वाई: सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात  आचारसंहिता संपताच प्रचंड गर्दी झाली. विविध मागण्यांसाठी आंदोलकांनी केलेल्या गर्दीमुळे सातारा शहर पोलिसांची चांगलीच कसरत झाली. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे, अवनी सामाजिक संस्थेच्या वतीने सातारा जिल्हा कचरा वेचक संघ, तांदुळवाडीचे संदीप वामन जाधव यांच्यासह विश्व इंडियन पार्टीचे सदस्य चर्चेत राहिले. या सदस्यांनी अर्धनग्न आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर  विशेष गर्दीचा ठरला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अचानक मांडवांची गर्दी वाढली. सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी झाडाणी प्रकरणामध्ये शेतकर्‍यांना न्याय मिळावा तसेच यामधील प्रशासकीय अधिकारी शोधले जावेत याकरता आंदोलन छेडले होते. हे त्यांचे आंदोलन आमरण सुरू राहणार आहे. या आंदोलनाला झाडाणी गावातून आलेल्या ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे. याशिवाय सातारा जिल्हा विश्व इंडियन पार्टीचे सदस्य काकासो संजय चव्हाण, संजय कल्लाप्पा चव्हाण, अमृत हिंदुराव जाधव, बापूसाहेब लांडगे, विलास नलावडे, मयूर लोंढे, राजेंद्र ताटे, निवास माने, सागर पवार यांनी अर्धनग्न आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले आणि जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. कराडच्या तहसीलदारांची विविध कारणास्तव चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. कराड तालुक्यातील बेसुमार उत्खनन, वडार समाजाला त्यांच्या सुविधांपासून वंचित ठेवणे, विंग येथे शासन परवानगी नसताना उत्खनन होणे, कोणतीही पूर्वसूचना न देता उत्खननाचा परवाना रद्द करणे, बहुतांशी मंडल अधिकारी तलाठी यांच्या बदल्या होऊ न देणे, कराड तहसील कार्यालयातील सीसीटीव्ही बंद असणे अशा विविध त्रुटींमुळे पवार यांचा कारभार चर्चेत राहिला होता. या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विश्व इंडियन पार्टीने केली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये ५०४ कचरावेचक महिलांचे संघटन आहे. मागील आठ वर्ष हे संघटन कचरा बेचकांसाठी संघर्ष करत आहे. त्यांना कामाचा योग्य तो मोबदला मिळावा, त्यांना हॅन्डग्लोज, बूट, मास्क इत्यादी सुविधा मिळाव्यात, जिल्ह्यातील समाज कल्याण खात्याने कचरा व्यवस्था महिलांच्या मुलांना मॅट्रिक वर्ष शिष्यवृत्ती वेळेत द्यावी, कचरा वेचकांची नोंदणी होऊन त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As soon as the code of conduct is over there is a rush of protest at the satara collector office amy