच सांगितलं, “ते…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणुन एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा हा त्यांचा मास्टर स्ट्रोक आहे की शिवसेना संपवण्याचे सोयीस्कर षडयंत्र? हे येणारा काळ ठरवेल,” असा टोला मिटकरी यांनी पहिल्या ट्विटमध्ये लगावलाय. तर दुसऱ्या ट्विटमध्ये मिटकरी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या न्यायप्रविष्ठ असलेल्या निकालाकडे इशारा केलाय. १६ बंडखोर आमदारांच्या निलंबनासंदर्भातील खटल्याची पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार असल्याने याच तारखेचा उल्लेख करत मिटकरींनी, “महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांची कारकीर्द कदाचित ३० जून २०२२ ते ११ जुलै २०२२” असं म्हटलंय. याच ट्विटमध्ये पुढे, “देवेंद्र फडणवीस यांचे मास्टर माईंड आहेत,” असंही म्हटलंय.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये, “आज शिवसेनेचा विधीमंडळ गट शिंदे यांच्या नेृत्वाखाली आम्ही भाजपा आणि १६ अपक्ष -छोटे आमदार हा सोबत आलेला एक मोठा गट आहे. आणखी काही सोबत येत आहे. भाजपाने हा निर्णय़ केली आहे, आम्ही सत्तेच्या मागे नाहीत, ही तत्वांची लढाई आहे, ही विचारांची लाढाई आहे, भाजपाने हा निर्णय केला की शिंदे यांना समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. आज साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याच शपधविधी होईल,” असं सांगितलं.

पाहा व्हिडीओ –

तसेच स्वत:च्या भूमिकेबद्दल बोलताना फडणवीस यांनी, “मी सरकारच्या बाहेर राहून काम करणार आहे. हे सरकार नीट काम करेल याची जबाबदारी माझीही असेल,” असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. “या सरकारला यशस्वी करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करण्यासाठी आम्ही एकत्र प्रयत्न करु. पंतप्रधान मोदींनी जे विकासपर्व सुरु केलं आहे ते आम्ही राबवू. मागील अडीच वर्षांपासून जो महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लागला होता. तो निघेल आणि पुन्हा विकासाची एक्सप्रेस धावू लागेल,” असं फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appointing eknath shinde as cm is master stroke by devendra fadanvis says amol mitkari scsg
First published on: 30-06-2022 at 18:40 IST