सांगली : ऊस शेतीतील कामासाठी मजूर टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे मत आमदार अरूण लाड यांनी व्यक्त केले. क्रांती सहकारी साखर कारखाना व स्वदेश ग्रुप, पुणे आयोजित ऊस फवारणी यंत्राचे प्रात्यक्षिक कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, ऊस शेतीमध्ये हवामान बदल, नवीन रोग- किडी अशा अनेक समस्या आहेत. मजूर टंचाई ही एक प्रमुख समस्या आहे, त्यामुळे उसातील मशागतीची कामे वेळेवर होण्यामध्ये अडचणी येतात. या कामासाठी साधी-सोपी व शेतकऱ्यांना परवडतील अशी यंत्रे, औजारे तयार करण्याचा क्रांती कारखान्याचा प्रयत्न आहे. काही दिवसांपूर्वी बाळभरणी औजार उपलब्ध करून दिले आहे. याच औजाराचा वापर करून बाळभरणीशिवाय उसावर फवारणी व तणनियंत्रणासाठी कुळवणीचे काम करणे आता शक्य झाले असून, एक बहुउद्देशीय यंत्र तयार करून दिले आहे. या यंत्राच्या मदतीने एक बाळभरणी, तीन फवारणी व एक कुळवाची पाळी अशा तीन कामांमध्ये एकरी सहा ते सात हजार रुपयांची बचत होणार आहे. कारखान्याकडून सदरचे यंत्र विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार असून त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कारखान्याचे संचालक जितेंद्र पाटील, अनिल पवार, दिलीप थोरबोले, अशोक विभुते, वैभव पवार, बाळकृष्ण दिवाण, माजी संचालक दिलीपराव पाटील, कुंडलिक थोरात, अरूण कदम, संदीप पवार, जिल्हा परिषदचे माजी सदस्य कुंडलिक एडके, अशोक पवार, दिनकर लाड, शिवाजीराव देशमुख, सुनील पाटील, प्रवीण जाधव, जगन्नाथ पाटील, सुरेश पाटील, शंकर जगदाळे, सुरज जाधव, स्वदेश ग्रुपचे माधव बिरादार व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.